मुस्लीम-५ : पाकिस्तान

    05-Dec-2019   
Total Views | 73


muslim 5_1  H x


‘मुस्लीम-५’ म्हणून पाच मुस्लीम राष्ट्राची मोट बांधण्याचे स्वप्न पाकिस्तान पाहत आहे. पाकिस्तान, तुर्कस्तान, कतार, इंडोनेशिया आणि मलेशिया या पाच मुस्लीम राष्ट्रांचे एकी म्हणजे ‘मुस्लीम - ५’ होय.


तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान
, मलेशियाचे पंतप्रधान महातीर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी एक इंग्रजी चॅनेल सुरू करण्याचे ठरवले आहे. कारण काय, तर जगभरात मुस्लीमफोबिया वाढत आहे. त्या विरोधात हे चॅनेल जागृती करेल. यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. पाकिस्तानचे स्वत:चे प्रश्न मोजता येणार नाही इतके. मात्र, ‘मुस्लीम-५’ म्हणून पाच मुस्लीम राष्ट्राची मोट बांधण्याचे स्वप्न पाकिस्तान पाहत आहे. पाकिस्तान, तुर्कस्तान, कतार, इंडोनेशिया आणि मलेशिया या पाच मुस्लीम राष्ट्रांचे एकी म्हणजे ‘मुस्लीम - ५’ होय.



मलेशियाच्या कुआलालंपूर येथे नुकतीच एक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती
. त्यामध्ये ही पाच राष्ट्रं सहभागी झाली होती. त्यांनी प्रशासन, विकास, हवामान बदल, दहशतवाद आणि मुस्लीम फोबिया यावर आपापल्यापरीने काम करावे, अशी चर्चा केली. या परिषदेबद्दल पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह मुहम्मद कुरेशींचे मत आहे की, जगाच्या एकूण मुस्लीम लोकसंख्येपैकी ३७ टक्के मुसलमान या पाच देशांमध्ये राहतात, तसेच जगाचा १८ टक्के भूभाग या देशांनी व्यापला आहे. त्यामुळे या पाच देशांनी एकत्र येऊन जागतिकीकरणामुळे संस्कृतीला जो धोका उत्पन्न झाला आहे त्याविरोधात पाऊल उचलायला हवे. यावरून ‘मुस्लीम-५’चे उद्दिष्ट स्पष्ट होते. वरवर पाहता पाकिस्तानने आपली भूमिका एकतेची मांडली आहे.


पण ही एकता केवळ धार्मिक मुद्द्यावर आहे
. धर्माच्या आधारावर देशांना एकत्रित करू पाहणारा पाकिस्तान स्वत:चाच इतिहास विसरला आहे. १९७१ साली या देशाचे तुकडे संस्कृती आणि भाषेमुळे पडले होते आणि बांगलादेश निर्माण झाला होता. आताही धर्म एक असूनही पाकिस्तानमध्ये प्रांत आणि वंशवादामुळे तुकडे पडण्याची वेळ आली आहे. मात्र, स्वत:ला एकसंध ठेवण्याऐवजी पाकिस्तान जगातल्या मुस्लीम देशांना एकसंध होण्याचे आवाहन करत आहे. पाकिस्तानने आव काहीही आणला तरी सत्य हेच आहे की, ‘३७०’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगात एकटे पडावे लागले. विश्वासार्ह मुस्लीम राष्ट्रांनीही पाकिस्तानला समर्थन दिले नाही. त्यातच सौदी अरेबिया आणि युएई वगैरे देशांची भारताशी चांगली मैत्री झाली आहे. इतर मुस्लीम देशही भारताचे समर्थक होऊ नयेत म्हणून पाकिस्तानचा हा आटापीटा आहे.




हे सगळे का
? तर नेहमी रडगाणे गाऊन मदतीची भीक मागणारा पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालतो, हे उघड झाले. त्यामुळे पाकिस्तानची डाळ आता कुठेच शिजत नाही. उलट जगाच्या पाठीवर पाकिस्तानकडे संशयानेच पाहिले जाऊ लागले. यातच पाकिस्तानात अंतर्गत बंडाळी शिगेला पोहोचली. दुसरीकडे शत्रुराष्ट्र म्हणून पाकिस्तानने कायमच ज्या भारताचा मत्सर केला, तो भारत वेगाने प्रगती करत आहे. पाकिस्तानला प्रत्येक बाबतीत पिछाडीवर टाकत आहे. त्यामुळे काहीही करून पाकिस्तानला जगाला दाखवायचेच आहे की, ‘माझी दखल घ्या रे.’ जगाने अशी दखल घेण्यासाठी मग पाकिस्तानने आता ‘मुस्लीम-५’ चा राग आळवला आहे. जगातले मुस्लीम देश आहेत, ते आपले ऐकतील आणि मुस्लीम ब्रदरहूडचा मंत्र जपत आपल्यात सामील होतील. मग आपण भारताला चांगलाच धडा शिकवू या स्वप्नात पाकिस्तान चूर आहे. इतकेच नाही तर भारताशी ज्या देशांचे थोडे खटके उडत असतील, तर पाकिस्तान त्या देशाचे मांडलिकत्वच पत्करतो.



याचे उदाहरण म्हणजे चीन. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच आघाड्यांवर या देशाचे सध्या ‘दे माय सुटे गिर्‍हाण चालले’ आहे. अशी अवस्था आहे की, आपल्याकडे आपण सगळे ‘रामभरोसे हिंदू हॉटेल’ म्हणू, तर पाकिस्तानची अवस्था ‘अल्लारखा मुल्ला हॉटेल’सारखी झाली आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही. मात्र, अंतर्गत प्रचंड वाताहत झाली असूनही हा देश मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या मोठ्या गप्पा करण्याचे, कटकारस्थान रचण्याचे काही विसरत नाही. या देशाची वाटचाल विनाशाकडे चालली आहे. मात्र, पाकिस्तान स्वत:ला मुस्लीम देशांचे दादा म्हणवून घेण्यास कासावीस झाला आहे. ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ अशी एक म्हण आहे. ती सध्या पाकिस्तान या कुरापतखोर राष्ट्रासाठी तंतोतंत लागू पडते.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121