स्तन्यपानाचे तान्हुल्याच्या वाढीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा स्तन्यनिर्मिती होत नसल्यास त्यावरील उपाययोजना आणि मातेचा आहार याविषयी आजच्या भागात जाणून घेऊया...
बाळाला केवळ स्तन्यपानावरच किमान पहिले सहा महिने ठेवावे. अर्थात, जर स्तन्याची मात्रा कमी पडत असल्यास, बाळाची भूक भागत नसल्यास, अन्य उपाय/आहार देणे गरजेचे आहेत. आयुर्वेदशास्त्रात 'धात्री' ही संकल्पना यासाठी सुचविली आहे. 'धात्री' याचा अर्थ 'दाई' असा घ्यावा. ज्या मातेस स्तन्याची मात्रा अपूर्ण येते किंवा येतच नाही असे असल्यास, दुष्ट-खराब असल्यास, त्या स्तन्यपानाने बाळाची तृप्ती, समाधान आणि भरणपोषण हवे तसे होत नाही. परिणामी, वाढ खुंटू शकते. तसेच, बाळ सतत कुरकुरत राहते. शांत झोपत नाही आणि शौचासदेखील व्यवस्थित होत नाही. अशा वेळेस इतर पर्याय शोधणे गरजेचे आहे. मनुष्य शरीराला (बाळाला) स्तन्य जसे 'सात्म्य' होते, पचते, 'सूट' होते, तसे अन्य कोणतेही अन्न होणार नाही.
अशा वेळेस 'दाई'चे स्तन्य पाजावे. 'दाई'चे स्तन्य कसे असावे? तर आधी सांगितल्याप्रमाणे, शुद्ध स्तन्याचे गुण त्यात असावेत. म्हणजे शंखाच्या रंगासारखे पांढरे शुभ्र, थोडासा स्निग्धांश त्यात असावा, दिसायला स्वच्छ आणि पाण्यासारखे पातळ असावे. स्पर्शाला ना थंड, ना गरम (किंवा किंचित थंड असावे.) त्याची चव गोड असावी आणि पाण्यात त्याचे दोन-तीन थेंब टाकल्यास ते पाण्यात चटकन विरघळून जावेत. त्यात तंतुमयता नसावी किंवा पाण्याच्या तळाशी ते राहू नये. त्याला दुर्गंधही नसावा. असे स्तन्य बाळाच्या वाढीसाठी पूरक ठरते. काही वेळेस काही प्रसूत झालेल्या स्त्रियांमध्ये स्तन्याचे प्रमाण खूप जास्त असते. बाळाची भूक भागली तरी स्तन्य शिल्लक असते. तसेच काही वेळेस प्रसुती झाल्यावर बाळ जगत नाही, पण त्या मातेला पाझर फुटलेला असतो आणि त्या स्तन्याचा मातेस त्रास होतो, मातेला ताप येतो, दूधाच्या गाठी होतात इ. अशा स्त्रियांचे स्तन्य इतर बालकांना द्यावे, ज्यांना नैसर्गिक मातेचे स्तन्य अपुरे पडते किंवा मिळत नाही.
हल्ली याच संकल्पनेवर काही विदेशामध्ये 'मिल्क बँक' सुरू झाल्या आहेत. 'मिल्क बँक' ही संकल्पना भारतातील प्राचीन संस्कृतीत आणि वैद्यकशास्त्रात नमूद केलेली आहे. त्याचा अवलंब भारतात काही अंशी छोट्या खेड्यांमधून होतो, पण शहरांमध्ये ही संकल्पना अनेकांना माहीत नाही. हल्ली तीन-चार महिन्यांच्या बाळाला घरी किंवा 'डेकेअर'ला सोडून मातेला घराबाहेर पडावे लागते. सकाळी जाण्यापूर्वी स्तन्यपान केले जाते. त्यानंतर थेट रात्री घरी आल्यावर बाळाचे दर्शन होते. मग त्याला पर्याय म्हणून 'Tinned Formula' वापरला जातो. अशा 'मिल्क बँक'चा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होणे खूप गरजेचे आहे. जसे रक्तदान करताना त्याची जातपात न बघता, केवळ हिमोग्लोबीन आणि रक्तगट तपासला जातो, तसेच फक्त स्तन्याचा दर्जा बघून त्याचा वापर कुठल्याही बाळासाठी गरजेनुसार करता येतो.
'पावडर्ड फॉर्म्युला' जेवढा टाळता येईल तेवढा चांगला. धात्री/दाईची सोय होत नसल्यास गाईचे दूध द्यावे. मातेच्या दुधाइतकेच उत्तम व मातेनंतर गाईचे दूध बाळाला 'सूट' होते. म्हशीचे, जर्सी गाईचे दूध वापरू नये, ते पचायला खूप जड असते. गाईचे दूध हे खूप तरल (पातळ) असते. अगदी मातेच्या स्तन्यासमान असणारे गावठी गाईचे दूध पर्यायी सोय म्हणून देण्यास हरकत नाही.
गाईचे अन्न, पाला, गवत यावर तिच्या दुधाचा 'दर्जा' ठरतो. त्यामुळे हे दूध बाधू नये म्हणून दुधात थोडी सुंठ घालावी. उकळताना थोडी सुंठ घालून उकळावे आणि नंतर सुंठ काढून घ्यावी, नाहीतर त्यात सुंठीचा थोडा तिखटपणा उतरेल. लहान मुलांमध्ये वारंवार जंत होण्याची, कृमी होण्याची शक्यता असते. ती काढून टाकण्यासाठी या दुधात थोड्या वावडिंगाच्या गोल बिया घालाव्यात. सुंठीप्रमाणेच उकळून झाल्यावर या बिया काढून घ्याव्यात.
बाळाला हे दूध देताना त्यात साखर किंवा गूळ घालू नये. शक्यतो गाईच्या दुधात पाणी घालू नये. पण, गावठी गाईचे दूध नसल्यास किंवा दुधाचा स्रोत माहीत नसल्यास दुधाच्या फक्त एक चतुर्थांश त्यात पाणी घालून उकळावे आणि ते दूध कोमटसर असताना बाळाला पाजावे. एका वेळेस लागेल एवढ्याच प्रमाणात दूध एकावेळेस गरम करावे. दिवसभराचे दूध एकदम तयार करून ठेवू नये.(गरम करून ठेवू नये.) तसेच तयार केलेले दूध फ्रीझमध्ये ठेवून पुन्हा वापरू नये. आयुर्वेदशास्त्रानुसार एका वेळेस उकळविलेले, शिजवलेले, आटवलेले अन्नपदार्थ, द्रव व घन पुन्हा गरम करू नयेत, त्याचे गुणधर्म बदलतात.
लहानपणी बाळाचे डोके शरीराच्या आकारापेक्षा मोठे असते. याचे एक कारण म्हणजे 'Skull'ची सगळी हाडे एकत्र 'Fuse' झालेली नसतात. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन ते चार महिने लागतात. तसेच बाळाची पचनशक्ती, विघटनशक्ती सावकाश विकसित होत असतात. दूध कमी आहे म्हणून भाताची पेज, डाळीचे पाणी, फळांचा रस इ. लगेच सुरू करू नये. किमान पहिले सहा महिने फक्त स्तन्यावर बाळाची वाढ होणे अपेक्षित आहे. यामुळे पचनशक्ती आणि आतड्यांची शक्ती उत्तमरित्या विकसित होते. एकदा का या गोष्टी (आतड्या व अन्य अंतर्गत अवयव) की मूल मोठेपणी सर्व पचवू शकते. (अतिरेक करत नसल्यास) पहिले सहा महिने उलटून गेल्यावर बाळाच्या वाढीनुसार आणि गरजेनुसार विविध अन्नपदार्थांचा त्याच्या आहारात समावेश करावा. काही नियम मात्र कटाक्षाने लक्षात ठेवावे आणि पाळावेत. जे काही अन्नद्रव सुरू केले जाईल (द्रवस्वरूपात) ते दुधासारखे तरल-पातळ असावे. (Same consistency) खूप दाट नसावे. या लहान वयात कुठलेही मसाले, मीठ, तिखट पदार्थ त्यांना देऊ नये. दात आल्यानंतर स्वत:च्या हाताने खायला लागल्यानंतर आणि पाच वर्षांचे बाळ झाल्यावर टप्प्याटप्प्याने हळूहळू अन्नात बदल करावा. काही अन्नघटक रोज खाल्ले तरी चालतात. काही गोष्टी क्वचित खाव्यात आणि काही आहारघटक टाळावेत. हे सगळे आहाराचे नियम फक्त लहान बाळांसाठी नाही, तर लहान-मोठ्या सर्वांनी पाळणे गरजेचे आहे. कारण, चांगले सकस अन्न खाल्याने शरीरातील पोषक घटक उत्तम निर्माण होतात आणि आरोग्य टिकण्यास मदत होते. याउलट जर आहाराचे नियम न पाळता काहीही, कधीही, कसेही खाल्ले तर आजाराला निमंत्रण दिल्यासारखे आहे.
पुढील भागात बालकांचा आहार कसा असावा याबद्दल जाणून घेऊया.
(क्रमश:)
९८२०२८६४२९
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)