श्रीनगर : केंद्र सरकारने ‘कलम ३७०’ हटविल्यानंतर काश्मिरातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी भारताच्या दौर्यावर आलेल्या युरोपियन खासदारांच्या शिष्टमंडळाने एमआयएमचे खासदार असरुद्दीन ओवेसी यांना बुधवारी चांगलेच सुनावले.
या दौर्यावरून युरोपियन खासदारांना नाझी समर्थक म्हणून संबोधणार्या ओवेसी यांना शिष्टमंडळातील खासदारांनी ‘आधी जाणून घ्या आणि मग बोला’ असा सल्ला दिला. युरोपियन युनियनच्या खासदारांना जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्यामुळे ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. नाझी समर्थकांना काश्मीरमध्ये पाठवले जात असल्याचे ते म्हणाले होते. यावर केंद्र सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण युरोपियन खासदाराने यावर उत्तर दिले. “माध्यमांमध्ये प्रतिक्रिया पाहिली, ज्यात आम्हाला नाझी समर्थक सांगण्यात आले, हे पाहून मला आश्चर्य वाटले. मात्र, कुणीही बोलण्यापूर्वी आमच्याबाबत माहिती काढणे आवश्यक आहे. मी मंत्री म्हणून काम केले असून विविध १४ पदांवर निवडून आलो आहे,” असे फ्रान्सचे नेते आणि खासदार थियरी मरिआनी यांनी ओवेसी यांना सुनावले.
“६१ वर्षीय मरिआनी फ्रान्सच्या द रिपब्लिकन्स पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी परिवहनमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. माझी राजकीय कारकिर्द ४० वर्षांपूर्वी सुरू झाली, नाझी समर्थक असतो, तर निवडून आलो नसतो, ” असेही ते म्हणाले. काश्मीरच्या लोकांशी आम्ही बातचीत केली, ज्यात त्यांनी आम्हीही इतर देशवासीयांप्रमाणेच भारतीय असल्याचे सांगितले.