उत्तम मनुष्यबळामुळेच बँकेची प्रगती : अतुल खिरवडकर

    28-Dec-2019
Total Views | 121

atul_1  H x W:


चांगल्या विचारांच्या चांगल्या व्यक्ती एकत्रित आल्या की, परिणाम चांगलेच होतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘दि. कल्याण जनता सहकारी बँक.” दि कल्याण जनता सहकारी बँके’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरव्यवस्थापक अतुल खिरवडकर यांनी ‘संचालक समाजसेवा पुरस्कार निधी’ सोहळ्यानिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख प्रस्तुत केलाच, पण बँकेच्या या प्रगतीचे श्रेय त्यांनी सहकारीवर्गालाही दिले. मुलाखतीतून त्यांनी व्यक्त केलेले विचार...

 


  • बँकेच्या प्रगतीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियोजन व कार्यवाहीसाठी तुमची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ही भूमिका तुम्ही कशी निभावता?

साधारणत: गेली २४ वर्षे मी ‘दि कल्याण जनता सहकारी बँके’त विविध पदांवर कार्यरत असून विविध प्रकारच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. त्यामुळे बँकेची प्रगती अगदी सुरुवातीच्या काळात १०० कोटींच्या व्यवसायापासून मी जवळून बघितली आहे. एप्रिल २०१० पासून मुख्य कार्यकारी अधिकारी व सरव्यवस्थापक या दोन्ही पदांचा पदभार मी सांभाळतो आहे. साधारणत: १००० कोटींचा व्यवसाय असताना वरील पदभार मी स्वीकारला आणि आज बँकेचा एकूण व्यवसाय ५००० कोटींच्या घरात आहे. शाखाविस्तार हा १३ शाखांवरून ४२ शाखांवर गेला आहे. मूलत: ‘बँकिंग’ हा सांघिक व्यवसाय आहे. एकटा माणूस बँकेची प्रगती कधीच साध्य करु शकत नाही. बँकेला लाभलेले सर्व संचालक मंडळ हे बँकेच्या विकासाच्या ध्येयाने प्रेरित असल्यामुळे बँकेची उन्नती चांगल्या पद्धतीने कशी होईल, यावरच त्यांचा कटाक्षाने भर असतो. त्यांच्या जोडीला कार्यकुशल एक्झिक्युटिव्हज, अधिकारी वर्ग व संस्थेच्या हिताकरिता सातत्याने झटणारा कर्मचारी वर्ग असल्याने बँकेच्या प्रगतीचे काम सुलभ आणि सहज साध्य करणारे ठरले.

या काळात बँकेने अनेक अडचणींचा सामना केला व बँकिंग जगतामध्ये अस्थिर परिस्थिती असतानादेखील उत्तम प्रगती साध्य केली. हे सर्व बँकेस लाभलेल्या उत्तम मनुष्यबळामुळेच साध्य झाले. प्रगतिशील धोरण व प्रत्येक कर्मचार्‍यास मिळत असलेल्या प्रशिक्षणामुळे प्रगतीच्या संधी याचेच द्योतक आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारीम्हणून बँकेच्या सर्व घटकांना एकत्रित सांभाळून बँकेच्या उद्दिष्टांबरोबर एकरूप करत असल्यामुळे बँकेची प्रगती साध्य होऊ शकली. यामध्ये माझी स्वत:ची भूमिका ही नगण्य होती, हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. चांगल्या विचारांच्या चांगल्या व्यक्ती एकत्रित आल्या की, परिणाम चांगलेच होतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे ‘दि. कल्याण जनता सहकारी बँक.’ त्याचा प्रत्यय म्हणजे गेल्या पाच वर्षांमध्ये विविध संस्थांनी बँकेस एकूण ३० पुरस्कारांनी गौरवले आहे. त्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराचादेखील समावेश आहे.



  • बँकेच्या प्रगतीमधील विकासाचे महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत?

 

आपणा सर्वांना माहीतच आहे की, दि. २३ डिसेंबर १९७३ रोजी बँकेच्या कामकाजास सुरुवात झाली. बँकेच्या स्थापनेस प्रेरित करणारे श्री. माधवराव गोडबोले, श्री. माधवराव काणे तसेच बँकेचे प्रथम अध्यक्ष व कल्याण शहराचे प्रथम नगराध्यक्ष कै. श्री. भगवानराव जोशी व सुरुवातीच्या काळात आणि नंतरदेखील बँकेकरिता झटणारे मा. श्री. वामनराव साठे, मा. प्रा. अशोक प्रधान, मा. कै. श्री. भाऊ सबनीस, मा. श्री. वसंतराव फडके अशी अनेक मंडळी आहेत की, ज्यांनी अडचणीच्या काळात बँक फुलवली व जोपासली. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेस १९८८ ला लायसन्स दिले. त्यासुमारास बँकेच्या तीन शाखा होत्या. कालांतराने त्या शाखा हळूहळू १३ पर्यंत गेल्या. सुरुवातीला बँकेचे कार्यक्षेत्र ठाणे जिल्ह्यापुरतेच मर्यादित होते. नंतर ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यांपर्यंत कार्यक्षेत्र विस्तारले आणि सन २००८ मध्ये संपूर्ण महाराष्ट्र असे कार्यक्षेत्र झाले. २००८ पर्यंत मुंबईत एक व ठाणे जिल्ह्यात १२ शाखा होत्या आणि व्यवसाय साधारणत: ८५० कोटींच्या घरात होता. २०१७ साली बँकेस बहुराज्यीय संस्थेचा दर्जा प्राप्त झाला व गुजरात राज्यात विस्तारास मान्यता मिळाली. परंतु, रिझर्व्ह बँकेचे शाखा विस्ताराचे धोरण अजून निश्चित होत नसल्याने सहकारी बँकांचा शाखा विस्तार थांबला आहे. आपण प्रगती करत असताना सातत्याने आपल्याला झेपेल अशाच पद्धतीने प्रगती करायचे ठरवले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या लेखा परीक्षणात व तपासणीमध्ये सातत्याने उच्च श्रेणी/मानांकन प्राप्त करीत आहोत.

आपली बँक ही अत्यंत ‘stable’ पद्धतीने प्रगतिपथावर आहे. अर्थातच भागधारक, खातेदार व सर्व हितचिंतकांच्या सक्रिय पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यामुळेच आपली बँक ही उत्कृष्ट बँक म्हणून नावारुपास आली आहे. याचा आम्हा सर्वांना व सर्व भागधारक/खातेदारांना यथार्थ अभिमान आहे.



  • तंत्रज्ञान क्षेत्रातील झपाट्याने झालेले बदल आपल्या बँकेने कसे स्वीकारले?

 

खरं तर १९९२ पासूनच बँकेने तंत्रज्ञानाची कास धरली आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरी सहकारी बँकांमध्ये बँकिंग तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपला नंबर खूपच वरचा आहे. आपण ‘कोअर बँकिंग सोल्युशन’ हे २००८ साली अंमलात आणले आणि संपूर्ण बँकिंग आपण ‘Centralized’ पद्धतीने करू लागलो आहोत. ‘Core Banking’ मुळे ग्राहकांना अत्यंत आधुनिक व दर्जेदार सेवा देणे आपणांस शक्य झाले. किंबहुना, बँकिंग क्षेत्रातील कर्मशियल बँकांनुसार सर्व प्रकारच्या सेवासुविधा आपली बँक देत आहे. आपले स्वत:च्या मालकीच डेटा सेंटर व डेटा रिकव्हरी साईट्स आहेत. आपण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनुसारच लहान सहकारी बँकांना तंत्रज्ञानातील सेवा पुरवित असतो व त्याचा लाभ अनेक छोट्या नागरी सहकारी बँका घेत आहेत. रुपे डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सर्व सुविधांमध्ये देखील आपण अग्रेसर आहोत आणि नुकतेच आपण E-KYC / C-KYC देखील सुरू केला आहे.




  • सहकारी बँकांच्या सद्यस्थितीबद्दल आपणास काय वाटते?

पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे सहकारी बँकांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, हे सत्य आहे. परंतु, ज्या पद्धतीने आपली बँक गेली ४६ वर्षे कामकाज करीत आहे, त्याचा अनुभव सर्व सभासद व खातेदारांना येत आहे. आपण आपल्या बँकेची विश्वासाहर्ता मोठ्या प्रमाणात जपली आहे व ती वृद्धिंगत कशी होईल, यावर सातत्याने भर दिला आहे. आपले आर्थिक निकष अत्यंत सक्षम असून अशा घटनांचा परिणाम आपण सशक्ततेने हाताळू शकलो आहोत. काही दुर्घटनेमुळे सहकार क्षेत्र ढवळून निघत असेल तर ते चांगलेच आहे. ज्या बँका नियमानुसार कामकाज करतात, त्यांना अशा अडचणी फार काळ अडकवू शकत नाहीत. तसेच आपल्या बँकेचे आहे. आपण मार्च २०२० करिता ठरवलेली सर्व उद्दिष्टे सक्षमपणे पार करू याची मला खात्री आहे. येणार्‍या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग नियमावली अधिक कडक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, त्यास सक्षमतेने तोंड देण्याची आपली तयारी झाली आहे. त्यामुळे सर्व सभासदांनी व खातेदारांनी बँकेच्या सर्वंकष प्रगतीबद्दल व यशाबद्दल निश्चिंत राहावे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121