पुढच्या विधानसभा जागांचे वाटपच असे झाले आहे की, दोन पक्षांना एकत्र येऊन राज्य करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ते राज्य कसे करायचे, हे शिवसेनेला ठरवावे लागेल. भाजपवर कुरघोडी करण्याकरिता सेनेने श्रीरामजन्मभूमी मंदिराचा प्रश्न हाती घेतला. हा प्रश्न केवळ भाजपच सोडवू शकते, शिवसेना नाही, ही गोष्ट कोणालाही समजण्यासारखी आहे. पण, कुरघोडीच्या राजकारणात सेनेला मात्र ती समजत नाही.
'होणार नाही, होणार...' अशा गर्जना होता होता अखेर भाजप व शिवसेना यांची लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली. पं. बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षाने दीर्घकाळ वेगवेगळ्या पक्षांशी युती करून राज्य केले. तो अपवाद वगळता भाजप व सेनेसारखी दीर्घकाळ युती असणारी उदाहरणे नाहीत. याला अपवाद गेल्या विधानसभा निवडणुकांचा. पण, त्यावेळीही भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे धैर्य दाखवेल, असे शिवसेनेला वाटले नव्हते. किंबहुना, महाराष्ट्रात भाजप आपल्यावर नेहमीकरिता अवलंबून आहे, असे शिवसेनेने गृहीतच धरले होते. याची काही महत्त्वाची कारणेही होती. परंतु, जसजशी परिस्थिती बदलते तसे राजकीय संदर्भही बदलतात. असेच महाराष्ट्रातले राजकीय संदर्भ बदलले आहेत. परंतु, गेली साडेचार वर्षे हे वास्तव शिवसेनेला पचवता न आल्याने आजवर ज्या अवास्तव घोषणा ती करत राहिली, त्यातून तिने स्वतःभोवती अविश्वासार्हतेचे वातावरण तयार केले व त्या जाळ्यात स्वतःला अडकवून घेतले. अर्थात, राजकीय नेत्यांच्या काल केलेल्या घोषणांशी आजच्या घोषणांचा संबंध जोडायचा नसतो, याची लोकांना सवय झालेली असल्याने राजकीय नेतेही हे वास्तव गृहीत धरूनच वागत असतात. परंतु, बदललेले वास्तव जर सेनेने मनापासून स्वीकारले असते, तर परस्परांच्या विषयात जे शब्द वापरले गेले ते अधिक जपून वापरले गेले असते. प्रत्येक संस्था काही विशिष्ट कारणाने जन्माला येते व जोवर ते कारण अस्तित्वात असते व ती संस्था त्या कारणासाठी कार्यरत असते, तोवर त्या संस्थेचा प्रभाव वाढत जातो. परंतु, जेव्हा ते कारणच संपते किंवा ती संस्था त्या कारणाला न्याय देऊ शकत नाही किंवा त्या संस्थेपेक्षा अन्यही संस्था त्या कारणासाठी उभ्या राहातात, तेव्हा ती संस्था किंवा चळवळ कालबाह्य होते. काही वर्षांपूर्वी शरद जोशी यांनी, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळाली पाहिजे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन केले व त्याला केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. पण, आयुष्याच्या उत्तरार्धात शरद जोशींना उपेक्षित नेत्याचे जीवन जगावे लागले. याचे कारण त्यांनी केलेली मागणी ही सर्वमान्य झाली व या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा आक्रमक झालेले आणखी नेते निघाले. सेनेचेही तसेच घडू पाहात आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नंतर जे संघटना कौशल्य दाखविले, त्यामुळे अनेक वादळातही शिवसेना टिकून राहिली. पण, त्यात तिच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या.
शिवसेनेच्या स्थापनेला व तिच्या वाढीला काही ऐतिहासिक कारणे होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपल्यावर त्याकरिता निर्माण झालेल्या समितीतून सर्व पक्ष बाहेर पडले. प्रत्येक पक्षासोबत त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडले, तरी त्या आंदोलनामागे असलेले मराठी समूहमन शिल्लक होते व ते नेतृत्वविहीन होते. संयुक्त महाराष्ट्र झाला असला तरी मुंबईतला नवशिक्षित मराठी माणूस हा कामगार, कारकून अशा वर्गातच काम करीत होता. यावरचे सर्व अधिकारी अमराठी होते व ते त्यांच्या प्रांतातील लोकांना प्राधान्य देत होते. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रात, पण मुंबईत मराठी माणूस कुठे? असा प्रश्न शिवसेना संस्थापकांनी उपस्थित केल्यावर त्याला प्रचंड उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. मुंबईत सेना ही शक्ती बनली. त्याचवेळी कलकत्त्यात कम्युनिस्टांचा प्रभाव वाढत होता. मुंबईत तो वाढू नये म्हणून शिवसेनेचा उपयोग होऊ शकतो, हे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या लक्षात आले. त्यांनीही शिवसेनेला संरक्षण दिले. त्यावेळी शिवसेनेला 'वसंतसेना' म्हटले जात असे. मुंबईनंतर ठाणे व कोकण या मुंबईशी निगडित असलेल्या प्रदेशावर सेनेचा प्रभाव निर्माण झाला. परंतु, कालांतराने शिवसेनेची चळवळ अवरुद्ध झाली. तिचा विकास थांबला. याची दोन कारणे होती. मुंबईव्यतिरिक्त अन्यत्र मराठी माणसावर अन्याय होत नसल्याने महाराष्ट्रातील इतर भागांत शिवसेनेला पाठिंबा मिळू शकला नाही. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, मराठी स्वभावातच इतर राज्यांप्रमाणे प्रादेशिकता नाही. आज अनेक पत्रपंडित इतर प्रांतांप्रमाणे शिवसेनेचा एक राज्यकर्ता प्रादेशिक पक्ष म्हणून विकास का झाला नाही, असा प्रश्न विचारत आहेत. हे त्यांचे मराठी भावविश्वाबद्दलचे अज्ञान आहे. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने जे मराठी साम्राज्य निर्माण झाले, त्यामुळे महाराष्ट्राचा अखिल भारतीय दृष्टिकोन तयार झाला आहे. त्याचा परिणाम असा की, विसाव्या शतकात निर्माण झालेल्या अनेक चळवळींना एकतर महाराष्ट्रातून सुरुवात झाली किंवा त्यांच्या स्थापनेत मराठी लोकांचा पुढाकार होता. एकेकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे राजकारण पुण्यातून चालत असे. कारण, रानडे, गोखले व टिळक हे तिन्ही महत्त्वाचे नेते पुण्यातील होते. भारताची फाळणी झाली तेव्हा त्याचे महाराष्ट्राला जेवढे दुःख झाले, तेवढे पंजाब आणि बंगाललाही झाले नसेल. त्यामुळे मराठी सुप्त मनात हा अखिल भारतीय दृष्टिकोन तयार झालेला आहे. मराठी मन इतर प्रांतीयांप्रमाणे प्रादेशिक बनू शकत नाही, ही गोष्ट चांगली की वाईट, याबाबत प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. पण, त्यामुळे वस्तुस्थिती बदलू शकत नाही.
याचाच अनुभव शरद पवारांना आला. त्यांचा पक्ष म्हणायला 'राष्ट्रीय' असेल, पण तो महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पण, तोही स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता मिळवू शकत नाही. राज ठाकरे यांची तर शोकांतिका आणखी वेगळी. शिवसेनेशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी मराठीपणाला केंद्रस्थान दिले. पण, आता तोच त्यांचा अडसर ठरला आहे. त्यांना आपल्या अस्तित्वासाठी आघाडीबरोबर जायचे आहे, पण त्यांच्या उत्तर भारतीयांविरुद्धच्या मोहिमेमुळे काँग्रेस मनसेला बरोबर घ्यायला तयार नाही. उलट शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावर तिला नवसंजीवनी मिळाली. जी शिवसेना मुंबई, ठाण्यापर्यंत मर्यादित होती, ती सर्व महाराष्ट्रभर पसरली. आज जे शिवसेनेचे सामर्थ्य दिसते, ते तिने हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे! ज्यावेळी भारतीय जनता पक्ष उघड हिंदुत्वाची भूमिका घ्यायला कचरत होता, तेव्हा काळाची हाक ओळखून शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्वाची उघडउघड भूमिका घेतली व त्या आधारे विजयही मिळवून दाखविला. त्यामुळे आयुष्यभर हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या जनसंघाच्या वारसदार पक्षाला, भारतीय जनता पक्षाला दुय्यम भूमिका घेऊन, शिवसेनेला आपल्याबरोबर घेणे भाग पडले. शिवसेना प्रभावी होण्याआधी आपण केलेल्या कोणत्याही आघाडीत शेतकरी कामगार पक्ष असला पाहिजे, असा भाजपचा आग्रह असे. वास्तविक काही मतदारसंघ वगळता शेकापची फारशी शक्ती नव्हती. पण, आपल्यासोबत बहुजनांचा चेहरा असला पाहिजे म्हणून तेव्हा भाजपला शेकापची आवश्यकता भासे. शिवसेना बरोबर आल्यावर भाजपची ती गरज संपली. भाजपने शिवसेनेला मध्यमवर्गीय प्रतिष्ठा मिळवून दिली, तर सेनेने भाजपला बहुजन समाजाचा आधार मिळवून दिला. बाळासाहेबांचा पिंड कलाकाराचा होता. कलाकाराला सुप्त मनातली स्पंदने जाणवत असतात, याची जगाला दोन वेळा प्रचिती आली. मराठी मनाच्या स्पंदनांना प्रतिसाद देऊन त्यांनी शिवसेनेची स्थापना केली, ही पाहिली प्रचिती व इतरांना जाणविण्याच्या आधी त्यांना हिंदुत्वाची लाट जाणवली, ही दुसरी प्रचिती. त्यांच्यातील कलाकारामुळे त्यांचा समूहमनावर कायमच ताबा राहिला. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचा वारसा आला, पण समूहमनाला संमोहित करण्याचा वारसा आला नाही. उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिवसेना टिकविण्यासाठी अनेक प्रकारची आव्हाने होती. राणे व राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यांच्याबरोबर जुने नेतृत्व तोंडदेखले होते, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वानंतर हिंदुत्वासाठी सेनेकडून प्रमाणपत्र मिळविण्याची भाजपची गरज संपली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat