तिबेटी स्वातंत्र्यलढ्याची बिकट वाट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2019   
Total Views |



चीन तिबेटवर आक्रमण करत आहे, ज्यामध्ये मोठी धरणे बांधली जात आहेत, नद्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. तिबेटमध्ये पर्यावरण आक्रमण होते आहे. एवढेच नव्हे, तर दलाई लामा यांच्या निवृत्तीनंतर पुढच्या दलाई लामावर चीनचे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये तिबेटमध्ये नेमके काय होणार, चीनविरोधी लढ्यात त्यांना यश मिळेल का, समाजमाध्यमांचा वापर, भाषणे देऊन काही फरक पडेल का, तिबेटींना हवे असलेले स्वातंत्र्य चीन देऊ करेल का, या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असल्याचे दिसते.


तिबेट पठारावर प्रचंड हिमवृष्टी होते, त्यामुळे त्याला थर्ड पोल असे मानले जाते. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव हे दोन ध्रुव आहेत. मात्र, गोड पाण्याचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तिबेट! जगाचे २२ टक्के गोड पाणी तिबेटमध्ये आहे. आशिया खंडातील जवळपास ३ अब्ज लोकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. तिबेटच्या पठारावरून निरनिराळ्या नद्या उगम पावतात. जसे- ब्रह्मपुत्रा, गंगा आणि भारतात येणाऱ्या अनेक नद्या. त्याशिवाय इरावती आणि इतर नद्या तिबेटच्या पठारावर उगम पावून दक्षिण-पूर्व आशियात प्रवेश करतात. तिबेट पठारावर सर्वाधिक प्रमाण ग्रास लॅण्डचे म्हणजेच गवताळ प्रदेशाचे आहे. काही नद्यांची खोरी वसलेली आहेत. तिबेटवर चीनने आक्रमण करून त्यावर कब्जा केला. आत्ता आपण ज्याला तिबेटी ऑटोनॉमस रिजन या नावाने ओळखतो, तो मूळ तिबेट नाही. तिबेटचे इतर भाग चीनने आपल्या काही राज्यात सामील करून घेतले आहेत.

 

तिबेटवर चीनची विविध आक्रमणे

 

आज तिबेटवर चीन विविध प्रकारे आक्रमण करतो. एक आक्रमण म्हणजे सांस्कृतिक आक्रमण, मूळ तिबेटन संस्कृतीला बरबाद करून चिनी संस्कृती रुजवायची. दुसरे आर्थिक आक्रमण, त्याप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे. तिबेटची अर्थव्यवस्था ही शेती, मेंढ्या पाळणे आणि पर्यटन यावर अवलंबून आहे. त्यामुळे इथल्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तिसरे, तिबेटचे आणि इतर देशांचे पाणी पळवण्याचे कारस्थान. तिबेटमधील पाणी चीन आपल्या दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आहेतिबेटचे चिनीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. चिनी नागरिक तिबेटमध्ये राहायला जात आहेत. तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासाची लोकसंख्या २ लाख असून तिथे चिनी लोकांची संख्या १ लाख तर मूळ तिबेटन रहिवाशांची संख्या केवळ १ लाख आहेत. म्हणजेच निम्मे चिनी आणि निम्मे तिबेटी नागरिक इथे वसले आहेत. चीनने तिबेटवर केलेल्या हल्ल्यात १० लाखाहून जास्त तिबेटी लोक मारले गेले. १९८०, १९९० आणि २००८ या वर्षांमध्येही चीनविरुद्ध उठाव झाला होता. परंतु, त्याला चिरडून टाकण्यात आले. जागतिक स्तरावर त्याची फारशी दखलही घेतली गेली नाही.

 

तिबेट कब्जात का घ्यायचा?

 

चीनने तिबेट कब्जात घेतला आहे, त्याला अनेक कारणे आहेत. तिबेटमध्ये गोड पाण्याचे प्रमाण खूप अधिक आहे व चीनच्या दुष्काळी भागात असलेल्या पाण्याची कमतरता दूर कऱण्याची क्षमता तिबेटकडे आहे. त्यासाठी ब्रह्मपुत्रा नदी चीनच्या बाजूला वळवावी लागणार आहे. तसेच पवनऊर्जेतही जगातील सर्वात जास्त प्रमाणात तिबेटमध्ये ही ऊर्जा तयार केली जाऊ शकते. सौरऊर्जेची निर्मिती करण्यासाठीही तिबेट हे उपयुक्त स्थान आहे. जगामध्ये जितकी सौरऊर्जेची निर्मिती केली जाते तेवढी किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त सौरऊर्जा निर्मितीची ताकद एकट्या तिबेटन पठारावर आहे. जिओ थर्मल म्हणजे जमिनीच्या पोटातील गरम पाण्याच्या/झऱ्याच्या मदतीने ऊर्जानिर्मिती करण्याची क्षमतासुद्धा तिबेटमध्ये आहे. तिबेटमध्ये विविध प्रकारची खनिजसंपत्ती आहे. चीनने या सगळ्या खाणकामाकरिता अनेक ठिकाणी खोदकाम सुरू केले आहे. ब्रोमाईड किंवा इतर खनिजांपासून चीनला तिबेटमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते. ज्या वेळेला तिबेटी भारतात आले तेव्हा दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशालामध्ये आपले सरकार स्थापन केले. परंतु, त्याला जगातील कुठल्याही राष्ट्राने मान्यता दिली नाही. २०१३ मध्ये दलाई लामा यांना वाटले की, लोकशाही पद्धतीने निर्माण झालेले सरकार तिबेटी लोकांसाठी स्थापन करावे, यासाठी निवडणुका होऊन नव्या सरकारची निर्मिती करण्यात आली. त्याचे मुख्यालय धर्मशाला इथे आहे.

 

५०० तिबेटीयन लोकांवर एक पोलिस कर्मचारी

 

आज चीन तिबेटमधील रहिवाशांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना चीनविरुद्ध आंदोलने करण्याची परवानगी नाही. जे चीनविरुद्ध बोलण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांना पकडून शिक्षा केली जाते. शाळेतील शिक्षक, धर्मगुरू किंवा लेखक, आंदोलक किंवा पर्यावरणवादी कार्यकर्ते, तिबेटविषयी चांगले लिहिणारे कवी, गायक या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे. तिबेटमध्ये चिनी सैनिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्याशिवाय तिथे पोलिसही मोठ्या संख्येने तैनात आहेत. प्रत्येक ५०० तिबेटीयन लोकांवर एक पोलिस कर्मचारी लक्ष ठेवून आहे, तरीही तिबेटी लोकांची आंदोलने सातत्याने सुरू असतात. त्याचे दोन प्रकार आहेत - एक, समूहाने केलेली आंदोलने, दुसरे, अनेकवेळा तिबेटच्या विविध भागात एकेकटा माणूस हाती फलक घेऊन चीनविरुद्ध आंदोलन करतो. त्यापैकी एक मोठा दुर्दैवी प्रकार म्हणजे स्वतःला जाळून घेणे. आतापर्यंत १६० तरुणांनी तिबेट स्वतंत्र व्हावा म्हणून स्वतःला जाळून आत्मदहन केले आहे. तिबेटच्या संस्कृतीवरही हल्ला होत आहे. तिबेटी भाषा पुढे वाढू नये यासाठी त्यावर बंदी आहे. तिबेटी गाणी, कविता, कथा यांच्यावर लक्ष ठेवले जाते. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा फोटो लावण्याची परवानगी नाही. ६ हजाराहून जास्त तिबेटन मॉन्सेन्टरीज नष्ट करण्यात आल्या आहेत.

 

आण्विक युद्ध तिबेटमध्ये

 

तिबेट पठारावर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र आणि आण्विक शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. अमेरिका किंवा कुठल्याही महाशक्तीबरोबर आण्विक युद्घ झाले, तर त्याला प्रतिकार हा तिबेटमध्ये केला जाईल. जिथे नुकसान तिबेटचे होईल, चीनच्या मुख्य भूमीचे नाही. आण्विक परीक्षण जमिनीच्या अंतर्गत आणि आकाशात अशा दोन्ही प्रकारे केले जाते. आज चीनने तिबेटमध्ये ३०० ते ४०० आण्विक बॉम्ब ठेवले आहेत. चीनमध्ये आण्विक ऊर्जा रिअॅक्टरच्या मदतीने वीजनिर्मिती केली जाते. त्यातून तयार होणारे आण्विक टाकाऊ पदार्थ नंतर जमिनीच्या आत गाडले जातात. हे टाकाऊ पदार्थ इतके ताकदवान असतात की, पुढील २०० ते ३०० वर्षे त्यातून किरणोत्सर्ग बाहेर पडू शकतो.

 

स्वतंत्रता चळवळ कमजोर होत आहे?

 

तिबेटीयन नागरिकांची संख्या वाढू नये म्हणून तिबेटीयन मुलींवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया लादली जाते. हजारो तिबेटीयन मुलींना परवानगीशिवाय या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. जे तिबेटी कार्यकर्ते रेझिस्टन्स चळवळीत भाग घेतात त्यांना राजकीय कैदी म्हणून अटक केली जाते आणि त्यांना विकास कामांमध्ये जबरदस्तीने मजुरीच्या कामास ठेवले जाते किंवा चिनी सैन्याकरिता काम करण्यास भाग पाडले जाते. ज्या तिबेटी लोकांना चीनने पकडून छळछावणीत ठेवले आहे, त्यांची नेमकी संख्याही कुणालाही माहीत नाही. तिबेटी चीनविरुद्ध अमेरिका, भारत, युरोप या देशांत आवाज उठवत असतात. त्यासाठी समाजमाध्यमे, युट्यूब यांचा वापर केला जातो. अनेक ठिकाणी चिनविरोधी घोषणा असलेल्या टोप्या, शर्ट वाटले जातात. तिबेट सरकारचे प्रतिनिधी देशादेशात फिरून चीनच्या आक्रमणाविषयी प्रचार करत असतात. परंतु, या सगळ्यांना फारसे यश मिळत नाही. जे तिबेटीयन पळून भारतात आले होते, त्यांचा चीनशी असलेला संबंधही हळूहळू तुटतो आहे व स्वतंत्रता चळवळ कमजोर होत आहे.

 

तिबेटी स्वातंत्र्यलढ्याची बिकट वाट

 

थोडक्यात, चीन तिबेटवर आक्रमण करत आहे, ज्यामध्ये मोठी धरणे बांधली जात आहेत, नद्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. तिबेटमध्ये पर्यावरण आक्रमण होते आहे. एवढेच नव्हे, तर दलाई लामा यांच्या निवृत्तीनंतर पुढच्या दलाई लामावर चीनचे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये तिबेटमध्ये नेमके काय होणार, चीनविरोधी लढ्यात त्यांना यश मिळेल का, समाजमाध्यमांचा वापर, भाषणे देऊन काही फरक पडेल का, तिबेटींना हवे असलेले स्वातंत्र्य चीन देऊ करेल का, या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक असल्याचे दिसते. इतर देशात राहून तिबेटीयनच्या स्वातंत्र्यलढ्याला यश मिळेल, असे वाटत नाही. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते, शांततेच्या मार्गाने तिबेटी देत असलेला लढा, त्यांची सॉफ्ट पॉवर, आध्यात्मिक शक्ती ही चीनमधील हुकूमशाहीपेक्षा अधिक परिणामकारक ठरू शकेल. जेव्हा सोव्हिएत रशिया फुटला, अशा प्रकारे देश वेगळे होतील, अशी कल्पना कोणाच्याही मनात आली नसेल. त्यामुळे तिबेटी लोकांना असे वाटते की, कधीतरी चीनच तुटेल आणि तिबेटला आपले स्वातंत्र्य मिळण्यास मदत होईल. मात्र, तिबेटी स्वातंत्र्यलढ्याची वाट बिकट आहे. त्याला भारतीयांनी मदत करण्याची गरज आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@