‘मनू’चे अरण्य : मनस्वी निसर्गवाचन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2019   
Total Views |



‘मनू’ ही ‘अ‍ॅमेझॉन’च्या अनेक उपनद्यांपैकी एक. पेरू देशातून पुढे वाहत जात ती ‘अ‍ॅमेझॉन’ला मिळते. हा संपूर्ण भाग मिळून एक भव्य परिसंस्था (ecosystem) बनलेली आहे. डॉ. श्रोत्री यांनी या परिसंस्थेचा छोटा, परंतु महत्त्वाचा भाग असणार्‍या ‘मनू’च्या परिसरातल्या जंगलात पाच दिवस मनमुरादपणे केलेल्या भटकंतीचे वर्णन वाचताना आपल्यालाही स्तिमित व्हायला होतं.



जागतिक तापमानवाढ
, बेसुमार जंगलतोड, प्रदूषण अशा समस्यांच्या पृथ्वीवर पडत असलेल्या गडद छायेबद्दल आपल्याला विविध माध्यमांमधून कळत असतेच. त्याच अनुषंगाने यावर्षी एक बातमी आली की, ‘अ‍ॅमेझॉन’च्या जंगलातल्या भयानक वणव्यांमुळे कित्येक हेक्टर जंगल नष्ट होत आहे. कुणीही काळजीत पडावं, अशी ही बातमी होती. मग त्यातूनच अमेझॉनच्या जंगलाबद्दल अधिकाधिक माहितीचा शोध घेतला जाऊ लागला. त्यातून काही विस्मयकारक माहिती कळली. उदा. इथे पृथ्वीवरील सर्वात जास्त जैववैविध्य आहे. या जंगलाची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की, इथून पृथ्वीवरच्या एकूण प्राणवायूच्या 20 टक्के प्राणवायूची निर्मिती होते आणि म्हणूनच त्यांना ‘पृथ्वीची फुप्फुसं’ म्हटलं जातं इ. परंतु, या जंगलांबद्दल तात्कालिक बातम्यांच्या पुढे जाऊन अधिक सविस्तर माहिती देणारं लिखाण मराठीत अभावानेच आढळलं. अशा पार्श्वभूमीवर डॉ. संदीप श्रोत्री लिखित ‘मनूचे अरण्य’ हे नवं पुस्तक लक्षवेधी ठरतं. ‘अ‍ॅमेझॉन’ आणि तिच्या अनेक उपनद्या यांच्या भोवताली पसरलेलं जंगल इतकं प्रचंड आहे की, दक्षिण अमेरिकेतल्या एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. ‘मनू’ ही ‘अ‍ॅमेझॉन’च्या अनेक उपनद्यांपैकी एक. पेरू देशातून पुढे वाहत जात ती ‘अ‍ॅमेझॉन’ला मिळते. हा संपूर्ण भाग मिळून एक भव्य परिसंस्था (ecosystem) बनलेली आहे. डॉ. श्रोत्री यांनी या परिसंस्थेचा छोटा, परंतु महत्त्वाचा भाग असणार्‍या ‘मनू’च्या परिसरातल्या जंगलात पाच दिवस मनमुरादपणे केलेल्या भटकंतीचे वर्णन वाचताना आपल्यालाही स्तिमित व्हायला होतं.



हे जंगलवाचन सुरू होतं खुद्द
‘मनू’च्या सान्निध्यात पोहोचण्यापूर्वीच. कुझ्को शहरातून निघाल्यापासून दिसणारी निसर्गाची रूपं लेखकाच्या शब्दांमधून अनुभवत डोंगराळ वनांपासून अलगदपणे आपणही प्रत्यक्ष नदीच्या खोर्‍यातल्या जंगलात पोहोचतो. या जंगलातले जैववैविध्य स्तिमित करणारे आहे. अनेक छोटे-मोठे जीव, विविध प्रकारच्या वनस्पती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे येथील पक्षिसृष्टी. त्यांच्याबद्दल पुस्तकामध्ये विस्ताराने लिहिलेले आहे. रोजच्या आयुष्यात आपल्याला आपल्या अन्नसाखळीची फारशी जाणीव नसते. पण, डोळसपणे निसर्गाकडे बघितल्यावर जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असणारे जीव आपल्याला दिसू लागतात. पुस्तकामध्ये या जंगलात आढळणार्‍या दाट अन्नसाखळीचे दाखले अनेक ठिकाणी आहेत. काहीवेळा एक जीव स्वतः दुसर्‍या जीवाचे थेट अन्न नसूनही तो त्याला त्याचे अन्न मिळवून द्यायला अजाणतेपणी मदत करत असतो. त्याबद्दल विशिष्ट प्रकारच्या मुंग्या आणि ‘टॅनेजर’ पक्ष्याचे एक उदाहरण डॉ. श्रोत्री यांनी दिले आहे. या मुंग्या जेव्हा कोट्यवधींच्या संख्येने एका रहिवासाकडून दुसर्‍या रहिवासाकडे स्थलांतर करतात, तेव्हा ते वाटेत येतील त्या सगळ्याचा फडशा पाडत जातात. अशावेळी या मुंग्यांच्या मागावर हे ‘टॅनेजर’ पक्षी असतात. पण, त्या मुंग्या हे त्या पक्ष्याचे अन्न नसतात, तर त्या मुंग्यांनी हुसकावून लावलेले जमिनीखालचे साप, बेडूक, गांडुळं, कीटक असे ‘बेघर’ जीव हे ‘टॅनेजर’ पक्ष्यांचं अन्न असतं! असं काही वाचलं की सृष्टीमधल्या जीवांच्या परस्परावलंबित्वाकडे आपलं पुन्हा लक्ष वेधलं जातं आणि आपल्याला थेट आवश्यकता नसणार्‍या जीवाचंही आपल्या जगण्यामध्ये कुठेतरी योगदान असतं याची जाणीव प्रकर्षाने होते.



भटकंतीदरम्यान दिसणार्‍या नानाविध जीवांचं स्वरूप
, त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या तशा असण्यामागची कारणं, भवतालाशी जुळवून घेण्यासाठी त्यांनी साधलेलं अनुकूलन असे अनेक तपशील पुस्तकात पानोपानी आहेत. एकेका जीवाची निसर्गाने शांतपणे घडवत नेलेली अनुकूलनं पाहताना, त्या अनुकूलनांबद्दल वाचताना, निसर्गासमोर नतमस्तक व्हायला होतं. उदा. उंच झाडाच्या शेजारी उगवल्यामुळे सूर्यप्रकाश मिळण्याची शक्यता नसेल तर आपल्या मुळांच्या मदतीने चक्क आपलं ठिकाण बदलणारं ‘वॉकिंग पाम’ झाड या जंगलात अस्तित्वात आहे! अशा तपशिलांसोबतच ते ज्या भागात आढळतात, त्या अधिवासाची माहिती, आवश्यक ती शास्त्रीय पार्श्वभूमी यांमुळे पुस्तकात मांडलेलं अनोखं विश्व समजून घ्यायला मदत होते. निसर्गातल्या प्रत्येक बदलामागे किती लांब आणि जटिल प्रक्रिया असते याची यातून जाणीव होते. अशा प्रकारचं साहित्य/विचार अधिकाधिक प्रमाणात आलं तर ही जाणीव अधिक सार्वत्रिक व्हायला मदत होईल.



जेव्हा दाट
, जवळपास अस्पर्शित वनांमध्ये कुणी मनुष्य शिरतो, तेव्हा तो केवळ पर्यटक असून भागत नाही, तर त्याचं कुतूहल जागृत असावं लागतं. सतत जागं असणारं कुतूहल त्याला अधिकाधिक माहिती मिळवायलाच प्रेरित करतं असं नाही, तर निसर्गाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जातं. निसर्गाशी जवळीक साधण्याचा अकृत्रिम भाव पुस्तक वाचत असताना जाणवतो, हे या पुस्तकाच्या लेखनाचं यश आहे. सर्व व्यवधानं, गॅजेट्स बाजूला ठेवून डोळसपणे केलेलं हे अरण्यवाचन आपल्याला बरंच काही नवं देऊन जातं. फक्त ठरलेल्या चौकटीत, गाईड दाखवेल तेवढ्यापुरतंच न बघता, स्वतःहून नवनवीन गोष्टी बघण्याच्या प्रयत्नात राहिल्याने आपल्याला अनेक अवचित क्षण असे गवसून जातात की, त्या वाटेला जाण्याचं सार्थक वाटावं. लेखकाने हे आत्मीय क्षण शब्दांबरोबरच कॅमेर्‍यातही टिपल्याने पुस्तकाला झळाळी प्राप्त झाली आहे.



लेखक स्वतः उत्तम छायाचित्रकार असल्याने त्यांच्या अनुभवांना पूरक छायाचित्रांचीही जोड मिळाली आहे
. पक्षिसृष्टीत आपल्या कल्पनेपलीकडची रंगसंगती अस्तित्वात आहे, हे दाखवून देणारी सुरेख छायाचित्रं पुस्तक देखणं बनवतात. परंतु, छायाचित्रांच्या पुस्तकातील मांडणीबाबत एक सुधारणा सुचवावीशी वाटते. सर्व रंगीत छायाचित्रं पुस्तकामध्ये दोनच ठिकाणी एकवटलेली आहेत. त्यामुळे होतं काय की पक्ष्याचं रसभरीत वर्णन जिथे आहे, तिथे लगेच त्याची कल्पना येण्यासाठी छायाचित्र दिसत नाही. त्यामुळे काहीसा रसभंग होतो. वास्तविक या पुस्तकाची योग्यता संपूर्ण रंगीत छपाईची आहे. पुढच्या आवृत्तीच्या वेळी याचा विचार झाल्यास पुस्तकाच्या रूपातही भर पडेल आणि वाचनीयतेतही. एका अपरिचित विश्वाची ओळख करून देणारं हे पुस्तक वाचनप्रेमी आणि निसर्गप्रेमी या दोहोंच्या पसंतीस उतरेल असं आहे.




पुस्तकाचे नाव : ‘मनू’चे अरण्य

लेखक : डॉ. संदीप श्रोत्री

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

मूल्य : 250 रु

पृष्ठसंख्या : 136 + 32 रंगीत

आवृत्ती : पहिली (ऑगस्ट 2019)

@@AUTHORINFO_V1@@