युद्धसज्ज सुसाईड ड्रोन...

Total Views | 47

 

 
 
 
 
ड्रोन हे अलीकडच्या काळात सर्वांच्याच अगदी परिचयाचे. अनेकदा ड्रोनचा वापर संरक्षणासाठी, सीमेवर पहारा ठेवण्यासाठी करण्यात येतो, तर काही ऑनलाईन सामानांची विक्री करणाऱ्या ई-कॉमर्स संकेतस्थळांनी सामान ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही परदेशात ड्रोनचा वापर केला होता. सुसाईड ड्रोन’ ही नवी संकल्पना आता उदयास येत आहे. हत्यारे निर्माण करणाऱ्या ‘क्लाशनिकोव्ह’ या रशियन कंपनीचे नाव जगभरात परिचयाचे आहे ते म्हणजे असॉल्ट रायफल एके-४७ साठी. आता याच कंपनीने दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ही एक नवी संकल्पना जगासमोर आणली आहे.
 

‘क्लाशनिकोव्ह’ या कंपनीने एक सुसाईड ड्रोन विमान तयार केले आहे. हे ड्रोन विमान आकाराने अतिशय लहान, पण अत्यंत शक्तिवान. हे ड्रोन विमान क्लाशनिकोव्ह कंपनी संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे पार पडणाऱ्या संरक्षण प्रदर्शनात सादर करणार आहे. दर दोन वर्षांनी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनात जगभरातील सर्व नामवंत कंपन्या आपल्या उत्पादनांसह सहभागी होत असतात. तसेच व्यवसाय वाढीसाठीही हे प्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. कंपनीने या नव्या ड्रोन विमानाला ‘केयूबी-यूएवी’ असे नाव दिले आहे. या क्षेत्रातील वैज्ञानिक आणि जाणकारांच्या मते, ‘केयूबी-यूएवी’ हे ड्रोन विमान आकाराने लहान असल्यामुळे ते नव्या तंत्रज्ञानाने सज्ज आणि आकाराने मोठ्या असलेल्या रणगाडे किंवा शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा गाड्यांसमोर उभं राहू शकणार नाही, अशी सर्वांची भावना होऊ शकते. परंतु, हे ड्रोन विमान अतिशय शक्तिशाली आणि आधुनिक आहे. इतके की, अगदी युद्धजन्य परिस्थितीतही या ड्रोनचा वापर सहजगत्या करता येईल.

 
कोणत्याही ठिकाणाहून संगणकाच्या साहाय्याने शत्रूवर बॉम्ब डागणे, ही या ड्रोन विमानाची एक खासियत. जाणकारांच्या मते, या ड्रोन विमानाची कमी किंमत ही त्याच्या दुरुपयोगाचेही कारण ठरण्याची शक्यता आहे. दहशतवादी सध्या मानवी बॉम्बचा उपयोग दहशतवाद पसरविण्यासाठी करताना दिसतात. परंतु, हे ड्रोन विमान दहशतवाद्यांचे आवडते हत्यार होण्याच्याही शक्यता नाकारता येणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. खऱ्या अर्थाने हे पहिले विमान ड्रोन असल्याचा दावा कंपनी करत आहे. परंतु, यापूर्वी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (इसिस) साध्या ड्रोनला बॉम्ब बांधून अशा प्रकारचे ड्रोन विमान तयार केल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. ‘इसिस’ने अशा प्रकारच्या ड्रोनचा वापर करून इराकमधील मोसूल आणि सीरियातील रिक्का या ठिकाणांवर असलेल्या सैन्याच्या तुकड्यांवर आणि अन्य ठिकाणांवर बॉम्ब डागून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. गेल्या वर्षी सीरियामध्ये असलेल्या रशियन सैनिकांच्या तुकड्यांवर अशाप्रकारने सुसाईड ड्रोन हल्ले करून ‘इसिस’ने हाहाकार माजवला होता. त्यावेळी ‘इसिस’ने अनेक बॉम्ब ड्रोनला लावून जीपीएसच्या मदतीने हमेइमइम एअरबेसवर हल्ला केला होता.
 

कसा असेल नवा केयूबी-यूएव्ही?

 

या नव्या ड्रोन विमानाची रुंदी ४ फूट असणार आहे. तसेच हे ड्रोन विमान ३० मिनिटांपर्यंत उडू शकणार आहे. या विमानाचा वेग ८० मैल प्रति तास असणार असून एका वेळी ६ पाऊंड दारूगोळा हे सोबत नेऊ शकणार आहे. तसेच एका जागी बसून संगणकाच्या साहाय्याने हे ड्रोन विमान ४० मैलांपर्यंत उडवता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे हे ड्रोन दहशतवाद्यांच्या हाती न पडता देशाच्या सुरक्षेसाठी कामी येईल, अशी आशा करायला हरकत नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 

जयदीप उदय दाभोळकर

बालपण विलेपार्ल्यात... दहावी पर्यंतचं शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात ... यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचे आणि झीमधून डिजिटल आर्ट्से शिक्षण. सध्या मुंबई तरूण भारतमध्ये उपसंपादक पदावर कार्यरत आहे. सामाजिक प्रश्नांची जाण त्यामुळे शक्य तितके सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न आणि डिफेन्सबाबत माहिती गोळा करण्याची आवड.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121