हाऊ इज दी जोश?

    17-Feb-2019   
Total Views | 183



पुलवामाच्या घटनेमुळे सगळा देश दु:खाच्या गर्तेत बुडालेला आहे. मात्र, या अत्यंत दु:खद घटनेमध्ये आनंदी होणारेही काही सैतानी मनाचे लोक दिसले. एनडीटीव्हीमध्ये जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या निधी सेठ या महिलेने फेसबुकवर मत मांडले की, ‘काल्पनिक ५६ इंचावर ४४ जण भारी पडले.’ सारा देश दु:खात असताना तसेच दहशतवाद्यांविरुद्ध एकवटला असताना या महिलेला ‘५६ इंचां’ची आठवण व्हावी? पंतप्रधानांवर ४४ जणांचा मृत्यू भारी पडेल, याचा तिला आनंद झाला होता. आता या जवानांच्या मृत्यूमुळे पंतप्रधान अडचणीत येतील, अशी तिची मानसिकता. ‘उरी’ चित्रपटातला सैनिकांची देशप्रेमी ऊर्जा दर्शविणारा ‘हाऊ इज दी जोश’ हा डायलॉग पंतप्रधानांनीही एका कार्यक्रमादरम्यान उद्गारला होता. त्याचे विडंबन करून तिने ‘हाऊ इज दी जैश?’ असा टोमणाही मारला. निधी भारतातच राहते. भारतातच नोकरी करते. भारतातच तिचे असले नसले कोटकल्याण झाले आहे. मात्र, आपल्या देशावरचा हल्ला, सैन्यावरचा हल्ला तिच्या मनाला जराही स्पर्शत नाही. उलट ती ‘जैश’च्या अतिरेकी कृत्याची भलामण करताना दिसते. असो, तिच्या विधानावर फेसबुकवर नागरिकांनी तिला चांगलेच फैलावर घेतले. तिने ती पोस्ट काढून टाकली. तिच्या या कृत्यासाठी एनडीटीव्हीने तिला म्हणे, निलंबित केले आहे. एक भारतीय नागरिक म्हणून वाटते की, निधीसारख्या मनोवृत्तीची माणसे देशातल्या कोणत्याही संस्थेमध्ये काम करताना देशाचे, समाजाचे हित जपतील का? दुसरीकडे ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने वर्तमानपत्रात पुलवामाची बातमी देताना ‘हा हल्ला स्थानिक भारतीयाने केला’ असे बेधडक लिहिले. हे लिहिताना या वर्तमानपत्राची देशाबद्दलची बांधिलकी कुठे मेली? त्यानंतर या वर्तमानपत्राने खुलासा केला ही गोष्ट वेगळी. ‘गुजरात समाचार’ या वर्तमानपत्राचेही असेच देशविघातक वर्तन. देशाकडून सगळ्या सुविधा उपटताना देशावर होणाऱ्या हल्ल्याची बातमी काय तारतम्याने द्यावी, याचेही भान नसणाऱ्या या वर्तमानपत्रांना काय म्हणावे? ‘मानवी संवेदनशीलता’ आणि ‘करुणा’ याचे दैवी देणे सगळ्यांनाच लाभते असे नाही. पण माणसाचा क्रूर हकनाक मृत्यू दगडालाही पाझर फोडतो. त्यामुळे ४४ वीर जवानांच्या मृत्यूमध्ये ज्यांना आनंद वाटला, त्या साऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मग त्यांना कळेल की हाऊ इज दी जोश...!!!

 

भूताळी अंधश्रद्धा

 

महाराष्ट्राच्या जव्हार तालुक्यात नुकतीच धक्कादायक घटना घडली. संती टेंबरे ही ६० वर्षांची महिला स्वत:चे आयुष्य वाढण्यासाठी पोराबाळांवर जादूटोणा करून त्यांना आजारी पाडते, असे मालवण टेंबरे याला वाटले. त्याने मग संतीवर कोयत्याने वार केले आणि तिला दगडाने ठेचून मारले. त्याची बातमी आली. पण या बातमीच्या अंतरंगात असलेले अंधश्रद्धेचे कंगोरे अस्वस्थ करून जातात. आजारी पडणे, अपयश येणे, मृत्यू होणे या गोष्टींना विशिष्ट नैसर्गिक आणि परिस्थितीचे संदर्भ असतात, हे कोणीही सांगेल. पण असे असतानाही याच कारणांसाठी आजही समाजामध्ये कोणालातरी कारणीभूत समजून ‘भूताळी’ ठरवले जाते. ‘डायन, डाकिन’ म्हटले जाते, ही काही लोकांनी ठरवलेली ‘भूताळी’ स्त्री खरेच इतकी ताकदवान असते का? की केवळ तिला वाटते म्हणून एखादी व्यक्ती आजारी पडेल, मृत्यू पावेल किंवा कर्जबाजारी होईल किंवा अपयशी होईल? छे, आजपर्यंत असा प्रत्यक्ष सत्यदर्शनी पुरावा कोणीही दिला नाही आणि देऊच शकणार नाही. खरे तर, ‘भूताळी’ही ठरवले जाते कोणाला तर जिला मुलंबाळ नाही ती निपुत्रिक किंवा विधवा किंवा वयोवृद्ध स्त्री. का? तथाकथित समाजरचनेत या स्त्रिया खरोखरच असहाय्य असतात. त्यांचा कायद्याने खून तर करू शकत नाही. बरं समाजाला नातेवाईकांचीही भीती आहेच. त्यामुळे जर त्या नकोशा स्त्रीचा आणि भूताखेताचा, काळ्या जादूचा संबंध दाखवला, तर तिचा खून केला तरी कोणीही तिची बाजू घेणार नाही, असा दूरगामी विचार यामागे आहे. देशात हजारो स्त्रिया या प्रथेच्या बळी ठरल्या आहेत. झारखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, बिहार या राज्यांत तर स्त्रीला ‘भूताळी’ समजून खून करण्याच्या घटना नेहमीच्याच. या पार्श्वभूमीवर संती टेंबरे या महिलेचा खून समाजाची मानसिकता दर्शवतो. दुसरीकडे मालवण या तरुणाला संतीमध्ये ‘भूताळी’ दिसणे ही गोष्टही चिंताजनक आहे. अंधश्रद्धेचा पगडा समाजात किती खोलवर रूजला आहे, याची प्रचिती येते. मात्र, काही का असेना, एका असहाय्य वृद्धेला दगडाने ठेचणाऱ्याला विचारावेसे वाटते, ‘दगडाने ठेचत असताना, कोयत्याने वार करत असताना कुठे गेले होते तिचे भूताळीपण? भूत आणि राक्षस तर तुझ्यात होता, जो एका असहाय्य स्त्रीवर क्रूर हल्ला करत होता.” अंधश्रद्धेच्या चक्रात समाजवनाचे पिळणे, रक्तबंबाळ होणे कधी थांबेल?

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

'आयटीआयच्या' विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार, दि. ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121