नागरिकत्वावरुन मलेशियात घमासान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2019   
Total Views |

jp_1  H x W: 0


केंद्र सरकार व संसदेच्या दोन्ही सभागृहांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला मंजुरी दिल्यानंतर ठिकठिकाणची देशविरोधी पिलावळ बाहेर आली. मुस्लीम अल्पसंख्याकांसाठीच्या विद्यापीठांतून, महाविद्यालयांतून आणि नंतर इतरत्रही नागरिकत्व कायद्यावरून काहूर माजवले गेले. कोणीतरी लक्ष द्यावे म्हणून विरोधकांनी सर्वत्र जाळपोळीचा, दगडफेकीचा, विध्वंसाचा आणि सार्वजनिक संपत्तीची नासधूस करण्याचा एककलमी कार्यक्रमही चालू केला. परिणामी, मोदीविरोधकांना आता देशात आगडोंब उसळला व त्यावर आपली स्वार्थाची पोळी भाजता येईल, या कल्पनेनेच आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. स्वतःला विचारवंत, बुद्धीमंत, साहित्यिक म्हणवून घेणारे पण प्रत्यक्षात नागरिकत्व कायद्याचा ओ की ठो न समजणार्‍या अडाण्यांनीही त्याला विरोधाचा पवित्रा घेतला. बॉलिवूडच्या आभासी जगात रमणार्‍या कचकड्याच्या बाहुल्यांनाही नागरिकत्व कायदा म्हणजे काहीतरी महाभयंकर अरिष्ट असल्याचे वाटले व तेही केकाटू लागले. परंतु, त्यानंतर नागरिकत्व कायदा हवाच, अशा गगनभेदी घोषणा देत लाखो लोक विविध शहरांतून अतिशय शांततामय व सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरले. आम्ही सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणाच्याही विरोधाला भीक न घालता नागरिकत्व कायदा हवाच, त्याची अंमलबजावणीही हवी, अशी मागणी त्यांनी या समर्थन मोर्चांतून केली. मात्र, देशात ही परिस्थिती असतानाच तिकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान नागरिकत्व कायद्यावरून बडबडले. इमरान खान यांच्यानंतर पाकिस्तानप्रेमी मलेशियन पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनाही नागरिकत्व कायदा संकटासारखा वाटला व त्यांनीही त्याविरोधात बरळून दाखवले. नागरिकत्व कायद्यावर प्रश्नचिन्ह लावत मोहम्मद यांनी भारतातील मुस्लिमांची सुरक्षा धोक्यात आल्याच्या नावाने बोंब ठोकली. महातीर मोहम्मद यांच्या विधानांनंतर भारतानेही त्यावर तीव्र आक्षेप घेतला व मलेशियन राजदूताला समन्सदेखील बजावले. परंतु, नको त्या प्रश्नात नाक खुपसल्याने आता महातीर मोहम्मद यांच्यावर त्यांच्याच देशातून टीका सुरू झाली आहे.


मलेशियाच्या पेनांग प्रांताचे उपमुख्यमंत्री डॉ
. पी. रामासामी व बगान डालमचे विधानसभा सदस्य सतीश मुनिआंदी यांनी महातीर मोहम्मद यांच्या नागरिकत्व कायद्याविषयक वक्तव्यांवर बोट ठेवत सडकून टीका केली. डेमोक्रेटिक अ‍ॅक्शन पक्षाचे नेते डॉ. रामासामी यांनी एका दैनिकात लेख लिहून महातीर मोहम्मद बोलताना चुकले, असे म्हटले. आपले पंतप्रधान मोहम्मद यांना वास्तविक नागरिकत्व कायदा म्हणजे काय हे अजूनही समजलेले दिसत नाही. नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व नष्ट केले, ही महातीर मोहम्मद यांची टिप्पणी ओव्हर रिअ‍ॅक्शन आहे, असे रामासामी यांनी या लेखातून म्हटले. तसेच मोहम्मद यांनी केलेल्या विचित्र तुलनेवरूनही त्यांनी टीकेची झोड उठवली. भारतातील मुस्लिमांशी मलेशियातील चिनी व भारतीय नागरिकांची तुलना करणे अर्थहीन आहे, असे त्यांनी लिहिले. तसेच भारताने काश्मीरसंदर्भाने निर्णय घेतला, तेव्हाही महातीर मोहम्मद यांनी पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळला होता. त्याचा दाखला देत रामासामी यांनी महातीर यांच्यावर टीका केली.


रामासामी यांच्याबरोबरच सतीश मुनिआंदी यांनी महातीर यांच्या भारतातील सुधारित नागरिकत्व कायद्याशी संबंधित विधानांवर आक्षेप घेत टीका केली
. ९० वर्षीय महातीर मोहम्मद नेमके कोणाच्या सल्ल्यावरून परराष्ट्र धोरण पुढे घेऊन जात आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच भारताने मोहम्मद यांच्या विधानानंतर घेतलेली आक्रमक भूमिका योग्य असल्याचेही मुनिआंदी म्हणाले. महातीर मोहम्मद यांना भारतातल्या अंतर्गत बाबींवर बोलणे शोभत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत हा मलेशियाचा केवळ व्यापारी भागीदार नाही तर पारंपरिक सहकारी असल्याची आठवणही सतीश मुनिआंदी यांनी महातीर मोहम्मद यांना करून दिली. डॉ. रामासामी आणि सतीश मुनिआंदी या दोन्ही नेत्यांच्या महातीर मोहम्मद यांच्यावरील टीकेमुळे मलेशियात चांगलेच घमासान सुरू असल्याचे दिसते. केवळ इमरान खान यांच्यापायी वा इस्लामी विश्वबंधुत्वापायी महातीर मोहम्मद भारतावर टीका करत असल्याचे आणि ते तिथल्या काही नेत्यांना पटत नसल्याचेही यावरून समजते. पण ही गोष्ट जेवढ्या लवकर महातीर यांच्या लक्षात येईल, तितके चांगले. कारण भारतद्वेषापोटी पाकिस्तानची झालेली दिवाळखोर अवस्था सार्‍या जगाला माहिती आहे, तशीच महातीर मोहम्मद यांचीही इच्छा असली तर मग त्या देशातील नागरिकांचे अवघडच.

@@AUTHORINFO_V1@@