भिवंडी : राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांनी एकत्र येत महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले. परंतु या आघाडीला भिवंडीत काँग्रेसने मोठा धक्का दिला आहे. भिवंडीच्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने केवळ ४ नगरसेवक निवडून आलेल्या 'कोणार्क विकास आघाडी'ने भिवंडीच्या महापौर पदावर बाजी मारली. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना महापौरपदाचा मान मिळाला.
९० सदस्यांच्या भिवंडी महापालिकेत काँग्रेसकडे तब्बल ४७ नगरसेवक आहेत. मात्र, तब्बल १८ नगरसेवक फुटल्याने निकाल फिरला. कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना ४९ तर, काँग्रेसच्या रिषिका रांका यांना ४१ मते मिळाली. प्रतिभा पाटील यांना भाजपच्या २० , काँग्रेसच्या १८ बंडखोर, स्वपक्ष अर्थात कोणार्क विकास आघाडीच्या ४, समाजवादी पक्षाच्या २, रिपाइं (एकतावादी) गटाच्या ४ आणि एका अपक्ष नगरसेवकाने मतदान केले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला दिलासा मिळाला. काँग्रेसच्या इम्रान वली मोहम्मद खान यांची उपमहापौरपदी निवड झाली. त्यांनी शिवसेनेचे बाळाराम चौधरी यांचा ९ मतांनी पराभव केला. भिवंडी महापालिकेत याआधी काँग्रेसचे जावेद दळवी महापौर आणि शिवसेनेचे मनोज काटेकर उपमहापौर होते. मात्र, महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्यानंतर काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले गेले.
सर्वपक्षीय संख्याबळ :
काँग्रेस – ४७
शिवसेना – १२
भाजप – २०
कोणार्क विकास आघाडी – ०४
समाजवादी पक्ष – ०२
रिपाइं (एकतावादी गट) – ०४
अपक्ष – ०१
एकूण – ९०