‘नेहरु सायन्स सेंटर’ आणि ‘नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स’तर्फे आज, दि. २२ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि ख्यातनाम विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके यांना त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील जाणीवजागृती आणि योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मुंबईतील नेहरु सायन्स सेंटर येथे सकाळी ९.३० वाजता आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विश्वकोशातील विज्ञान शाखेतील ज्ञानमंडळांचे पालकत्व सांभाळणार्या फोंडकेंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख...
महाभारतातील व्यासांच्या प्रतिभेने पाहिलेली अनेक पात्रे आपल्या भोवताली आजही वावरत असताना दिसतात. आपले शौर्य, युद्धकौशल्य, नेतृत्व, बुद्धिमत्ता, निर्धार, सारासार विवेकबुद्धी यांच्यावर आपली साधना व तपस्या यांनी वयाचा परिणाम होऊ दिला नाही. एका गोष्टीचा अपवाद वगळता डॉ. बाळ फोंडके यांच्याबद्दलही तेच म्हणावे लागेल. अपवाद म्हणजे, कुरुकुलाच्या रक्षणाची शाब्दिक प्रतिमा भीष्मांनी शब्दश: पाळली. आपण असत्याच्या बाजूला उभे आहोत, असे दिसत असतानाही त्यांनी प्रतिज्ञेतील अर्थ ‘प्रधान्या’पेक्षा शब्द ‘प्रामाण्या’ला अधिक महत्त्व दिले. डॉक्टरांनी आपल्या विवेकबुद्धीवर कोणत्याही प्रकारच्या अंध तत्त्वज्ञान प्रामाण्याची छाया पडू दिली नाही. त्यामुळे त्यांचे विचार व व्यक्तिमत्त्व नेहमीच प्रसन्न व सकारात्मक राहिले. त्याचाच सकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर व काम करण्याच्या क्षमतेवर झाला आहे. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते तरुणपणाच्या उत्साहानेच काम करीत आहेत. विश्वकोशातील विज्ञान शाखेतील ज्ञानमंडळांचे पालकत्व सांभाळत असताना त्याकरिता आवश्यक असलेला प्रवास करणे, आलेल्या नोदींचे संपादन करणे आदी कामे ते उत्साहाने करत असतात.
‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये २० वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी विज्ञान प्रसाराचे व्रत घेतले व सर्व आयुष्य त्याच्याकरिता वाहून घेतले. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ समूहातील ‘सायन्स टुडे‘ या मासिकाचे ते संपादक झाले. त्या मासिकाच्या अंतरंगात व बाह्य स्वरूपात बदल करून या क्षेत्रातील अग्रगण्य मासिकांचा दर्जा प्राप्त करून दिला. यानंतर ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राचे विज्ञानविषयक संपादक म्हणून काम पाहिले. पुढे केंद्र सरकारच्या ‘सीएसआयआर’मधील प्रकाशन विभागाचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. याही काळात ‘विज्ञान’ विषयावर विविध लेखकांकडून अनेक पुस्तके लिहून घेऊन प्रकाशित केली. निवृत्तीनंतर त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेत अनेक लेख लिहून विज्ञान प्रसाराचे मोलाचे काम केले. त्यातील इंग्रजीतील विज्ञान प्रसाराचे काम महत्त्वाचे असले तरी मराठी भाषेतील काम हे मूलभूतरित्या वेगळे व अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे त्यासंदर्भात विशेष लिहिणे आवश्यक आहे.
भारतातील सर्व प्रादेशिक भाषा व विज्ञान प्रसार यामध्ये एक मूलभूत अडचण आहे. भारतातील प्राचीन काळातील वैज्ञानिक संशोधन संस्कृत भाषेत झाले व भारतीय वैज्ञानिक शोधांची परंपरा ही सात-आठशे वर्षांपूर्वीच संपली. त्यानंतर व्यावहारिक जीवनाची भाषा म्हणून संस्कृतचा प्रभावही कमी कमी होत गेला. त्यातच अनेक जातींना संस्कृत शिकल्यावर धार्मिक बंदी घालण्यात आली. नंतरच्या काळात प्रादेशिक भाषांचा विकास झाला तो भक्ती तत्त्वज्ञान व थोड्याफार अन्य तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने. त्याचवेळी युरोपमधे वैज्ञानिक क्रांतीतून झालेली औद्योगिक क्रांती व त्याचा परिणाम म्हणून समाजक्रांतीच्या वेगवेगळ्या संकल्पना युरोपियन प्रबोधन काळात पुढे आल्या. भारतावर युरोपियन देशांच्या व विशेषत: इंग्रजांच्या आक्रमणानंतर विज्ञानाचे व त्यातून निर्माण झालेल्या विविध सामाजिक तत्त्वज्ञानांचे महत्त्व भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. परंतु, प्रादेशिक भाषेत तत्त्वज्ञानाची परंपरा होती. त्यामुळे सामाजिकशास्त्रांचा काही प्रमाणात तरी ऊहापोह झाला. परंतु, विज्ञानाची परंपराच नसल्याने प्रत्येक नव्या वैज्ञानिक शब्दांचा प्रतिशब्द शोधण्यापासून काम करावे लागणार होते. हे शब्द कृत्रिमरित्या शोधलेले असल्याने त्यांचा नेहमीच्या बोलीभाषेत वापर करणे हे आणखी मोठे आव्हानात्मक काम होते व आहेही. जर खर्या अर्थाने मराठीत विज्ञान संस्कृती रूजायची असेल, तर मराठी भाषेत विज्ञान रुजल्याशिवाय ती संस्कृती रुजणार नाही. खरी वैज्ञानिक संस्कृती ही माणसाला तर्कशुद्ध व अस्तित्वाधारित सत्याचा शोध घेण्यास प्रवृत्त करते व त्यातून घडलेल्या सत्याच्या अंशात्मक दर्शनाने आपल्या बुद्धीच्या मर्यादा लक्षात आणून देऊन बौद्धिक विनम्रता आणते. हे न घडल्याने एक तर प्राचीन वैज्ञानिक परंपरेबद्दल अज्ञानी अहंकार किंवा तुच्छतागंड हे दोन्ही पाहायला मिळतात.
डॉ. बाळ फोंडके यांचे वैशिष्ट्य हे की, ही कोंडी फोडण्यासाठी मराठी भाषेत मराठी विज्ञान परिषद, मराठी विश्वकोश, ‘विवेक’ने केलेला विज्ञान न तंत्रज्ञान चरित्रकोश, विविध प्रकारचे पारिभाषिक शब्दकोश अशा सर्व प्रकारच्या कामात त्यांनी आपला सक्रीय सहभाग दिला. त्यामुळेच विश्वकोशाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याबद्दल मला विचारण्यात आले तेव्हा या मंडळावर सदस्य या नात्याने आपल्या अनुभवाचा लाभ मिळवून द्यावा, अशी विनंती केली व ती त्यांनी आनंदाने मान्य केली. विश्वकोशात ‘ज्ञानमंडळे’ ही नवी संकल्पना राबवण्यात व विज्ञान क्षेत्रातील ज्ञानमंडळे स्थापन करण्याचे व त्यांना कार्यरत ठेवण्याचे पूर्ण श्रेय त्यांना जाते. याचबरोबर वेळोवेळी विविध वैज्ञानिक घटनांवर सोप्या व सामान्य व्यक्तीला सहजपणे समजू शकेल, अशा भाषेत विविध प्रकाशनामधून लिखाण केले व व्याख्याने दिली. या सर्वांपेक्षा त्यांनी विज्ञानकथांच्या द्वारे जे काम केले त्याची स्वतंत्रपणे दखल घेणे आवश्यक आहे. याचे कारण गेल्या काही वर्षांमध्ये विज्ञान हे केवळ मानवी उपयोगाचे साधन न राहता त्याने मानवी मनाची व सामाजिक मूल्यांची उलटापालट करायला सुरुवात केली आहे. भूतकाळातही वैज्ञानिक शोधांचे सामाजिक व राजकीय परिणाम झाले. मार्क्स व अन्य अनेक विचारवंतांनी त्याची दखल घेतली आहे. त्या तपशीलात जाण्याचे हे स्थळ नव्हे. भारतातील अस्पृश्यता नष्ट होण्यात अनेक समाजसुधारक, भारतीय राज्यघटना याबरोबरच रेल्वे व बस यांसारख्या वाहतूकसुविधांचाही मोठा सहभाग आहे. परंतु, तेही बाह्य वर्तणुकीचे क्षेत्र आहे. आधुनिक विज्ञान त्यापुढे गेले आहे.
मानवी मनाशी संबंध असलेली संपर्क तंत्रज्ञानाने व मानवी शरीराशी संबंधित असलेली जैवरसायन तंत्रज्ञाने व मानवी उपचार पद्धतीत होणारे क्रांतिकारक बदल मानवी सांस्कृतिक मूल्यांविषयी काही मूलभूत प्रश्न उपस्थित करीत आहेत व याचा ऊहापोह बाळ फोंडकेंनी आपल्या अनेक कथांमधून केला आहे. लेखाच्या विस्तार भयास्तव तशा कथांचा उल्लेख व त्यांचा ऊहापोह या लेखात करणे शक्य नाही. परंतु, या कथांनी मराठी भाषेत एक नवा प्रवाह निर्माण केला आहे. मराठी साहित्य विश्वात एकूणच विज्ञान कथांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. त्यामुळे रूढ मराठी साहित्य विश्व याची दखल घेईल याची शक्यता नाही. परंतु,भविष्यकाळात मानवी जीवनाच्या केवळ भौतिकच नव्हे, तर व्यक्तीच्या भावविश्वावर व मूल्य संकल्पनेवर, त्याआधारे निर्माण होणार्या कायद्यांवर, रूढी, परंपरांवर होणार आहेत. त्याची सुरुवात बाळ फोंडके यांनी आपल्या कथेतून केली आहे. याकरिता संस्कृती, विज्ञान व जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ अनुभव लागतो. त्या अनुभवाच्या आधारे शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांनी शांतिपर्वात युधिष्ठिराला उपदेशलेला राजधर्म भारतीय राज्यशास्त्राचा मूलभूत आधारग्रंथ बनला आहे. बाळ फोंडके यांच्या कथांची त्या दृष्टीने समीक्षा होणे आवश्यक आहे.
आजही वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते तरुणाच्या उत्साहाने विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. त्यांचे प्रसन्न व उत्साही व्यक्तिमत्त्व त्यांच्यासोबत काम करणार्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरत असते. त्याची हीच प्रसन्नता व उत्साह पुढील अनेक वर्षे टिको व याच पद्धतीने त्यांची शताब्दी आम्हाला साजरी करता येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना!