नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून पुन्हा स्वा.सावरकरांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे. ‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी पुन्हा वादग्रस्त भाष्य केले आहे. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान ते बोलत होते.
राहुल गांधी यांनी याआधीही सावरकरांवर टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्यासही काँग्रेसने विरोध केला होता. आता पुन्हा एकदा राहुल यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फोडले आहे. राहुल यांनी एका सभेत 'मेक इन इंडिया'चा प्रवास 'रेप इन इंडिया'च्या दिशेने सुरू असल्याचे म्हटले होते. त्यावरून संसद अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी राहुल यांना घेरले होते. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली होती.