साडेतीनशे वर्षांपूर्वी चिह्नसंकेतांचा वापर करून, श्री शिवाजी महाराजांवर विजापूरचा अफझलखान आक्रमण करण्यास निघाल्याची सूचना महाराजांना देणारे, हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पत्र.
डॉ. रामचंद्र देखणे हे संतसाहित्याचे आणि वारकरी संप्रदायाचे जेष्ठ अभ्यासक. समर्थांच्या साहित्याबद्दल आणि विशेष करून त्यांच्या भारुडांच्या रचना आणि भाषाशैली संदर्भात त्यांनी फार नेमके वर्णन केले आहे. डॉ. देखणे लिहितात, “सुगम, अर्थगर्भ, अकृत्रिम, रोखठोक, प्रगल्भ आणि प्रभावी भाषाशैली, विपुल अनुभव, अवलोकनाची सूक्ष्मता आणि सामाजिक जागृतीची आत्यंतिक भूमिका त्यांच्या भारुडातून प्रकट होते. लोकांचे धर्मविषयक औदासिन्य, भ्रांति, भ्रष्टता नाहीशी करून त्यांच्या चित्तात शुद्ध परमार्थ विचार ठसवावा, त्याचबरोबर सामाजिक जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी नीतिमुल्ये सांगून परमार्थविवेकाबरोबर प्रपंचबोधाचेही निरुपण करावे, या हेतूने समर्थांनी लिहिलेली भारुडे समाजमनाचे जनजागरण घडवीत आहेत.” साडेतीनशे वर्षांपूर्वी चिह्नसंकेतांचा वापर करून, श्री शिवाजी महाराजांवर विजापूरचा अफझलखान आक्रमण करण्यास निघाल्याची सूचना महाराजांना देणारे, हे श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पत्र. प्रत्येक ओळीचे आद्याक्षर क्रमाने वाचत गेले तर त्याचा पुढील अर्थ निघतो. ‘विजापुरचा सरदार निघाला आहे’ असा स्पष्ट संदेश त्यात मुद्रीत झालेला दिसतो. हे पत्र सदाशिवशास्त्री यांच्या हस्ताक्षरात आहे.
विवेके करावे कार्यसाधन । जाणार नरतनु हे जाणून ।
पुढील भविष्यार्थी मन । रहाटोचिं नये ॥१॥
चालो नये असन्मार्गी । सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी । दासामहात्म्य वाढवी ॥२॥
रजनीनाथ आणि दिनकर । नत्यनेमे करिती संचार ।
घालिताती येरझार । लाविले भ्रमण जगदीशे ॥३॥
आदिमाया मूळ भवानी । हेचि जगाची स्वामिनी ।
येकांती विवंचना करोनी ।इष्ट योजना करावी ॥४॥
या पत्राच्या मागचा आणि पुढचा अद्भुत घटनाक्रम मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाला आहे. हे मूळ पत्र आजही वाचण्यासाठी उपलब्ध आहे. अफजलखानाचा सगळा मार्ग जर आपण पाहिला तर पंढरपूर, म्हसवड, फलटण नंतर वाई या सगळ्या रस्त्यात जोगोजागी समर्थ रामदासांचे मठ आहेत. वाई परिसरात समर्थ रामदासांचे कमीतकमी दहा मठ आहेत. ज्या प्रतापगडावरती अफजलखानाचा वध केला त्या प्रतापगडावर; तिथून पाच मैलावरती पारगाव खंडाला येथे, पसरणीला आणि महाबळेश्वरला, महाबळेश्वरहून साताऱ्याला जाताना मेढा गाव मध्ये लागतं. त्या मेढ्याला समर्थ रामदासांचा मठ आहे. पाचगणीच्या खाली कण्हेरी नावाच गाव, कण्हेरीपासून दहा मैलावर शिरवळ आहे, तिथे समर्थ रामदासांचा मठ आहे. अफजलखान येत असल्याची वार्ता या पत्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम समर्थ शिष्य वासुदेव गोसावी यांनी केले आणि पुढील कामासाठी रजनीनाथ आणि दिनकर हे समर्थांचे दोन दास होते. प्रत्यक्षात ही दोन नावे सुद्धा चिह्नसंकेत - रूपके आहेत. कारण, रजनीनाथ म्हणजे रात्रीचा पहारा आणि दिनकर म्हणजे दिवसाचा पहारा, असा हा संकेत आहे. अफजलखानाच्या सेनेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम समर्थांनी ज्यांच्यावर सोपविले होते. त्यांच्या नावांचा चपखल उल्लेख पत्रातील तिसऱ्या श्लोकात समर्थांनी असा चिह्नसंकेताने केलेला दिसतो.
अफजलखान जेव्हा स्वराज्यावर आक्रमण करून आला, तेव्हा त्याने वाटेमधील प्रत्येक गोष्ट नष्ट करण्यास सुरवात केली. वाटेमध्ये त्याने तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचं मंदिर देखील सोडलं नाही. हे सगळं ऐकल्यावर शिवाजीराजे फार चिंताक्रांत झाले. आता खानाला कस थांबवायचं आणि कसा संपवायचं, हा प्रश्न त्यांना पडला. राजेंना स्वत:ची पर्वा नव्हती, चिंता होती ती फक्त त्यांना अतिशय आवडणाऱ्या आणि त्यांना जीवापाड जपणाऱ्या प्रजेची. समर्थांच पत्र हातात मिळताच राजे लगेचच त्यांना भेटण्यासाठी गेले. भेटल्यावर समर्थांना राजेंची चिंता लगेचच लक्षात आली आणि असे म्हटले जाते की समर्थांनी राजेंना सलग ७२ तास अध्यामिक निरुपण दिलं आणि पुढील योजनेसाठी त्यांना तयार केलं आणि खानाला संपवण्यासाठी प्रतापगड ह्या किल्याची निवड केली. समर्थांनी केलेल्या निरुपणामध्ये खानाला मारण्यासाठी वाघ नखांचा गुप्तपणे वापर करायचा असे समर्थांनी सुचविले असावे आणि पुढे काय झालं ते तुम्हाला माहितीच आहे. समर्थ साहित्याचे अन्य अभ्यासक सुनील चिंचाळकर यांच्या अभ्यासात, अफजलखानाचे व्यक्तिमत्व नक्की कसे आहे त्याचे वर्णन समर्थांनी अन्यत्र केले आहे, ते खालीलप्रमाणे....
तुंड हेंकाड कठोर वचनी । अखंड तोले साभिमानी ।
न्याय नीति अंतःकर्णीं । घेणार नाहीं ॥३॥
तर्हे सीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा ।
राजकारण संवादा । मिळोंचि नेणें ॥४॥
ऐसें लौंद बेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।
पापी अपस्मार जनीं । राक्षेस जाणावें ॥५॥
समयासारिखा समयो येना । नेम सहसा चलेना ।
नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥६॥
अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें ।
हटनिग्रहीं न पडावें । विवेकीं पुरुषें ॥७॥
बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडेल तट ।
कोणीयेकाचा सेवट । जाला पाहिजे ॥८॥
‘राजकारण संवादा । मिळोंचि नेणें ॥’ या चौथ्या चरणात समर्थ स्पष्ट सल्ला देतात की, त्या माणसाशीं राजकीय चर्चा नको. ‘कोणीयेकाचा सेवट । जाला पाहिजे ॥’ या आठव्या चरणात समर्थ म्हणतात, “त्याचा शेवट झाला पाहिजे.” दहशतवादी चर्चा करण्याच्या योग्यतेचे नसतात असे समर्थ रामदास या पत्रात स्पष्टपणे लिहितात. या पत्रातील शब्दार्थ आणि भावार्थ वाचकाला सहज समजतील अशा भाषेत आहेत. मराठी भाषा संस्कृतीमध्ये, चिह्नसंकेतांचा इतका चपखल वापर श्री रामदास स्वामींनी या पत्रात केला आहे, असे उदाहरण अन्य भाषा संस्कृतींमध्ये शोधूनही सापडणे शक्य नाही. राजकारणाचा संतुलित विचार आणि शब्दांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या जाणिवा जागृत करताना त्यांना सावधानतेचा इशारा देणारे समर्थ, वास्तव आयुष्यातील ‘मित्र-मैत्री’ या संकल्पना आणि त्याबरोबरच ‘काळ’ या अमूर्त संकल्पना या दोन्ही विषयांतसुद्धा किती स्पष्ट मूलभूत विचार मांडतात, ते पाहाणे फारच रंजक आहे. समर्थांनी त्यांच्या साहित्यात प्रपंचबोध आणि परमार्थबोध याचा विस्तार करताना विपुल विषय हाताळले आहेत. ४०० वर्षांपूर्वी त्यांनी ‘मैत्री’ या विषयावर केलेली टिप्पणी आजही ताजी वाटते. आजच्या काळाला समर्पक वाटते. कारण, ते विचार कालातीत आणि वैश्विक आहेत. मैत्री कशी असावी-ती कोणाशी करावी, कोणाला जवळ करावे, कोणाला दूर करावे, मित्र कसा असावा, कसा नसावा अशा मैत्र भावनेचा संपूर्ण विचार समर्थांनी केवळ १२ ओव्यांमध्ये मांडला आहे. आजच्या प्रगत समाज माध्यमात मित्र-मैत्री या संकल्पनांचा विपर्यस्त वापर ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करा, अशा आमिषाने आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी केला जात आहे. अशावेळी समर्थांनी या १२ ओव्यांत दिलेला सल्ला प्रत्येकाचे आजच्या काळातही प्रबोधन आणि मार्गदर्शन करतो. समर्थ लिहितात-
माझे माझे, तुझे माझे । ऐसी ही मैत्रिकी जनी ।
माझे तुझे, तुझे तुझे । ऐसे न घडे कदा ॥
आशेची मैत्री खोटी । दुराशा विटम्बे पुढे ।
परोपकारिणी मैत्री । ते मैत्री न विटम्बे कदा ॥
समर्थांनी या द्वयार्थी ओव्यांतून सत्वगुणाचा दृष्टांत दिला आहे. ‘माझे ते माझेच आहे, पण तुझे ही सर्व माझेच आहे’ अशा हेतूने, मनात एक देखावा दुसराच अशी खोटी - स्वार्थी मैत्री नेहमीच अनुभवास येते, असा पहिला भावार्थ. ‘तुझे ते तुझेच आहे, मात्र प्रसंगोपात माझेही तुझेच असेल’ अशी मैत्री प्रत्यक्ष जगणारी माणसेही अपवादाने का होईना, पण या जगात आहेत असा द्वयार्थी दुसरा भावार्थ पहिल्या ओवीत आहे. दुसऱ्या ओवीत समर्थांनी, काम साधण्यासाठी केलेली मैत्री फार काळ टिकत नाही. कारण, मनातली अपेक्षा इथे पुरी होत नसते, हाच विचार अधिक स्पष्ट केला आहे. ‘काळ’ ही संकल्पना, हा विषय मांडताना अनेक गणिती आणि वैज्ञानिकांनी गणिताचा आधार घेत जाडजुड ग्रंथ लिहिले आहेत. प्रज्ञावंत समर्थांनी मात्र ही अमूर्त संकल्पना केवळ दहा सूत्रात आणि शब्दांच्या माध्यमातून मांडली आहे. ‘जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी’ आणि ‘स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हीटी’ या दोहीचे श्रेय अल्बर्ट आईन्स्टाईन या विद्वान वैज्ञानिकाला दिले जाते. लांबी-रुंदी-खोली या त्रिमितीला ‘काळ’ हे चौथे परिमाण विसाव्या शतकात जोडले ते अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी. ४०० वर्षांपूर्वी समर्थांनी फक्त शब्दांतून मांडलेले ‘काळ’ या संकल्पनेचे विश्लेषण आपल्याला अचंबित करते. शारीरिक काळ-मानसिक काळ-भावनिक काळ अशा ‘काळ’ संकल्पनांवर सुद्धा ४०० वर्षांपूर्वी समर्थांनी स्पष्ट विचार मांडले आहेत. आधुनिक विज्ञानाने आणि कालगणना साधनांनी, दिवसाच्या २४ तासांत आपण २१,६०० वेळा श्वास घेतो हे ज्ञान सर्वसामान्यांच्या परिचयाचे झाले आहे. ४०० वर्षांपूर्वी समर्थांनी मात्र श्वास-नाडी-फुफ्फुसे अशा स्वतःच्या शरीराच्या निरीक्षण-अनुभव-प्रचितीने आपल्या श्वास-उच्छावासाचे विश्लेषण गणिताचा आधार न घेता शब्दांत मांडले आहे. समर्थांच्या या विलक्षण प्रतिभेचा अभ्यास आपण पुढच्या लेखांत करणार आहोत...!! (क्रमश:)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/