नवी दिल्ली : संरक्षण सौद्यातील दलालांसोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांची हातमिळवणी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. राफेलच्या फाईल्सच्या संरक्षण मंत्रालयातील चोरीत संरक्षणदलाल संजय भंडारीचा सहभाग असल्याचे चौकशीत दिसून आल्याचा आरोपही इराणी यांनी यावेळी केला. भाजप मुख्यालयात आयोजित परिषदेत स्मृती इराणी यांनी काही दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे आज प्रथमच नावे घेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वढेरा यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले.
“हरियाणातील एच. एल. पाहवा यांच्याकडून राहुल गांधी यांनी जमीन खरेदी केली असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने घातलेल्या धाडीत सापडलेल्या कागदपत्रांवरून दिसून आले,” असा आरोप करत इराणी म्हणाल्या की, “प्रियांका वढेरा तसेच त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्या भ्रष्टाचाराबाबतची कागदपत्रेही यावेळी सापडली आहेत. पाहवा हा संरक्षण सौद्यातील दलाल संजय भंडारीचा निकटवर्ती असलेल्या सी. सी. थंपी यांचा कर्मचारी आहे. राहुल आणि प्रियांकासाठी जमीन घ्यायला पाहवाजवळ पैसे नव्हते, त्यावेळी थंपी यांनी पाहवा यांना ५० कोटीपेक्षा जास्त रक्कम दिली होती, असे पाहवाकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून दिसून आले,”असा आरोप करत इराणी म्हणाल्या की, “राफेल व्यवहारात सहभागी होण्याची संजय भंडारी यांची इच्छा होती, मात्र त्याला फ्रान्सच्या कंपनीने नकार दिला.”
संजय भंडारी आणि रॉबर्ट वढेरा यांच्यातच आर्थिक संबंध आहेत असे आतापर्यंत मानले जात होते, पण या सगळ्या व्यवहारात राहुल आणि प्रियांका यांचाही थेट सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत, याकडे इराणी यांनी लक्ष वेधले. “संरक्षण व्यवहारातील संजय भंडारीसारख्या दलालांशी काय संबंध आहेत, ते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले पाहिजे,” अशी मागणी करत स्मृती इराणी म्हणाल्या की, “संरक्षण व्यवहारातील दलालांशी असलेल्या संबंधांमुळेच राहुल गांधी संरक्षण व्यवहारात फार जास्त रस घेतल्याचा आम्हाला संशय आहे.” राजकीय कारणांमुळे नाही, तर आर्थिक व्यवहारांमुळे राहुल गांधी संरक्षण व्यवहारात जरूरीपेक्षा जास्त रुची घेत असल्याचा आरोप इराणी यांनी यावेळी केला.