८०० किमी आणि ४० तासाच्या प्रवासानंतर 'सुलतान' नॅशनल पार्कमध्ये दाखल

    26-Dec-2019
Total Views | 289

tiger_1  H x W:


नॅशनल पार्कच्या बचाव पथकाकडून कामगिरी फत्ते

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नागपूर ते मुंबई असा ८०० कि.मीचा प्रवास ४० तासांमध्ये पूर्ण करुन अखेर 'सुलतान' वाघाचे गुरुवारी पहाटे बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त आगमन झाले. या वाघाची वैद्यकीय तपासणी पूर्ण करुन त्याला व्याघ्रविहारात हलविण्यात आले आहे. वाघाला बेशुद्ध न करता नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास राष्ट्रीय उद्यानाच्या बचाव पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केला. प्रजोत्पादनाच्या हेतूने 'सुलतान'ला उद्यानात आणण्यात आले आहे.

 

tiger_1  H x W: 
 
 

बहुप्रतिक्षेनंतर बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात गुरुवारी पहाटे ६.३० वाजता 'सुलतान' वाघाचे आगमन झाले. नागपूरहून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या राष्ट्रीय उद्यानाचे बचाव पथक 'सुलतान'ला घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते. ४० तासांच्या या प्रवासात पथकाने विसावा घेत-घेत वाघाला सुखरुप मुंबईत आणले. सिंह व व्याघ्र सफारीचे अधिक्षक विजय बारब्दे व पुशवैद्यकीय अधिकारी डाॅ. शैलेश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथकाचे सद्यस्य राजेश भोईर, वैभव पाटील, संदीप गायकवाड, राजेश नेगावणे, नंदू पवार आणि वनरक्षक भागडे यांनी ही कामगिरी फत्ते केली. या प्रवासात दर तासाभराने वाघाला पाणी पाजणे, त्याच्या आरोग्याची तपासणी करणे, मांस खाऊ घालण्याचे काम करण्यात आले. उद्यानात दाखल झाल्यानंतर वाघाच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला व्याघ्रविहारातील पिंजऱ्यामध्ये हलविण्यात आले.

 

tiger_1  H x W: 
 

'सुलतान' वाघाला प्रामुख्याने प्रजननाच्या हेतूने राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले आहे. हा वाघ अंदाजे ५ वर्षांचा असून त्याला वन विभागाने चंद्रपूर जिल्हातून १२ जुलै, २०१८ रोजी मानव-वाघ संघर्षाच्या पार्श्वभूमीमुळे जेरबंद केले होते. राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्रविहारात सद्या चार मादी आणि एक नर वाघ आहे. त्यामधील बिजली (९), मस्तानी (९) आणि लक्ष्मी (१०) या तीन माद्या प्रजननाच्या दृष्टीने सक्षम आहेत. मात्र, याठिकाणी असलेल्या नर वाघाकडून प्रजननाचे प्रयत्न असफल झाले आहेत. त्यामुळे तीन माद्यांसोबत प्रजनन करण्यासाठी 'सुलतान'ला आणण्यात आल्याची माहिती वनाधिकारी विजय बाराब्दे यांनी दिली. 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'कडून केवळ प्रजनानाच्या अनुषंगाने 'सुलतान' वाघ ताब्यात घेत असल्याची परवानगी आम्ही मिळवली आहे. त्यामुळे त्याला व्याघ्र सफारीमध्ये प्रदर्शनाकरिता ठेवण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

 
 

'सुलतान'ला व्याघ्रविहारातील स्वतंत्र्य पिंजऱ्यात हलविले असून त्याची प्रकृती उत्तम आहे. व्याघ्रविहारातील इतर वाघ आपल्या नव्या साथीदाराच्या स्वभावाचा अंदाज घेत आहेत. माद्यांना सद्या तरी 'सुलतान'च्या शेजारील पिंजऱ्यात ठेवले आहे. माद्यांनी 'सुलतान'चा स्वभाव जाणून घेऊन त्याला स्वीकारल्यानंतरच त्यांना एका पिंजऱ्यात ठेवून प्रजननाचा प्रयत्न करण्यात येईल. - डाॅ. शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

 
 

tiger_1  H x W: 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121