वेस्ट इंडिजविरुद्ध झालेली ‘टी-२०’ मालिका जिंकत भारतीय संघाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. ‘२-१’ अशा फरकाने ही मालिका जिंकत आगामी ‘टी-२०’ विश्वचषकासाठी आपण एक प्रबळ दावेदार असल्याचे भारताने दाखवून दिले. ‘टी-२०’ मधील गतविश्वविजेत्या वेस्ट इंडिज संघाला भारतीय संघाने नमवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास कमालीचा बळावला असून याचा भारतीय खेळाडूंना आगामी काळात नक्कीच फायदा होईल, असे जाणकारांचे मत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ही भारतीय खेळपट्ट्यांवर पार पडली. स्वदेशी खेळपट्ट्यांवर उत्तम प्रदर्शन करण्यात भारतीय खेळाडू पारंगत मानले जातात. मात्र, २०१६ साली भारतीय धर्तीवर झालेल्या ‘टी-२०’ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत याच वेस्ट इंडिज संघाने भारताला नमवले होते. त्यावेळी उत्तम प्रदर्शन केल्यानंतरही भारतीय खेळाडूंना पराभवाचा झटका बसला होता. दवबिंदूंमुळे (ड्यू फॅक्टर) चेंडू वारंवार ओला होत असल्याने फिरकी गोलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी या परिस्थितीचा फायदा उचलत भारताने दिलेले मोठ्या धावसंख्येचे आव्हान सहज पूर्ण केले. परिणामी, भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि भारत उपांत्य फेरीत स्पर्धेतून बाहेर झाला. तो सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर झाला होता आणि नुकत्याच पार पडलेल्या ‘टी-२०’ मालिकेचा अंतिम निर्णायक सामनाही याच धर्तीवर झाला. या सामन्यात भारताने प्रतिस्पर्ध्यांविरोधात २४० धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. मात्र, हे आव्हान पेलताना वेस्ट इंडिज संघाची दाणादाण उडाली आणि त्यांना ६७ धावांनी पराभव पत्करावा लागला. तेव्हा आणि आता या दोन्ही सामन्यांदरम्यानचा फरक पाहिल्यास भारताने यावेळी मोठ्या धावसंख्येचे आव्हान तर प्रतिस्पर्ध्यांपुढे ठेवलेच होते, मात्र फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही तितकाच प्रभावी मारा केला. दवबिंदूंच्या प्रभावाचा अडसर असला तरी गोलंदाजांनी वेळोवेळी धिम्या गतीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत टप्प्याटप्याने प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज बाद करण्यात यश मिळवले. याउलट २०१६ साली धावसंख्या कमी असताना भारताला हेच करता आले नव्हते आणि पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. त्यामुळे भारतीय संघाने यातून धडा घेत जे बदल केले, त्यामुळेच हा विजय मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
प्रयोग यशस्वी की अयशस्वी?
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका ‘२-१’ अशा फरकाने नुकतीच जिंकली. भारतीय खेळपट्ट्यांवर खेळविण्यात आलेल्या या मालिकेत भारतीय संघ निर्भेळ यश मिळवेल, अशी आशा तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींना होती. मात्र, मालिकेतील दुसर्याच सामन्यात तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या या आशेवर पाणी फेरले गेले. तिरूअनंतपुरममध्ये झालेल्या या दुसर्या टी-२० सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करण्यास संधी मिळाली होती. पहिल्या सामन्यात पाहुण्यांचे २०८ धावांचे आव्हान सहज पेलल्यानंतर भारत दुसर्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, अशी आशा होती. मात्र घडले ते नेमके उलटच. भारताला आधीच्या सामन्याइतक्या २०० धावाही करता आल्या नाहीत. भारताने दिलेले १७० धावांचे आव्हान पाहुण्या वेस्ट इंडिज संघाने सहज पूर्ण केले आणि ८ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. या सामन्यात भारताने फलंदाजीमध्ये एक धाडसी प्रयोग केला होता. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याला तिसर्या स्थानी फलंदाजीस धाडले. या सामन्यात फलंदाजीमध्ये सर्वोत्तम कामगिरी शिवमनेच केली. शिवमव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी या सामन्यात करता आली नव्हती. त्यामुळे शिवमला या स्थानावर खेळविण्याचा प्रयोग अयशस्वी होता, असे म्हटले तर ते कदाचित चुकीचे ठरेल. मात्र, भारताचा हा प्रयोग यशस्वी तरी कसा म्हणायचा? असाही सवाल अनेकांकडून विचारण्यात येत आहे. शिवमने साजेशी कामगिरी केली असली तरी या प्रयोगामुळे फलंदाजांचा क्रम बिघडल्याने पुढील सर्व खेळाडू आपल्या लौकिकाला साजेशी कामिगिरी करता आली नाही, असे मत अनेक क्रिकेट जाणकारांनी व्यक्त केले. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी की अयशस्वी, या चर्चेने सध्या क्रिकेट वर्तुळात जोर धरला आहे. याआधीही भारतीय संघाने अनेकदा प्रयोग केले असून ते यशस्वी झाले आहेत. भारताचा माजी सलामीवर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आधी मधल्या फळीत फलंदाजी करायचा. मात्र, त्याला सलामीला आक्रमक फलंदाजीसाठी पाठविण्याचा भारतीय संघाचा प्रयोग वर्षानुवर्षे यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे सध्याचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही आधी मधल्या फळीतच फलंदाजी करत असे. मात्र, त्यालाही संधी देत भारताने सलामीवीर फलंदाज म्हणून जगासमोर घडवले. त्यामुळे शिवमचा प्रयोग यशस्वी की अयशस्वी, हे येणारा काळच ठरवेल.