नवी दिल्ली : एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान जगाला दाखवण्यासाठी सीमा तणाव कमी करण्यासाठी चर्चेची मागणी करत आहेत. तर, दुसरीकडे पाकिस्तानी सैनिक सीमा परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहेत. गुरुवारी पहाटे सकाळी ६ वाजताच्या सुमारास पुंछमधील कृष्णा घाटीत पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघण करण्यात आले. त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे १ तास हीचकमक सुरु होती.
भारताकडून सीमेजवळील भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय हवाईदलाकडून मंगळवारी पाकिस्तानातील जैशच्या दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सीमाभागात पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून करण्यात येत असलेला गोळीबार सकाळी ७ वाजताच्या सुमारास थांबला असून यामध्ये कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat