महाराष्ट्राच्या फुलपाखरांच्या यादीत नव्या प्रजातीची भर !

    02-Dec-2019   
Total Views | 215

tiger_1  H x W:


आंबोलीत टिपले 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन' फुलपाखराचे छायाचित्र


मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्राच्या फुलपाखरांच्या यादीत 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन' या फुलपाखराची भर पडली आहे. गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या (बीएनएचएस) फुलपाखरू अभ्यासक्रमाच्या भ्रमंतीदरम्यान हे फुलपाखरू आढळून आले. तज्ज्ञांच्या मते, 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन' फुलपाखराचा हा महाराष्ट्रातील पहिलाच छायाचित्रीत पुरावा आहे.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

महाराष्ट्र राज्याच्या जैवविविधता मंडळातर्फे नुकतेच फुलपाखरांचे मराठीत नामकरण करण्यात आले आहे. यासाठी फुलपाखरांच्या सुमारे २७८ प्रजातींची नोंद करण्यात आली. या प्रजतींची यादी मराठी नावांसह 'महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे' या पुस्तकात प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, आता या यादीत आणखी एका फुलपाखराच्या प्रजातीची भर पडली आहे. 'डेमाॅन' प्रजातीमधील 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन' फुलपाखराचे महाराष्ट्रातून प्रथमच छायाचित्र टिपण्यात 'बीएनएचएस'च्या गोरेगाव येथील 'निसर्ग शिक्षण आणि संवर्धन केंद्रा'चे सह-संचालक डाॅ. राजू कसंबे यांना यश मिळाले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी त्यांनी आंबोलीमध्ये दुपारच्या दरम्यान या फुलपाखराचे छायाचित्र टिपले. 'बीएनएचएस'च्या सहा महिन्यांच्या फुलपाखरु अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसोबत आंबोली येथील शैक्षणिक भ्रमंतीदरम्यान हे फुलपाखरू आढळून आल्याची माहिती डाॅ. कसंबे यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली.

 
 

tiger_1  H x W: 
 
 

महाराष्ट्रात 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन' या फुलपाखराची ब्रिटीशकालीन नोंद असून त्याचा छायाचित्रीत पुरावा अस्तिवात नव्हता, असे फुलपाखरू तज्ज्ञ हेमंत ओगले यांनी सांगितले. त्यामुळे डाॅ. राजू कसंबे यांनी 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन'चे टिपलेले छायाचित्र, महाराष्ट्रात हे फुलपाखरू आढळत असल्याचा पहिलाच छायाचित्रीत पुरावा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. या छायाचित्रीत पुराव्यामुळे महाराष्ट्राच्या फुलपाखरांच्या यादीत आणखी एका प्रजातीची भर पडल्याचीही माहिती ओगले यांनी दिली. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ पर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटामध्ये 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन' फुलपाखरू आढळून येते. महाराष्ट्रात 'डेमाॅन' या प्रजातीमधील 'ग्रास डेमाॅन' आणि 'रिस्ट्रिक्टेड डेमाॅन' या दोन प्रजाती आढळून येतात. त्यामध्ये आता 'काॅमन बॅण्डेड डेमाॅन'ची भर पडली आहे. हे फुलपाखरू काळपट रंगाचे असून तेज गतीत उडते. हळद आणि आल्याच्या कुळातील झाडे ही त्याची खाद्यवनस्पती आहे. 'महाराष्ट्र राज्य जैैवविविधता मंडळा'च्या फुलपाखरांच्या मराठी नामकरणाच्या यादीत 'डेमाॅन' प्रजातीच्या फुलपाखरांचे मराठी नाव 'पट्टासुर' असे ठेवण्यात आले आहे.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121