लोणावळा (अक्षय मांडवकर) - राज्यातील सहा महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'सोबत (बीएनएचएस) सामंज्यस करार करुन पुढील चार वर्षांमध्ये हा कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या सहा पाणथळ जागांसंबधी संवर्धनात्मक धोरणांच्या निर्मितीकरिता हा राज्य कृती आराखडा महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
पक्ष्यांच्या मध्य-आशिया स्थलांतरित पट्ट्याअंतर्गत भाारतातील पाणथळींच्या संवर्धनाकरिता 'बीएनएचएस'ने राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. गेल्या वर्षी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या आराखड्याला मान्यता दिली होती. याअंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांबरोबर देशातील पाणथळ जागांच्या संवर्धनाकरिता कृती आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे.
राज्यातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्याकरिता 'बीएनएचएस'सोबत सामंज्यस करार लवकरच करण्यात येणार माहिती एन.वासुदेवन यांनी दै.'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या कृती आराखड्याकरिता राज्यातील सहा पाणथळींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जायकवाडी, गंगापूर, नांदुरमधमेश्वर, हतणूर, विसापूर आणि उज्जनीच्या पाणलोट क्षेत्राचा समावेश आहे. राज्य कृती आराखड्याकरिता निवडण्यात आलेल्या सहा पाणथळीच्या जागा पक्ष्यांच्या मध्य-आशिया स्थलांतरित पट्ट्यामधील महत्त्वाच्या जागा असल्याची माहिती 'बीएनएचएस'चे संचालक डाॅ. दिपक आपटे यांनी दिली.