काश्मिरात इस्रायली मॉडेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019   
Total Views |


saf_1  H x W: 0


सन १९४७ साली इस्रायलने वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमचा भाग ताब्यात घेतला आणि नंतर तिथे ज्यूंच्या १४० वस्त्या स्थापन केल्या. तिथे सध्या चार लाख ज्यू राहत आहेत. तथापि, त्या वस्त्यांना पूर्वी अवैध मानले जात असे, पण नुकतेच अमेरिकेने या वस्त्या अवैध नसल्याचे म्हणत त्यांना कायदेशीर मान्यता देऊन टाकली.


नव्वदच्या दशकात धर्मांध इस्लामी जिहाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत माजवत खोऱ्यातील लाखो हिंदू-पंडितांना पिटाळून लावले. हजारो मुली-महिलांवर अत्याचार, बलात्कार केले आणि शेकडो मठ-मंदिरांचा, धर्मस्थळांचा विध्वंस केला. शेकडो वर्षांपासून आपला सांस्कृतिक वारसा, प्रथा-परंपरा जपलेल्या काश्मीररूपी धरतीवरील नंदनवनाची समृद्धी कट्टरतेची नशा चढलेल्यांनी नष्ट केली. त्याला पाकिस्तान, आयएसआय आणि तिथल्या लष्कराची जशी साथ होती, तशीच काश्मीरमधल्या फुटीर मानसिकतेच्या राजनेत्यांचाही हातभार होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून खोऱ्यातून जीवाच्या आकांताने परागंदा झालेले हिंदू आजही कुठल्या तरी तंबूच्या वा पडवीच्या आडोशाने जीवन कंठत आहेत. दरम्यानच्या काळात काश्मिरी हिंदूंच्या त्यांच्या मायभूमीत पुनर्वसनाच्या मागणीलाही मोठा जोर चढला होता. परंतु, अजून तरी काश्मिरी हिंदूंचे खोऱ्यात पुनर्वसन होऊ शकलेले नाही. आजही लाखो काश्मिरी हिंदू केंद्र सरकारकडे आशेने पाहत असून कधीतरी आपण आपल्या मूळ गावी जाऊ, यासाठी देश-विदेशात कार्यक्रम, उपक्रमही राबवत आहेत. असाच एक कार्यक्रम नुकताच अमेरिकेत आयोजित करण्यात आला होता आणि त्यातल्या एका वक्तव्याने भारतातील फुटीरवादी, परधार्जिण्या लोकांच्या गोटात खळबळ माजलीच, पण पाकिस्तानही बिथरला.

 

न्यूयॉर्कमध्ये काश्मिरी हिंदू-पंडितांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्यात अमेरिकेतील भारताच्या महावाणिज्यदूतांनी आक्रमक विधान केले. "जम्मू-काश्मिरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. परिणामी, भारतात ठिकठिकाणी निर्वासितांचे जिणे जगणारे पंडित आपल्या घरी जाऊ शकतील. जगात अशा प्रकारचे मॉडेल आधीपासूनच अस्तित्वात आहे. पण आपण त्याचे अनुकरण का करत नाही, हे मला माहिती नाही. पश्चिम आशियात तसे घडले असून इस्रायलने ते केले आणि जर इस्रायलला शक्य असेल तर आपणही नक्कीच करू शकतो," असे भारताचे महावाणिज्यदूत संदीप चक्रवर्ती म्हणाले. तसेच, "इस्रायली नागरिकांनी आपल्या भूमीबाहेर दोन हजार वर्षे आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवले आणि नंतर पुन्हा आपल्या भूमीत गेले. माझ्या मते आपल्या सर्वांना काश्मिरी संस्कृती जिवंत ठेवावी लागेल. काश्मिरी संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे, ही हिंदू संस्कृती आहे. आपल्यापैकी कोणीही काश्मिरशिवाय भारताची कल्पना करू शकत नाही," असेही त्यांनी पुढे सांगितले. दरम्यान, संदीप चक्रवर्ती यांनी केलेले विधान काश्मिरी हिंदू-पंडितांना दिलासा देण्यासाठी होते की, भारत सरकारची खरेच तशी काही रणनीती आहे, हे लगेच समजू शकत नाही. परंतु, संदीप चक्रवर्ती यांच्या विधानाने जे व्हायला हवे होते ते झाले आणि पाकिस्तानला इशाराही मिळाला.

 

चक्रवर्ती यांच्या वक्तव्याने चवताळलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधान इमरान खान यांनी लगोलग त्यावर टीका केली. भारत सरकार काश्मीरमध्ये फॅसिस्ट मानसिकतेने काम करत असल्याचे खान म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० निष्प्रभ केल्याने जळफळाटही पुन्हा बाहेर आला. "काश्मिरी जनतेला कैदेत टाकून शंभर दिवस झाले असून लोकांना गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मानवाधिकारांना पायदळी तुडवले जात आहे, पण जगातील ताकदवान देश आपल्या व्यावसायिक हितांमुळे गप्प बसले आहेत," असे ट्विट त्यांनी केले. अर्थात भारताला एकदा शत्रू मानले की, खोट्यानाट्या कहाण्या रचून त्या पसरविण्याचे काम पाकिस्तानी पंतप्रधानाने करणे क्रमप्राप्तच. इमरान खान यांनी तेच केले व ते पुढेही तसेच करतील. पण इथे इस्रायली मॉडेल म्हणजे काय हे आपण माहिती करून घेऊया आणि तसे केल्यास काश्मिरी हिंदू-पंडित पुन्हा आपल्या गावी नक्कीच परततील. सन १९४७ साली इस्रायलने वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमचा भाग ताब्यात घेतला आणि नंतर तिथे ज्यूंच्या १४० वस्त्या स्थापन केल्या. तिथे सध्या चार लाख ज्यू राहत आहेत. तथापि, त्या वस्त्यांना पूर्वी अवैध मानले जात असे, पण नुकतेच अमेरिकेने या वस्त्या अवैध नसल्याचे म्हणत त्यांना कायदेशीर मान्यता देऊन टाकली. आता भारत असे काही पाऊल उचलतो का, याचीच उत्सुकता आहे!

@@AUTHORINFO_V1@@