एका हॉटेलमध्ये काम करणारा साधा मुलगा आज कल्याणमध्ये 'भास्करशेठ' म्हणून अगदी सुपरिचित. आपल्या विनम्र स्वभावामुळे समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा मान लाभलेले संचालक समाजसेवा पुरस्कारार्थी भास्कर शेट्टी यांचा उद्योजकीय प्रवास...
एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर त्या हॉटेलचा मालक कोण, हे फार कमी वेळा आपल्याला ठावूक असते. मात्र, कल्याणच्या आधारवाडी येथील 'हॉटेल गुरुदेव'चे सर्वेसर्वा भास्कर शंकर शेट्टी उर्फ 'भास्करशेठ' यांचे त्यांच्या ग्राहकांशी मात्र अतिशय जिव्हाळ्याचे संबंध. 'भास्करशेठ' हे नाव याच संबंधातून पुढे आले. कल्याण स्थानकापासून अवघ्या काही मिनिटांवर असलेल्या या 'हॉटेल गुरुदेव'मध्ये दिवसभर ग्राहकांची रेलचेल असते. कर्मचाऱ्यांचा राबता असतो. या सगळ्या व्यापात भास्करशेठ आलेल्या ग्राहकांची अगदी आपुलकीने विचारपूस करताना दिसतात. सगळी व्यवस्था सुरळीत आहे की नाही, याकडे त्यांचे बारीक लक्ष. ग्राहक तृप्त होऊन निघाले की, त्यांना आदराने नमस्कार करतानाही दिसतील. त्यांच्या याच विनम्र स्वभावामुळे कल्याणमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख.
मूळचे कर्नाटक राज्यातील मंगळुरूचे असलेले भास्कर शेट्टी हे 'भास्करशेठ' कसे बनले, यामागचा प्रवास फार खडतर आणि तितकाच प्रेरणादायी आहे. १९५९ साली मंगळुरूहून मुंबईला केवळ चौथी पास असलेला एक मुलगा आपल्या चुलतभावासोबत मुंबईला निघाला. घरच्यांनी त्याला त्यावेळी शेती करण्याचा सल्ला दिला. मात्र, मुंबईचे वेध इतक्या कमी वयात लागल्याने घरचा विरोध डावलून तो मुंबईत राहू लागला. मुंबईत त्या काळचे 'एलफिन्स्टन रोड' म्हणजेच सध्याचे प्रभादेवी स्थानक भागातील एका हॉटेलमध्ये कपबशी धुण्याचे काम त्या मुलाला मिळाले. हॉटेलचे टेबल पुसणे, भांडी विसळणे अशी पडेल ती कामे त्याने केली. त्या मोबदल्यात महिन्याकाठी पगार मिळायचा फक्त १२ रुपये. पण, भास्करच्या कामावर आणि प्रामाणिकपणावर खुश होऊन मालकाने हळूहळू त्याची जबाबदारी वाढवली. भास्कर शेट्टी पुढे गल्ल्यावर बसू लागला. पुढे चुलतभावाने पानबिडीचे दुकान सुरू केले होते. त्यावर २२ रुपये महिना असा मोबदला मिळणार होता. मात्र, काही कारणाने त्यांना गावी जावे लागले. पण, महिनाभरात भास्कर मुंबईत परतला. 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया'च्या उपाहारगृहात त्यांना नोकरी मिळाली. अशी दीड वर्षे २५ रुपये पगारावर नोकरी केली. पुढे चर्चगेट स्थानकानजीक एका इमारतीत ५० रुपये डिपॉझिट आणि २० रुपये भाड्याने एक चहाचे दुकान त्यांनी सुरू केले होते. इथून भास्कर शेट्टी यांच्यातील उद्योजकाचा प्रवास सुरू झाला होता. दोन ते तीन महिने बरे गेले. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव त्यांना ती जागा सोडावी लागली. कुलाबा येथे पानाची गादी चालवायला घेतली, हा खटाटोप वर्षभर व्यवस्थित चालू शकला नाही. चर्चगेटमध्येच एका इमारतीचे काम त्याकाळी सुरू होते. तिथे कर्मचाऱ्यांची सोय म्हणून त्यांनी कॅन्टीन चालवायला घेतले. याच कंत्राटदाराचे सांताक्रुझलाही काम सुरू होते. त्यामुळे सांताक्रुझलाही भास्कर शेट्टींनी कॅन्टीन सुरू केले. हळूहळू शेट्टी यांना हॉटेल व्यवसायातच यश मिळू लागले. त्यामुळे त्यांनी आपले लक्ष याच क्षेत्रात केंद्रीत केले.
विठ्ठल शेट्टी या मित्राच्या मदतीने 'रॅली फॅन' या कंपनीतील कॅन्टीन त्यांनी चालवायला घेतले. साडेचार वर्षे हा व्यवसाय त्यांनी केला. त्यानंतर ग्रॅबेल इंडिया लिमिटेड, प्रसीजन पासनगर, अॅनिसिन कंपनी आदी कंपन्यांचे कॅन्टीन त्यांनी चालवले. हा सारा व्याप दिवसेंदिवस वाढतच होता. मात्र, उद्योजक किंवा हॉटेल मालक म्हणून त्यांचा प्रवास अद्याप सुरू झाला नव्हता. 'वेलकम हॉटेल'च्या आठवणी आजही ग्राहकांकडून ऐकायला मिळतात. १९७० पासून हे हॉटेल भास्कर शेट्टी यांनी चालवायला घेतले. सहा वर्षे त्यांनी 'वेलकम हॉटेल'चा कारभार सांभाळला. शेट्टी यांच्या कार्यकाळात हा व्याप जास्त वाढत गेला. भास्कर शेट्टी यांना त्या काळात स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळत गेला.या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर १९७६ साली त्यांनी 'हॉटेल गुरुकृपा'ची मुहूर्तमेढ रोवली आणि या 'गुरुकृपेने'च त्यांची खरी भरभराट होण्यास सुरुवात झाली. भास्कर शेट्टी आता 'भास्करशेठ' म्हणून ओळखले जाऊ लागले. भास्करशेठ यांच्या स्वभावामुळे त्यांना समाजात मानसन्मान मिळत गेला. हॉटेल मालक संघटनेचे ते अध्यक्ष बनले. त्यांच्याकडे तब्बल २७ वर्षे ही जबाबदारी होती. यासोबतच कामाचा पसारा वाढत होता. २००६ साली कल्याणच्या खडकपाडा येथे 'गुरुदेव एनएक्स' या नावाने त्यांनी दुसरे हॉटेल सुरू केले. व्यवसायात चढउतार तर सर्वच अनुभवत असतात. भास्करशेठ यांनी मात्र, आपल्या तत्त्वावर सुरू केलेल्या व्यवसायाचा आलेख कधी घसरता पाहिलेला नाही. स्वच्छता आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला. भास्करशेठ येत्या काळात 'गुरुदेव दर्शन' हे अद्यावत सोयीसुविधांनीयुक्त हॉटेल उभारणार आहेत. यात बँक्वेट हॉल, ३०० पाहुण्यांची आसनव्यवस्था असा मोठा डोलारा 'गुरुदेव दर्शन'च्या माध्यमातून उभा राहणार आहे. तसेच या माध्यमातून दोनशे ते अडीचशे लोकांना थेट रोजगार मिळेल, तर अप्रत्यक्ष रोजगाराची संख्या याहून जास्त असेल. 'हॉटेल गुरुप्रसाद प्रा. लि.' अंतर्गत सध्या २१५ कर्मचारी कार्यरत आहेत. या साऱ्यांसाठी भास्करशेठ एक कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पार पडतात. कर्मचाऱ्यांच्या अडचणी जातीने लक्ष देऊन सोडवतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासही ते विसरत नाहीत. सर्व कर्मचाऱ्यांनाही भास्करशेठ यांचा मोठा आधार वाटतो. उद्योजक म्हणून वाटचाल सुरू असताना शेट्टी यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाटेवरचा प्रवासही सुखदुःखाचा होता.
दि. १८ डिसेंबर, १९७० रोजी शारदा यांच्याशी शंकर शेट्टी यांचा विवाह झाला. परंपरेनुसार, त्याकाळी मिळत असलेल्या लाखभर हुंड्याची रक्कम त्यांनी नाकारली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात असल्याने बालपणापासून संघ संस्कार त्यांनी आयुष्यभर जोपासले. लग्न करून आल्यानंतर त्यावेळी राहायला त्यांच्या डोक्यावर साधे छप्परही नव्हते. त्यावेळी भाड्याच्या खोलीत असूनही दोघांनी सुखी संसार केला. हळूहळू परिस्थिती बदलत गेली. पत्नी शारदा यांच्या अकाली जाण्याने संसाराचा गाडा मध्येच थांबला. त्यांची बहीण यशोदा शेट्टी यांच्या पतीचे दरम्यानच्या काळात निधन झाले. भास्कर शेट्टी यांनी बहिणीची दोन्ही मुले श्रीकांत शेट्टी आणि शिल्पा शेट्टी यांना आपलीच मुले मानली. आजघडीला श्रीकांत आणि शिल्पा दोघेही हॉटेलमध्ये 'संचालक' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पत्नीच्या निधनानंतर भास्करशेठ यांनी कल्याण आणि परिसरातील 'श्रीमती शारदा भास्कर शेट्टी मेमोरिअल ट्रस्ट, कल्याण' या संस्थेच्या माध्यमातून अनेक समाजहितैशी कामे सुरू ठेवली आहेत. याची प्रेरणा त्यांना वडील संजीवा शेट्टी, आई दारम्मा शेट्टी आणि पत्नी शारदा शेट्टी यांच्याकडूनच मिळाली. “एखाद्याला केलेली मदत बोलून न दाखवता कार्य करत राहणे या संस्कृतीला मी जपतो,” असे ते म्हणतात. ट्रस्टच्या माध्यमातून आजवर अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांना मदत केली जाते. काहीना काही उपक्रमांद्वारे समाजात मदत पोहोचत असते. भास्करशेठ यांच्यामते, महाराष्ट्राचे आणि इथल्या स्थानिकांचे आपल्यावर ऋण आहेत. त्याची परतफेड शक्य नसली तरी आपल्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न विविध उपक्रमांद्वारे सुरू असतो, असे ते सांगतात. ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, रक्तपेढी, हृदयविकार शस्त्रक्रियेसाठी मदत अशी अनेक समाजकामे संस्थेच्या माध्यमातून सुरू असतात. त्यांच्या कार्यकाळातील या कामाची दखल 'दि कल्याण जनता सहकारी बँक समाजसेवा पुरस्कार निधी' या संस्थेने घेऊन त्यांना २०१९चा पुरस्कार प्रदान केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा!
Waqf Amendment Bill वरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न..