रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ हे पुस्तक त्याच धाटणीचे वाटल्यास आश्चर्य नाही. पण, त्याला केवळ ‘अनुभवकथन’ म्हणणे लेखकावर अन्याय ठरेल. आज रा. स्व. संघ भारतातील अग्रगण्य व अपरिहार्य संघटन आहे. रमेश पतंगे संघाचे स्वयंसेवक, विचारवंत आहेत. संघ स्वयंसेवकाचे विचार अनेक वर्षे त्यांनी मनमोकळेपणाने शब्दबद्ध केले आहेत.
अनुभवपर लेखन तसे मराठी साहित्यात नवीन नाही. आत्मकथा, आत्मचरित्रांमध्येही अधिकतर अनुभवच शब्दबद्ध केलेले असतात. रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ हे पुस्तक त्याच धाटणीचे वाटल्यास आश्चर्य नाही. पण, त्याला केवळ ‘अनुभवकथन’ म्हणणे लेखकावर अन्याय ठरेल. आज रा. स्व. संघ भारतातील अग्रगण्य व अपरिहार्य संघटन आहे. रमेश पतंगे संघाचे स्वयंसेवक, विचारवंत आहेत. संघ स्वयंसेवकाचे विचार अनेक वर्षे त्यांनी मनमोकळेपणाने शब्दबद्ध केले आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रबोधनातही त्यांच्या लेखनाची प्रमुख भूमिका असते. संघप्रवाहाला नवे आयाम जोडण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अशारितीने अनुभवविश्व समृद्ध झालेल्या व्यक्तीचा जीवनपट केवळ त्याचा वैयक्तिक राहत नाही, तर त्यामध्ये सामाजिकतेचाच वावर अधिक असतो. ‘ब्राह्मणांची, उच्चवर्णीयांची संघटना’ असा संघाचा उल्लेख हेतुपुरस्सर केला जातो. ‘जातीयवादी’, ‘संविधान विरोधी’ असाही दुष्प्रचार कायम संघाच्या वाट्याला येतो. वर्षानुवर्षे या दुष्प्रचाराशी वैचारिक लढा देत असलेल्या रमेश पतंगे यांच्या लेखणीला अनुभवांची धार आली आहे.
संघ ’समता’ शब्द वापरत नाही, तर ‘समरसता’ शब्दाचा प्रयोग करतो. संघाला अपेक्षित असलेल्या सामाजिक समरसतेचे अधिष्ठान निश्चित करण्यातही रमेश पतंगेंनी योगदान दिले. ‘समरसता मंचा’च्या कार्यक्रमांचा मार्ग प्रशस्त करण्यात पतंगे अग्रेसर होते. सामाजिक अभिसरणाच्या चष्म्यातून संघाचा अभ्यास पतंगेंच्या ग्रंथसंपदेशिवाय अपूर्ण राहतो. त्यांनी 1995 साली लिहिलेले ‘मी, मनु आणि संघ’ हे पुस्तक प्रचंड गाजले. आजही वाचक तितक्याच उत्साहात त्या पुस्तकाला प्रतिसाद देतात. त्यानंतर रमेश पतंगेंनी विपुल लेखन केले. विविध विषयांवर पुस्तके लिहिली. प्रस्तुत पुस्तकाचे वेगळेपण हेच की, ’मी, मनु आणि संघ’ पुस्तकाचीच पुढली संहिता असल्यासारखे वाटते. सामाजिक विद्वेष विझवताना आलेल्या अनुभवाचे संचित म्हणजे हे पुस्तक म्हणावे लागेल.
लेखक ‘वैचारिक’ आणि ‘कृती’ अशा दोन्ही आघाड्यांवर सक्रीय राहिलेले असल्यामुळे पुस्तकात केवळ अनुभवकथा नाहीत. पुस्तकात कार्यकर्ता म्हणून आलेल्या अनुभवांसह वैचारिक प्रवासालादेखील तितकेच महत्त्व दिले आहे. त्यामुळे पुस्तक रोजनिशीच्या धाटणीचे होत नाही. पुस्तकात समता, समरसता मूल्याच्या अनुषंगाने तत्त्वज्ञानालाही पुरेपूर जागा दिलेली आहे. भारतीय परिप्रेक्षातून ‘समरसता’ मूल्याकडे कसे पाहिले पाहिजे, याविषयी वाचकाला स्पष्टता येईल. सुरुवातीची काही पाने वगळल्यास, तिसर्या प्रकरणापासून लेखक समरसता-समतेचे तत्त्वज्ञान उलगडणारा प्रवास विशद करतात. अनुभव आणि तात्त्विक तर्कांची सांगड घालून एकंदर मजकूर सोपा करण्याची लेखकाच्या शैलीशी वाचक परिचित असतीलच. ‘समरसतेचा वाटसरू’ हे पुस्तक सहज वाचता-वाचता केव्हा निष्कर्षाप्रत येते, हे वाचकाच्याही लक्षातही येत नाही. कारण, पुस्तकाची रचनाच तितकी सहज आणि सोपी झाली आहे. ‘लेखन प्रवास’ या प्रकरणात मात्र पतंगे त्यांच्या समग्र ग्रंथसंपदेविषयी लिहीत नाहीत. केवळ मोजक्या पुस्तकांचा उल्लेख त्यांनी केला आहे. माहितीपर व चरित्रात्मक अशीही अनेक पुस्तके पतंगे सरांनी लिहिली आहेत.
पुस्तक वाचत असताना मात्र मुद्रितशोधनातील अनेक त्रुटी लक्षात येतात. पुस्तकाच्या समारोपात निष्कर्षप्रबोध शेवटासाठी अधिकच्या पानांची गरज होती, असे वाटते. काळाराम मंदिरातील सुधीर महाराजांचे निवेदन व त्यासारखे काही प्रसंग भावूक करून जातात. कोणालाही न दुखावता आजच्या संदर्भाने प्रत्येक समाजघटकाच्या उणिवा दाखवून देण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत. अनेक प्रकरणात इतिहासाचा संदर्भ आहे, पण मजकूर आणि प्रबोधन आज आवश्यक असलेले आहे. पुस्तकात विज्ञानाचे, राज्यशास्त्राच्या इतिहासाचे अनेक संदर्भ आहेत. ऐतिहासिक ठरलेल्या न्यायालयीन निर्णयांचा आढावाही लेखकाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना पुस्तक आपलेसे वाटेल. ‘समरसतेचा वाटसरू’ हा प्रवास व्यक्तिगत अनुभवकथन नाही. पुस्तक वाचणार्या प्रत्येकाचे भावविश्व समृद्ध करणारे हे ’प्रवासवर्णन’ आहे.
पुस्तकाचे नाव : समरसतेचा वाटसरू
लेखक : रमेश पतंगे
प्रकाशक : गुरुकुलम प्रकाशन, चिंचवड
पृष्ठसंख्या : 200
मूल्य : 260