हरहुन्नरी पक्षीनिरीक्षक

    13-Dec-2019   
Total Views | 457

mansa_1  H x W:


काही माणसं अर्थार्जनाव्यतिरिक्तही एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेली असतात. महाराष्ट्रातून ‘लेगस हॉक इगल’ या शिकारी गरुडाचा पहिला छायाचित्रित पुरावा टिपून पक्षीनिरीक्षणाच्या वेडाने पछाडलेल्या मनीष श्रीकांत केरकर यांच्याविषयी...

 

मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्राला पक्षीअभ्यासक आणि निरीक्षकांचे देणे लाभले आहे. डॉ. सलीम अली यांच्यापासून पक्षीनिरीक्षणाची परंपरा सुरू झाली. पक्ष्यांच्या मागे धावणारी ही मंडळी अतिशय एकाग्र आणि संयमी असतात. दुर्बीण आणि कॅमेर्‍याचे भिंग घेऊन ती पक्ष्यांच्या मागे एखाद्या हेरासारखी लागतात. डोंबिवलीचा एक संगणक अभियंताही असाच काहीसा पक्षीवेडा. आपला व्यवसाय सांभाळून पक्षीनिरीक्षणाचा व्यासंग जोपासणारा. त्याने डोंबिवली आणि आजूबाजूचा परिसर पक्ष्यांच्या शोधार्थ पिंजून काढला. त्यांची नोंद केली आणि समाजमाध्यमांच्या आधारे डोंबिवलीच्या पक्षीवैभवाचे दर्शन जगाला करून दिले. आजवर या माणसाने डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातून सुमारे २५० अधिक प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. या संपूर्ण परिसराच्या पक्षीसंपत्तीचे दर्शन घडवणारा हा हरहुन्नरी पक्षीनिरीक्षक म्हणजे मनीष केरकर.
 
 
 

tiger_1  H x W: 
 


मुंबईतील माहिम परिसरात दि. १६ ऑगस्ट, १९७२ साली केरकरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण या भागातच गेले. केरकर दुसर्‍या इयत्तेत असताना त्यांचे कुटुंब डोंबिवलीत स्थायिक झाले. बर्‍याच लोकांना पशु-पक्ष्यांबाबतचा व्यासंग हा निसर्ग भटकंतीच्या माध्यमातून निर्माण होतो. केरकरांच्या बाबतीतही नेमके तेच घडले. अलिबाग येथील
आपल्या आवास गावाकडील निसर्गात भटकण्याची त्यांना आवड होती. प्राणीमात्रांना जीवदेखील ते लावत असत. त्यामुळे निसर्ग आणि प्राणीप्रेमाचे बीज बालपणापासूनच त्यांच्या मनी अनावधानाने रुजले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी जोंधळे महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथून ’कॉम्प्युटर टेक्नोलॉजी’ विषयातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. या दरम्यान, केरकरांनी निसर्गात मनसोक्त भटकंती केली. त्यामुळे निसर्गातील प्रत्येक घटकाबरोबर त्यांची नाळ जोडलेली राहिली.

 

tiger_1  H x W: 
 


साधारण २०११-१२च्या दरम्यान केरकरांनी खर्‍या अर्थाने निसर्गाच्या अद्भुत जगात प्रवेश केला. मित्र डॉ. प्रसाद कामत यांच्यासमवेत अरण्याच्या रानवाटांमधून भटकण्यास सुरुवात केली. फिरण्याच्या आवडीपोटी नवेगाव-नागझिरा, ताडोबाचे जंगल पिंजून काढले. हा प्रवास २०१४च्या रणथंबोरच्या भटकंतीपर्यंत विशिष्ट ध्येयाविना सुरू होता. परंतु, रणथंबोरच्या जंगलभ्रमंतीने त्यांच्या या भटक्या वृत्तीला एक दिशा आणि ध्येय दिले. हे ध्येय होते, पक्षीनिरीक्षणाचे. रणथंबोरच्या भटकंतीसाठी त्यांनी कॅमेरा खरेदी केला होता. या कॅमेर्‍याने गिधाड आणि काही दुर्मीळ प्रजातीच्या घुबडांचे छायाचित्र टिपल्यानंतर ते पक्षीप्रेमात पडले. तेथून डोंबिवलीत परतल्यावर त्यांनी खर्‍या अर्थाने पक्ष्यांच्या अनुषंगाने आसपासचा परिसर फिरण्यास सुरुवात केली. कॅमेर्‍याच्या भिंगातून पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यास सुरुवात झाल्यापासून पक्षीनिरीक्षणाचा व्यासंग जडल्याचे केरकर नमूद करतात.

 
 

tiger_1  H x W: 
 

केरकरांनी पक्षीनिरीक्षणाला डोंबिवलीतील भोपर आणि सातपुल या जागांपासून सुरुवात केली. परंतु, त्यांना पक्ष्यांविषयी काहीच माहिती नव्हती. अशावेळी पुस्तकांमधून आणि तज्ज्ञांशी बोलून त्यांनी पक्षी आणि त्यांच्या अधिवासाबाबत माहिती जाणून घेतली. परंतु, भोपर आणि सातपुलचा परिसर हा सामान्यत: डोंबिवलीतील इतर पक्षीनिरीक्षकही फिरत होते. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या जागांचा शोध घेऊन तेथील पक्षीसंपत्तीची नोंद केली. आजतागायत केरकरांनी डोंबिवलीच्या कोपर, मलंग रोड, पडले आणि आसपासच्या परिसरामधून पक्ष्यांच्या सुमारे २५० अधिक प्रजातींची नोंद केली आहे. यामध्ये नमूद करण्याची गोष्ट म्हणजे, हे काम केरकर आपला खासगी संगणकाचा व्यवसाय सांभाळून करत आहेत. दररोज सकाळी दीड तास आणि सायंकाळी जमल्यास तासभर गळ्यात दुर्बीण आणि कॅमेरा लटकून ते पक्ष्यांच्या शोधात घराबाहेर पडतात.

 



tiger_1  H x W:
 
 

केरकरांच्या या पक्षीवेडाने इतिहासही घडवला आहे. गेल्या महिन्यात पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने माथेरानचे जंगल फिरत असताना त्यांना आकाशात एक शिकारी पक्षी घिरट्या घालताना दिसला. त्याचे छायाचित्र टिपल्यावर हा पक्षी ’लेगस हॉक इगल’ असल्याचे निदर्शनास आले. महत्त्वाचे म्हणजे, केरकरांनी टिपलेले हे छायाचित्र महाराष्ट्रातील ’लेगस हॉक इगल’चा पहिलाच छायाचित्रित पुरावा होता. २०१७ साली केरकरांनी मुंबईतून प्रथमच दुर्मीळ अशा वाॅटर रेल पाणपक्ष्याची नोंद केली होती. समाजमाध्यमांमुळे केरकरांचे पक्षीनिरीक्षणामधील हे सर्व काम लोकांपर्यंत पोहोचत आहे. भ्रमंतीच्या निमित्ताने टिपलेली छायाचित्रे केरकर समाजमाध्यमांवर टाकतात. त्यामुळे डोंबिवलीतील पक्षीवैविध्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आहे. डोंबिवलीचे पक्षीवैभव आणि निसर्गाची माहिती लोकांपर्यत पोहोचवण्याकरिता त्यांनी डोंबिवली नेचर फेन्ड्स ग्रुप नावाने एक ग्रुप तयार केला आहे. या सर्व कामात त्यांना त्यांची पत्नी संध्या आणि मुलगा आदित्य केरकरची साथ मिळाली आहे. वडीलांच्या आवडीमुळे आदित्यलाही पक्षीनिरीक्षणाची आवड जडली आहे. दै. ’मुंबई तरुण भारत’कडून केरकरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121