समर्थांची ‘काळ संकल्पना’ अशी आहे...
मूळ माया जगदीश्वर । पुढे अष्टधेचा विस्तार ॥
सृष्टिक्रमे आकार । आकारिले ॥१॥
समर्थांच्या मते, निराकार काळाला सृष्टिक्रमाने आकार प्राप्त झाला आहे. तो आकार कोणी दिलेला नाही. इथे सृष्टिक्रम याला समर्थ ‘काळचक्र’ असे संबोधित करतात.
हे अवघेची नसता निर्मळ । जैसे गगन अंतराळ ॥
गगन म्हणजे आकाश जसे निराकार, निर्मळ आणि उपाधीरहित असते, तसे या सृष्टित दुसरे काहीही नसते. असे निराकार आकाश, जिथे काळ आणि वेळ दोन्हीही नसते, ते म्हणजेच विश्व आहे.
उपाधीचा विस्तार जाला ।
इथे काळ दिसोन आला ॥
येरवी पाहता काळाला । ठावचि नाही ॥३॥
एक चंचळ एक निश्चळ । या वेगळा कोठे काळ ॥
चंचळ आहे तावत्काळ । काळ म्हणावे ॥४॥
आता मानवाच्या अस्तित्वाने या अवकाशाचा आणि भूतलाचा संदर्भ बदलतो. त्याला समर्थ म्हणतात, ‘येक चंचळ, येक निश्चळ.’ म्हणजे आपण एकाजागी स्थिर असलो तरी, पृथ्वीचे आवर्तन अव्याहत असते. आधुनिक विज्ञानाने पृथ्वीच्या आवर्तनांचा निश्चित अभ्यास मांडला आहे. मात्र, ४०० वर्षांपूर्वी समर्थ हा विज्ञाननिष्ठ विचार मांडतात.
आकाश म्हणजे अवकाश ।
अवकाश बोलिजे विलंबास ॥५॥
या ओव्यांच्या रचनेत समर्थांनी आकाश म्हणजेच अवकाश हे स्पष्ट करतानाच या अवकाशास ‘विलंब’ असे संबोधन वापरले आहे.
आता आपण याच संदर्भातला अल्बर्ट आइनस्टाइन यांचे गुरू हर्मन मिन्कोवस्की यांनी १९०६ या वर्षी मांडलेला ‘Space-Time-Continuum’ हा सिद्धांत पाहूया. ते लिहितात ...
The views of space and time which I wish to lay before you have sprung from the soil of experimental physics and therein lies their strength. They are radical. Henceforth space by itself, and time by itself, are doomed to fade away into mere shadows and only a kind of union of the two will preserve an independent reality.
स्वत: अल्बर्ट आइनस्टाइन आणि त्यांचे गुरू हर्मन मिन्कोवस्की यांच्या कितीतरी पुढे समर्थ होते याची प्रचिती आपल्याला मिळते.
सूर्या करता विलंब कळे । गणना सकळांची आकळे ।
पळापासून निवळे । युगा परियंत ॥६॥
पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष मास ॥
षड्मास वरीस युगासर । ठाव झाला ॥७॥
कृत त्रेता द्वापार काळी । संख्या चालली भूमंडळी ॥
देवांची आयुष्ये आगळी । शास्त्रे निरोपिली ॥८॥
या तीन ओव्यांमध्ये समर्थ काळ कसा मोजावा याचे शब्दरूप गणित सांगत आहेत. आपला श्वास-उच्छवास, नाडीचे ठोके, फुप्फुसांची क्रिया या स्वानुभवावर आधारित ‘काळ’ संकल्पनेचे हे विश्लेषण अचंबित करते. समर्थांच्या या ‘काळ’ संकल्पनेतील कालगणना संदर्भात प्राचीन भारतीय गणिताचा परिचय थोडासा विस्ताराने देणे आवश्यक आहे. प्राचीन भारतात मोठ्या कालगणनेसाठी मोठमोठ्या संख्यांचा वापर जसा केला जाई, तसाच सूक्ष्मकालगणनेसाठी ‘लव’, ‘निमिष’, ‘पल’ अशा संज्ञाचा वापर केला जात असे. सूक्ष्म कालगणनेसाठी ‘लव’ या लघुत्तम संज्ञेचा वापर होत असे.
या सूक्ष्म कालगणनेची सुरुवात लघुत्तम ‘लव’ या संज्ञेने होत असली तरी याचा पुढील विस्तार समजून घेणे रंजक आहे. ३० लव = १ त्रुटी, ३० त्रुटी =१ कला, ३० कला =१ काष्ठा, ३० काष्ठ =१ निमिष. इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी की, ‘१ निमिष’ म्हणजे ‘एक चुटकी’ वाजवायला लागणारा वेळ. याचा अर्थ एक लव म्हणजे निमिषाचा ८,१०,००० वा भाग आहे. पुढे ८ निमिष म्हणजे एक मात्रा. या एका मात्रेत एक श्वास पूर्ण होतो. ३६० निश्वास म्हणजे एक घटिका. १ घटिका म्हणजे एक मुहूर्त आणि ३० मुहूर्त म्हणजे एक अहोरात्र आणि एक अहोरात्र म्हणजे १४ तासांचा एक दिवस. अर्थात, आधुनिक काळ गणनेतील ३६५ दिवस म्हणजे एक वर्ष.
प्रशांत बाळकृष्ण कुलकर्णी हे समर्थ साहित्याचे वरिष्ठ अभ्यासक आहेत. विशेषकरून समर्थांच्या विज्ञान आणि गणिताचा सखोल अभ्यास त्यांनी मांडला आहे. कुलकर्णी यांनी समर्थ रामदास आणि आइनस्टाइन यांच्या तत्त्वज्ञानाची संतुलित तुलना करून त्याचे विश्लेषण केलेले आहे. समर्थांचा ‘काळ’ या संकल्पनेची विस्ताराने केलेली मांडणी आपण वर पाहिली. आता कुलकर्णी यांनी आइनस्टाइनची काळ संकल्पना अगदी सुलभ करून मांडली आहे ती अशी-
काळाची सापेक्षता असं सांगते की, या जगात काही ही लहान किंवा मोठे नाही...काहीही दूर किंवा जवळ नाही. तरुण नाही की म्हातारे नाही. गाडीत बसून द्रुतगती मार्गावरून पुण्याला जाताना सध्या साधारण चार तास लागतात. तेच आधुनिक तंत्रज्ञानाने हाच प्रवास एक किंवा दोन तासांत पूर्ण होणार आहे. प्रकाशापेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या ‘प्रकाशात’ जगणाऱ्या माणसाचे सापेक्ष आयुष्य अधिक असते. प्रकाशापेक्षा कमी वेगाने जाणाऱ्या ‘प्रकाशात’ जगणाऱ्या जीवाचे आयुष्य आपल्यापेक्षा खूप कमी असते. या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना एक सारखेच आयुष्यमान मिळालेले असते. दोघेही एकसारखेच सुखदु:खाचा अनुभव घेतात. कुलकर्णी काळाच्या या सापेक्ष संकल्पनेचा विस्तार करताना म्हणतात, “काही काम न करता फक्त एका जागी बसून राहणाऱ्या आळशी व्यक्तीला दिवस खूप मोठा वाटतो, तर सतत कामात व्यस्त राहणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण दिवस कमी पडतो.”
जागतिक कीर्ती आणि सन्मान प्राप्त झालेल्या आइनस्टाइन यांची बुद्धिमत्ता विलक्षण आहे, यात संशय नाही. मात्र, गणिताचा एक अंकही न लिहिता, ४०० वर्षांपूर्वी निव्वळ प्राचीन गणितातील संज्ञांचा लिखित शब्दांत वापर करून, काळाची सापेक्षता मांडणाऱ्या गणितज्ज्ञांनी समर्थांची प्रतिभा आणि प्रज्ञा तितकीच किंबहुना अधिक विलक्षण आहे. कारण, त्यांना कुठल्याही साधनांची उपलब्धता नव्हती. दासबोधातील दशक ६, समास ४ यातील एक ते सहा ओव्यांमध्ये, समर्थांनी ब्रह्मा-विष्णूची ईश्वरी वर्षे आणि कल्प या महत्तम कालगणनेचा विस्तार केला आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुगाची, पृथ्वीच्या निर्मितीपासूनची प्राचीन भारतीय कालगणना आणि गणिताची, शब्दांच्या माध्यमातून समर्थांनी मांडलेली संकल्पना, वाचक, अभ्यासकाला आश्चर्यचकीत करते. त्यांच्यासमोर नवी आव्हाने उभी करते. संत-महात्मे-महानुभावांच्या लिखित साहित्यातील चिह्न, चिह्नसंकेत आणि त्याचे गूढार्थ, सूक्ष्मार्थ याचा प्राथमिक अभ्यास रंजक आहे. तो संक्षिप्त स्वरूपांत जाणकार वाचकांसमोर मांडणे हे मोठेच आव्हान होते.
या सर्व संत-महात्मे-महानुभावांच्या विलक्षण प्रज्ञेला वंदन करून, आधुनिक देशी आणि परदेशी लेखकांच्या लिखाणातील चिह्नसंकेतांच्या, यापुढील अभ्यासाचा विस्तार या पुढील लेखांतून वाचकांसमोर ठेवणार आहे. आता वाचकांच्या लक्षात येईल की, चिह्न म्हणजे एखादा शब्द, एखादा संवाद, कादंबरी, पत्र किंवा नाटक संहितेतील एखादी व्यक्तिरेखा, लेखकाने निर्माण केलेली एखादी परिस्थिती, ज्याचे दर्शन, जाणीव अथवा शब्दार्थ एक असतो, तर प्रत्यक्षात त्याचा गूढार्थ किंवा अमूर्त संकेत अगदी वेगळाच असतो. एकच चिह्न, ज्याचा अर्थ वाचक किंवा प्रेक्षकाला साधारणपणे माहीत असतो, असे चिह्न नक्कीच वापरले जाते. परंतु, वर वर्णन केलेल्या वेगवेगळ्या अनेक चिह्नांचा समूह एकत्रितपणे आपल्या समोर येतो, त्यावेळी त्यातून अभिप्रेत होणारी अगम्य अथवा अमूर्त संकल्पना यांचा एक वेगळाच अनुभव असतो. उत्तम विषय-आशय, उत्तम लेखन आणि संवाद धारण करणाऱ्या नाट्यसंहितेचा अभिनित प्रयोग नाट्यगृहात सादर होताना प्रेक्षकांना असा अनुभव नेहमीच मिळतो. अर्थात, अनेक सिद्धहस्त मराठी लेखकांच्या संहिता वाचतानासुद्धा तितकाच रोमांचक अनुभव मिळतो. अशा थोर आधुनिक लेखकांचा परिचय पुढील लेखांत नक्की वाचा.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat