असीम श्रद्धेचा अविरत लढा; 'Flight of Deities and Rebirth of Temples'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2019   
Total Views |



इतिहासातील काळी आणि त्याचबरोबर सोनेरी पानेही उजेडात आणणारे हे पुस्तक अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक या सर्वांनी आवर्जून वाचायलाच हवे असे आहे.


भारतासारख्या खंडप्राय देशात वर्षानुवर्षांच्या विविध प्रांतांमधल्या सांस्कृतिक मंथनातून देवता आणि उपासनापद्धतीमध्येही विविध छटा निर्माण होत गेल्या. यातून विविध पंथ निर्माण होत गेले. या सर्व गोष्टींचा मिळून जो 'लसावि' निघतो तो 'हिंदू धर्म' म्हणून ओळखला जातो. यातल्या विविध प्रवाहांमध्ये ईश्वरी शक्तीची अनेक रूपं साकार होत गेली. कालौघात काही जुन्या देवता विस्मृतीत गेल्या आणि नव्या निर्माण होत गेल्या. त्यांच्या उपासनेसाठी एकाहून एक सरस मंदिरं निर्माण केली गेली. मंदिरांमधल्या शिल्पांमध्ये भक्ती आणि कल्पकता यांचा अपूर्व संगम होता. ही मंदिरं फक्त प्रार्थनास्थळं नव्हती, तर ऊर्जास्थानं होती. भारतभूमीच्या कानाकोपऱ्यातून आपल्या दैवताच्या दर्शनासाठी येणाऱ्या श्रद्धाळूंना इथे येऊन नवचैतन्य प्राप्त होई. परंतु, भारताच्या वायव्य बाजूने आलेल्या 'इस्लाम' नामक झंझावाताने येथील संस्कृतीला अभूतपूर्व हादरे दिले. वैदिक हिंदू, बौद्ध, जैन यापैकी कुणाचंही श्रद्धास्थान या तडाख्यातून सुटलं नाही. खरंतर यापूर्वीही भारतावर शक, हूण, ग्रीकांपासून अनेक आक्रमणं झाली होती. पण, अरबस्तानातून आलेल्या मोहम्मद बिन कासिमच्या पाठोपाठ गझनीचा महमूद, कुतुबुद्दिन ऐबक, सिकंदर लोधी, अल्लाउद्दिन खिलजी, औरंगजेब इत्यादींनी आपल्या धर्माच्या शिकवणीला शिरोधार्य मानून हे पाशवी कार्य ज्या भक्तिभावाने आणि ताकदीने पुढे नेले, ते सर्व अकल्पनीय होते. त्यापुढची १३०० वर्षं येथील मंदिरं उद्ध्वस्त होत राहिली, पण त्या अवशेषांमधूनही ती मंदिरं पुन्हापुन्हा उभी राहिली. या सगळ्याचा लेखाजोखा मीनाक्षी जैन लिखित 'Flight of Deities and Rebirth of Temples' या पुस्तकात विस्ताराने मांडला आहे.

 

पुस्तकात विस्तृत इतिहास प्रांतशः मांडला गेला आहे. पुस्तकामध्ये सिंध, काश्मीरपासून ते तिरुपतीपर्यंत आणि आसामपासून गुजरातपर्यंत, प्रत्येक प्रांतात कुठल्या काळात कुठली मंदिरं पाडली गेली त्याची यात नोंद आहे. कुठलाही देव, पंथ या तडाख्यातून सुटला नाही. काशिविश्वेश्वर, मथुरेचे केशव मंदिर, अयोध्येचे राम मंदिर, पुरीचे जगन्नाथ मंदिर, देवगिरीची जैन मंदिरे, बामियानच्या बुद्धमूर्ती अशा अनेक प्रसिद्ध श्रद्धास्थानांवर घण पडले. कुतुबुद्दिन ऐबकाने एकट्या काशीत हजार मंदिरे तोडली. प्रमुख मंदिरांच्या जागांवर हिंदूंच्या नाकावर टिच्चून मशिदी उभ्या केल्या गेल्या. त्या सगळ्यांसाठी कच्चा माल म्हणून पाडलेल्या देवळाचे खांब, शिला यांचाच वापर केला गेला. शिवलिंगं मुद्दामून मशिदींच्या पायऱ्यांखाली गाडली गेली. काही मूर्ती पळवून नेल्या गेल्या. मंदिरातून केलेल्या लुटीची तर गणतीच नाही. इस्लामी आक्रमण कमी म्हणून की काय, गोव्यात दुसऱ्या एकेश्वरवादी धर्माच्या पाईकांनी- पोर्तुगीज ख्रिश्चनांनी अनेक मंदिरं नष्ट केली. वाईट गोष्ट ही की, स्वातंत्र्यानंतरही मंदिरं-मूर्तींवर गंडांतरं येत राहिली. उदा. २०१९ साली छत्तीसगढच्या जंगलात एका कड्यावर असणारी हजार वर्षं जुनी गणेशमूर्ती माओवाद्यांनी दरीत लोटून दिली. मंदिरांमधून, संग्रहालयांमधून अनेक जुन्या मूर्तींची तस्करी झाली. सामान्य वाचकांसाठी, भाविकांसाठी तो अतिशय उद्विग्न करणारा आहे, व्यथित करणारा आहे. 'माझ्या धर्मात मूर्तिपूजा मान्य नाही म्हणून ती कुठल्याही धर्माच्या अनुयायांनी मान्य करू नये,' अशा टोकाच्या विद्वेषी भूमिकेतून झालेल्या नासधुसीमुळे भारतीय कला, संस्कृती यांची अपरिमित हानी झाली.

 

मंदिरांचा पुनर्जन्म

 

हा इतिहास जितका विध्वंसाचा आहे, तितकाच पुनर्निर्माणाचाही आहे. पुस्तकाच्या शीर्षकातूनच लेखिकेचा या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. शक्तिशाली इस्लामी, ख्रिश्चन राज्यकर्त्यांकडून पाडली गेलेली मंदिरं हिंदू पुन्हा नेटाने उभे करत राहिले, यामध्ये हिंदू राजसत्ता आणि सर्वसामान्य जनता अशा सर्वांचा सहभाग होता. उदा. काशिविश्वेश्वराचं देऊळ. ते चार वेळा पाडलं गेलं, पण दरवेळी थोडं स्थान बदलून उभं राहिलं. एकदा नारायण भट्टाकडून एकदा त्याचं पुनर्निर्माण झालं, एकदा अहिल्याबाई होळकरांकडून झालं. रणजितसिंहांनी त्यावर सोन्याचे पत्रे चढवले. देवळं म्हणजे राजसत्तांच्या डावपेचांचा हा एक भाग होता आणि सामान्य जनतेला त्यांच्याशी काही देणेघेणे नव्हते, हा डाव्या इतिहासकारांचा लाडका सिद्धांत. परंतु, इतिहासात कुठलीही हिंदू राजसत्ता प्रबळ नसतानाच्या काळातही हिंदूंकडून मंदिरांचे पुनर्निर्माण होत राहिले. गेलेली तीर्थस्थाने मिळवण्यासाठी संघर्ष होत राहिले. औरंगजेबाशी तर चक्क आखाड्यांमधल्या साधुसंन्याशांनी लढा दिला. एखाद्या प्रांतात एखाद्या कठीण कालखंडात सक्षम नेतृत्व नसेल, तर बाहेरच्या प्रांतातून कुणी ना कुणी तिथे येऊन सूत्रं हाती घेतली. उदा. माधवेंद्र पुरी यांनी गोवर्धन येथे श्रीकृष्ण मूर्ती स्थापन केली. तेलुगू कुटुंबातल्या वल्लभाचार्य यांनी ब्रज प्रांतात येऊन गोविंदनाथाची स्थापना केली.

 

देवतांचे स्थलांतर

 

परचक्राची कुणकुण लागल्यावर मूर्ती वाचवण्यासाठी सर्वसामान्यांकडूनदेखील अनेक प्रकारचे उपाय आणि युक्त्या केल्या गेल्या. बऱ्याचदा देवाचे पावित्र्य तरी अबाधित राहावे या उद्देशाने देवळांमधल्या मूर्ती हलवल्या जात. काहीवेळा त्या मूर्ती मोठे एकेठिकाणी खड्डा करून त्यात विधिवत पुरल्या जात. कालांतराने त्या बाहेर काढल्या जात. परंतु, अनेकदा मधल्या काळात बऱ्याच कारणांमुळे त्यांचा ठावठिकाणा हरवायचा. अशा अनेक मूर्ती अलीकडच्या काळात उत्खननात मिळाल्या आहेत. कधी देवळातून हलवलेल्या मूर्ती त्या किंवा अन्य प्रांतातल्या सुरक्षित ठिकाणी नेल्या जात. राजस्थान हे सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असलेल्या देवतांसाठी जणू आश्रयस्थानच होतं. लेखिकेने अन्य प्रांतांमधून राजस्थानात आलेल्या मूर्तींची अनेक उदाहरणं इथे दिली आहेत. सगळ्यात थक्क करणारा प्रवास हा मथुरेहून निघालेल्या गोविंददेवाच्या मूर्तीचा आहे. मथुरेकडून निघालेली ही मूर्ती टप्प्याटप्प्याने पश्चिमेकडे हलवली गेली. या मूर्तीचा प्रवास तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ झाला. दरम्यानच्या काळात आठ ठिकाणी मूर्तीचे मुक्काम झाले. यामध्ये सामान्य माणसाच्या घरापासून ते मोठ्या सरदारांच्या गढीपर्यंत सर्व प्रकारची मुक्कामस्थानं आली. अखेर ही मूर्ती जयपूरला येऊन विसावली. काहीवेळा मूर्ती देवळाबाहेर न हलवता देवळातल्याच गुप्त दालनात हलवली जात असे. महाराष्ट्रात औंढा नागनाथ येथे अशा प्रकारचे दालन आहे. जगन्नाथपुरी येथे मंदिराचा नाश करायचे औरंगजेबाचे फर्मान निघाल्यानंतर तिथल्या दिव्यसिंहदेव राजाने औरंगजेबाच्या सुभेदाराला फितवले आणि मंदिराची जुजबी मोडतोड करून मंदिर तोडल्याचा आभास निर्माण केला आणि मंदिराच्या बंद दरवाज्याआड पूजा चालूच ठेवली गेली. थोडक्यात काय, तर मंदिरांचा लढा हा समग्र हिंदू समाजाने आपापल्या परीने चालूच ठेवला. या सगळ्याच्या मुळाशी होती या समाजाची आपल्या देवतांवरची आणि धर्मावरची असीम आणि अतूट श्रद्धा. या श्रद्धेने त्यांना अनेक मोठ्या संकटांचा सामना करण्याचे बळ दिले. या श्रद्धेमुळेच या लढ्याच्या मशाली तेवत राहिल्या.

 

संयत मांडणी

 

पुस्तकाबद्दल आवर्जून सांगायचे म्हणजे हा सगळा इतिहास लेखिकेने कुठेही आक्रस्ताळी भाषा न वापरता, भावनिक साद न घालता मांडला आहे. विरुद्ध मतांचे उल्लेख त्यामध्ये आहेत आणि आवश्यक तिथे संयतपणे त्यांचा प्रतिवादही केला आहे. पुराणं व जुने ऐतिहासिक ग्रंथं, इब्न बतूता, ह्युएन त्संग, अल-बेरूनी, निकोलो मनुची अशा प्रवाशांची प्रवासवर्णनं, इतिहास संशोधकांचे ग्रंथ, समकालीन आणि आधुनिक अभ्यासकांच्या नोंदी, इंग्रजांचे अहवाल व पत्रं अशा प्रचंड दस्तावेजांमधून हे पुस्तक साकारलेलं आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या संदर्भसूचीवरून लेखिकेच्या अफाट प्रयत्नांची कल्पना येते. राम मंदिराचा मुद्दा अंतिम टप्प्यात असताना हा केवळ काही लोकांनी स्वार्थासाठी चालू ठेवलेला मुद्दा आहे, असा अज्ञानापोटी किंवा जाणीवपूर्वक खोडसाळ अपप्रचार केला जात आहे. अशा शंकासुरांना या मंदिरविध्वंस आणि त्यांचा पुनर्जन्म हा किती जुना आणि व्यापक विषय आहे, जाणीव करून देण्याची ताकद या पुस्तकात आहे. इतिहासातील काळी आणि त्याचबरोबर सोनेरी पानेही उजेडात आणणारे हे पुस्तक अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक या सर्वांनी आवर्जून वाचायलाच हवे असे आहे.

 
 

पुस्तकाचे नाव : Flight of Deities and Rebirth of Temples - Episodes From Indian History

लेखिका : मीनाक्षी जैन

प्रकाशक : आर्यन बुक्स इंटरनॅशनल, नवी दिल्ली

आवृत्ती : पहिली (२०१९)

पृष्ठसंख्या : ४०५

मूल्य : ८९० रु


@@AUTHORINFO_V1@@