पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाच दिवसांनंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये अब्दुल रशीद गाझीला कंठस्नान घालण्यात आले. अटक करण्यात आलेल्या या दोन काश्मिरी तरुणांपैकी एकाच्या मोबाईलमध्ये एक व्हॉईस मॅसेज सापडला. या व्हॉईस मॅसेजमध्ये मोठे काम, सामान असे शब्द ऐकू येत आहेत. शाहनवाज आणि अब्दुल मलिक हे दोन्ही तरुण एक मोठा दहशतवादी हल्ला करण्याची तयारी करत होते. त्या हल्ल्या संबंधीत हे संभाषण होते. अशी माहिती एका तपास अधिकाऱ्याने दिली. या संभाषणात वापरण्यात आलेल्या सामान या शब्दाचा अर्थ शस्त्र किंवा स्फोटक असा आहे.
पोलीस महासंचालक ओ.पी.सिंह यांनी शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दोन काश्मिरी तरुणांची चौकशी केली. तब्बल चार तास ही चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान, शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दोघांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याचे कबूल केले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या तरुणांविषयीची माहिती जम्मू–काश्मिरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांच्यापर्यंत पोहोचवली. “जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी या दोन काश्मिरी तरुणांचा संबंध असून चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. या माहितीच्या आधारे याप्रकरणी आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.” असे ओ.पी.सिंह यांनी सांगितले.
शाहनवाज हा काश्मिरी तरुण गेल्या १८ महिन्यांपासून जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले. अब्दुल मलिक हा गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या सोबत आहे. असे शाहनवाजने पोलीस चौकशीदरम्यान सांगितले. एटीएस महासंचालक असीम अरुण यांनी ही माहिती दिली. तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल रशीद गाझी याच्या संपर्कात असल्याचे शाहनवाजने कबूल केले. जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडर्सनी या दोघांशी संपर्क साधला होता. कमांडर्सनी केलेल्या आवाहनानुसार शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दहशतवादी संघटनेत सहभागी झाले. शाहनवाज आणि अब्दुल मलिक या दोघांच्या मोबाईलमध्ये काही चॅट्स आणि व्हॉईस मॅसेज सापडले असून ‘लवकरात लवकर काहीतरी केले पाहिजे’. असे संभाषण या व्हॉईस मॅसेजमध्ये आढळले आहे. शस्त्र घेऊन जाण्यासाठी ठिकाणाचाही उल्लेख या संभाषणात करण्यात आला आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
कोण आहेत हे काश्मिरी तरुण ?
शाहनवाज या काश्मिरी तरुणाने बीएच्या पहिल्या वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण केले असून त्याने कॉम्प्युटर कोर्सही केला आहे. शाहनवाजचे वडील कारपेंटर आहेत आणि त्याचा भाऊ शिक्षक आहे. तर अब्दुल मलिक या तरुणाने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. अब्दुलचे वडील हे एक शेतकरी आहेत. उत्तर प्रदेश पोलीस या दोघांना घेऊन काश्मीरला जाणार आहेत. काश्मीरमध्ये या दोघांनी डमी ग्रेनेड लपवले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोघांसोबत राहिलेल्या इतर विद्यार्थांचीदेखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat