मागील लेखात, गर्भधारणेपासून पहिल्या तीन महिन्यांपर्यंतची गर्भवाढ कशी होते, हे वाचले. आजच्या लेखात आता पुढील वाढीविषयी जाणून घेऊया.
पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भाचे वजन खूप वाढत नाही, पण त्याचा आकार झपाट्याने बदलत जातो. पहिल्या महिन्यात कालवणासारखा दिसणारा गर्भ दुसर्या महिन्यात थोडा घन होतो आणि त्याची आवृत्ती बदलते. तिसर्या महिन्यात त्या घनस्वरूपाचे पाच पिंड (Overgrowths) होतात. प्रत्येक पिंडामधून विविध शरीर अवयव पुढे विकसित होतात. शारीरिक वाढीबरोबरच हृदयाचे कार्य हळूहळू तिसर्या महिन्यात सुरू होऊ लागते. चौथ्या महिन्यात गर्भाचे हृदय कार्य करू लागते. गर्भामध्ये ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये उत्पन्न होऊन त्यांच्या इच्छा मातेमार्फत जाणविल्या जातात. ‘डोहाळे लागणे’ असे जे बोलीभाषेत म्हटले जाते, त्याचे हे शास्त्रीय कारण आहे. गर्भामध्ये उत्पन्न होणार्या इच्छांची पूर्ती मातेच्या शरीरामार्फत केली जाते. ही इच्छा आहारीय स्वरुपाची असू शकते किंवा राहणीमान, विचार या प्रकारेही भिन्न असू शकते. उदा. गर्भिणीला स्वत:ला विशिष्ट चव (गोड, तिखट, आंबट इ.) आवडत नसेल, पण तिसर्या-चौथ्या महिन्यात खाण्याची आवड बदलू शकते. पूर्वी थंडी, उकाडा सहन होत नसेल, पण गर्भवती अवस्थेत विपरित होऊन न आवडणारा ऋतू आवडू लागतो. कला क्षेत्रात खूप रुची नसताना चित्रकला, संगीत इ. अधिक आवडू लागते. विशिष्ट वास, पेहराव आवडू शकतो इ. हे जे बदल होतात, ते केवळ गर्भिणी अवस्थेपुरते मर्यादित राहतात. स्त्री प्रसुत झाल्यावर म्हणजे बाळ जन्माला आल्यावर त्या स्त्रीच्या आवडी-निवडी पूर्वीसारख्या होतात. याचाच अर्थ गर्भ आपली आवड-निवड मातेमार्फत पूर्ण करून घेतो. गर्भिणीला म्हणून ‘दौहृदिनी’ असेही म्हटले जाते. चौथ्या महिन्यात गर्भाचा आकार वाढतो. थोडं वजन वाढतं. सर्व अंग-अवयव स्पष्ट होतात. त्यांचा आकार अगदी लहान असतो. पण, हा मनुष्य गर्भ आहे, असा त्या गर्भाचा आकारमान होतो. पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भ थोडा अस्थिर असतो. पण, चौथ्या महिन्यात त्याच्यात स्थिरता येते. असे बघितलेही जाते की, पहिले तीन महिने पूर्ण होईपर्यंत ‘दिवस राहिलेत’ म्हणून जवळच्या व्यक्तींना सोडल्यास इतर आप्तेष्टांना सांगितले जात नाही. चौथ्या महिन्यापासून गर्भिणीच्या शारीरिक बदलांमुळे ते स्वाभाविकताच कळतेही आणि सांगितलेही जाते.
पाचव्या महिन्यात गर्भाचे मन व्यक्त होते. त्याचबरोबर अन्य महिन्यांच्या सापेक्ष पाचव्या महिन्यात रक्ताची आणि मांस धातूंची ((Blood & Muscles) अधिक वाढ होते. गर्भ पोटात असताना त्याच्या शरीरावर बारीक लव असते. गर्भाशयात गर्भाभोवती गर्भजल असते. या जलीय अंशाचा गर्भाच्या त्वचेवर शरीरावर परिणाम होऊ नये, म्हणून ही लव गरजेची असते. यावर एक चिवट द्राव (vernix caseosa) चिकटतो, ज्यामुळे गर्भाची त्वचा सुरक्षित राहते. ही लव पाचव्या महिन्यात थोडी जास्त वाढते. शरीरातील विविध अंग-अवयव तयार होत असतात. काहींचे कार्य सुरू होते, तर काहींची उत्पत्ती होते. गर्भाचे यकृत पाचव्या महिन्यात निर्माण होते. शरीरापेक्षा या महिन्यात डोकं मोठे असते. कारण, विविध skull bones वेगवेगळी असतात. त्यात भेगा असतात. त्या नंतर जोडल्या जातात. याचबरोबर गर्भाच्या आतड्यांचेही कार्य सुरू होते. थोडी थोडी आतड्यात मलसंचिती होऊ लागते. या महिन्यात Vertebral Column (पाठीचा मणका) तयार होतो. पाठीचा मणका मानेपासून माकड हाडापर्यंत असतो. याची व्यवस्थित निर्मिती होणे अत्यंत गरजेचे असते. शारीरिक आणि मानसिक वाढ नीट झाली आहे की नाही ते यावरून कळते. या सर्व अवयवांच्या निर्मिती आणि कार्याबरोबर गर्भाचा आकारही थोडा अजून वाढतो. गर्भाची हालचालगर्भिणीला जाणवू लागते. तिसर्या महिन्यापर्यंत जी लक्षणे सुप्त स्वरूपात असतात, ती हळूहळू चौथ्या-पाचव्या महिन्यापासून गोचर होऊ शकतात.
सहाव्या महिन्यात गर्भाच्या शारीरिक वाढीबरोबरच बौद्धिक वाढही होऊ लागते. मेंदूचा विकास होतो.ज्ञानेंद्रिये संपूर्ण उत्पन्न होतात. मातेच्या भोवतालचे ज्ञान गर्भाला होण्यास सुरुवात होते. म्हणूनच बाळाला गाणी ऐकवा, बाळाशी बोला इ. उपदेश दिले जातात. अभिमन्युनेही चक्रव्यूहाबद्दल सुभद्रेच्या कुशीत असतानाच जाणून घेतले असे आपणास माहीत आहेच.महाभारतातील प्रसंग याचबरोबर गर्भाची त्वचा, त्यावरील केस, नखे आणि वर्ण या सर्व गोष्टी सहाव्या महिन्यात वाढतात आणि त्यांचे कार्य सुरू होते. डोळ्यांच्या पापण्याही याच महिन्यात तयार होतात. अस्थी व स्नायू अधिक बळकट होतात. त्यांची वाढ होते. ताकद वाढते आकारमान वाढतो. सातव्या महिन्यात गर्भाची संपूर्ण वाढ होते. विविध अंग-अवयव निर्माण होतात. फक्त शारीरिक ताकद व वजन अजून कमी असते. पण, जर काही कारणास्तव सातव्या महिन्यात प्रसुती झाली, तर हा गर्भ जीवंत राहण्याची शक्यता असते. फक्त त्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. आधीच्या सहा महिन्यांत वजन वाढवण्याचे प्रमाण त्यामानाने कमी असते. पण, सातव्या महिन्यापासून गर्भाची उत्तमरित्या वाढ होऊ लागते.
आठव्या महिन्यात ‘ओज’ (यालाच प्राणशक्ती, जीवनशक्ती म्हणता येईल, vital force) अस्थिर असतो. यामुळे कधी ते गर्भात असते, तर कधी मातेच्या शरीरात प्रवेशित होते. जर आठव्या महिन्यात जन्म झाला, तर ओज गर्भात असल्यास तो गर्भ जीवंत राहतोअन्यथा दगावतो. त्यामुळे आठव्या महिन्यात प्रसुती टाळली जाते. अन्य अंग-अवयव व वजन यांची वाढ आठव्या महिन्यातही सुरूच असते. नवव्या महिन्यात गर्भ संपूर्णत: विकसित झालेला असतो. त्याचा रोज थोडा थोडा विकास होत राहतो. वजन वाढत राहते. ३६व्या ते ४०व्या आठवड्यापर्यंत प्रसुती कधीही होऊ शकते. सोनोग्राफीमध्ये दिलेल्या तारखेलाच प्रसुतीव्हावी, असा अट्टाहास धरू नये. गर्भाची वाढ झाल्यावर गर्भ बाहेर येतो. काही वेळेस स्वाभाविक प्रसुती होत नाही. पण, त्याचा निर्णय अन्य काही घटकांवर अवलंबून असतो. तारखेपुढे दिवस गेले फक्त एवढेच कारण असू शकत नाही. वरील लेखातून गर्भाची गर्भाशयात होणारीमासानुमासिक वाढ आपण बघितली. या वाढीचा स्त्री शरीरावर म्हणजे गर्भिणीवरही परिणाम होतो. त्याबद्दल पुढच्या लेखात जाणून घेऊया.
(क्रमशः)
९८२०२८६४२९
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat