केरळमधून कोळ्यांच्या दोन नव्या प्रजातींचा शोध ; सचिन तेंडुलकरच्या नावाने नामकरण

    13-Nov-2019
Total Views | 104



 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - केरळमधून कोळ्यांच्या दोन नव्या प्रजातीचा शोध लावण्यात गुजरामधील संशोधकाला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, यातील एका प्रजातीचे नामकरण लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावे करण्यात आले आहे. ’मॅरेंगो सचिन तेंडुलकर’ आणि ’इंडोमॅरेंगो छावारापटेरा’ असे या नव्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. या दोन्ही प्रजाती जीवशास्त्र विज्ञानाकरिता नव्या असून जगात या पोटजातीमध्ये केवळ तीन प्रजाती आढळतात.

 
 

भारतात आढळणार्या कोळ्यांच्या प्रजातींमध्ये दोन नव्या प्रजातींची भर पडली आहे. गुजरातमधील ’गीर फाऊंडेशन’मध्ये काम करणारे संशोधक ध्रुव प्रजापती यांनी केरळ राज्यातून या दोन प्रजातींचा उलगडा केला आहे. ’इंडोमॅरेंगो’ या पोटजातीमधील या दोन प्रजाती आहेत. 2015 मध्ये केरळमध्ये संशोधन करताना प्रजापतींना दोन प्रजाती आढळून आल्या होत्या. त्यानंतर प्रजापतींनी कोळ्यांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. सप्टेंबर महिन्यात त्यांनी नव्या प्रजातीवर आधारित शोधनिबंध लिहिला. हा शोधनिबंध रशियन जर्नल ’अ‍ॅथ्रोपोडा सिलेक्टा’मध्ये प्रकाशित झाल्याने प्रजापती यांच्या शोधाला मान्यता मिळाली आहे.

 
 

 
 
 

या नव्या प्रजातीमधील एका प्रजातीला ’मॅरेंगो सचिन तेंडुलकर’ आणि दुसर्‍या प्रजातीस ’इंडोमॅरेंगो छावारापटेरा’ असे नाव देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आवडता क्रिकेटपटू असल्याने त्याचे नाव एका कोळ्याच्या प्रजातीला दिल्याची माहिती प्रजापती यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. दुसरे नाव हे केरळचे संत कुरैकोर एलिया छावरा यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या प्रजातींची निश्चिती ’आकारशास्त्रा’च्या आधारे करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जगात ‘इंडोमॅरेंगो’ पोटजातीमधील केवळ तीन प्रजाती अस्तिवात आहेत. प्रजापती यांनी शोधून काढलेल्या या नव्या प्रजातींमुळे ‘इंडोमॅरेंगो’ पोटजातीत भर पडली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121