मध्ययुगीन काळातील मुस्लीम समाजात प्रचलित असलेल्या अनेक मागास प्रथा, परंपरा आणि रुढी आजही जगातल्या कित्येक इस्लामी देशात पाळल्या जातात. अशा कालबाह्य गोष्टींना कवटाळून बसलेल्या कट्टरवादी देशांत सौदी अरेबिया, पाकिस्तानसह इराणचाही समावेश होतो. अर्थातच, या सर्वच देशांत पुरुषांनी तयार केलेल्या बंधनांना सर्वाधिक बळी पडतात, त्या महिलाच. परंतु, नुकतीच इराणमध्ये अशी एक घटना घडली की, त्यापुढे देशातल्या सर्वोच्च सत्तेलाही झुकावे लागले. का, कसे, केव्हा?
इराणमध्ये महिलांवर विविध निर्बंध असून त्यांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब परिधान केल्याशिवाय वावरता येत नाही. तिथे महिलांना आधुनिक कपडे परिधान करता येत नाहीतच, पण पुरुषी वातावरणात, पुरुषांशी संबंधित ठिकाणी जाताही येत नाही. मात्र, हे धाडस इराणमधील २९ वर्षीय सहर खोडयारी या तरुणीने केले आणि मग काय तिथे कल्लोळच माजला. त्याचे झाले असे की, सहर अॅस्टेगलल फुटबॉल क्लबच्या संघाची समर्थक होती व आपल्या संघाचा सामना प्रत्यक्ष पाहावा, असे तिला वाटले. यंदाच्या मार्च महिन्यात तेहरानच्या आझाद मैदानात हा सामना आयोजित करण्यात आला होता. निळ्या रंगाच्या गणवेशात मैदानावर उतरलेल्या अॅस्टेगलल फुटबॉल क्लबच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी सहरदेखील पुरुषी पेहराव करून, निळ्या रंगाचा विग लावून आणि पायापर्यंत पोहोचणारा ओव्हरकोट घालून आझाद मैदानाकडे जायला निघाली. पण, ती मैदानाजवळ आली आणि आत जाणार, तोच तिला तिथल्या सुरक्षारक्षकांनी बेड्या ठोकल्या व न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयानेही सहरला नोटीस बजावली व शिक्षेचा उल्लेख केला. मात्र, हे सहन न झालेल्या सहरने दमन, दडपशाहीविरोधात बंडाचा पवित्रा घेतला आणि न्यायालयाबाहेरच आत्मदहन केले. सहरने स्वतःला जाळून घेत न्यायालयाचा, इराणी सरकारचा आणि तिथल्या कायदे-नियमांचा निषेध केला पण, काय होता तिथला कायदा?
रुढीप्रिय शिया मुस्लीम देश असलेल्या इराणमध्ये १९७९ साली इस्लामी क्रांती झाली व तिथे महिलांना केस मोकळे किंवा खुले सोडण्यावर, तंग कपडे घालण्यावर, तलाकचा खटला दाखल करण्यावर, मद्यसेवन व संगीत-वादन-गायनावर बंधने लादली गेली. तसेच मैदानात महिलांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली. पुरुषी वातावरणाचा तसेच पूर्ण अंग न झाकलेल्या पुरुषांना पाहिल्यास महिलांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा तर्क देत असे केले गेले. हा कायदा वर्षानुवर्षांपासून तिथे लागू असून इराणचे विद्यमान अध्यक्ष हसन रुहानी यांनी त्यात सुधारणा करण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही. म्हणूनच आजही इराणमध्ये महिलांकडे दुय्यम दर्जाची व्यक्ती म्हणूनच पाहिले जाते व तशीच वागणूकही दिली जाते. सहरच्या अटकेलाही हीच गोष्ट कारणीभूत ठरली व त्यातच तिचा बळी गेला. परंतु, सहरच्या मृत्यूने इराणमधील महिलांना समानतेचा थोडाफार अवकाशही दिला. सहरचा जीव गेल्यानंतर इराणमध्ये समाजमाध्यमांवर मोहीम राबवली गेली. आंतरराष्ट्रीय माध्यमांतही ही घटना चर्चिली गेली व इराणवर दबाव वाढू लागला. महिलांना मैदानात जाण्यापासून रोखणारा कायदा रद्द केला जावा, म्हणून आवाज उठवला गेला. त्यात सुधारणावादी कार्यकर्त्यांसह महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला. अखेर इराणी सरकारला जाग आली आणि त्यांनी निर्बंधात सूट दिली.
इराणच्या सरकारी वृत्तसंस्था-'इरना'ने यासंबंधीचे वृत्त दिले असून येत्या १० ऑक्टोबरला कंबोडियाबरोबर होणाऱ्या फूटबॉल सामन्यात महिलादेखील प्रेक्षक म्हणून उपस्थित राहू शकतील, असे सांगितले. इराणी फूटबॉल फेडरेशनने आंतरराष्ट्रीय फूटबॉल संघटना-'फिफा'ला तसे आश्वासन दिले असून कमीत कमी ३ हजार, ५०० महिला हा सामना पाहू शकतील. इराणच्या या निर्णयानंतर महिलांना सामन्याची तिकिटे देण्यासाठी निराळी व्यवस्थादेखील करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ अर्ध्या तासातच सर्वच्या सर्व म्हणजे ३ हजार, ५०० तिकिटे विकलीही गेली. दरम्यान, 'फिफा'ने मात्र या सामन्यावेळी प्रत्यक्षात महिला हजर आहेत किंवा नाहीत, हे पाहण्यासाठी आपल्या पर्यवेक्षकांनाही पाठवणार आहे. अर्थात यासाठी एका सहरला शहीद व्हावे लागले, हे नक्कीच दुर्दैवी.