मलेशिया आणि तुर्कीविरुद्ध भारताचे व्यापार अस्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Oct-2019   
Total Views |





मलेशियाला भारताने व्यापारातून दिला झटका


“भारताने आक्रमण करून जम्मू-काश्मीर ताब्यात घेतलं आहे. भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करून तोडगा काढावा,” असे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये केले होते. मलेशियन पंतप्रधानांच्या या विधानावर भारत सरकार नाराज आहे. मलेशियाच्या भूमिकेला उत्तर म्हणून भारताने त्यांच्याकडून पाम तेलाची आयात कमी केली आहे. भारत जगामध्ये पाम तेलाची सर्वाधिक खरेदी करणारा देश म्हणून ओळखला जातो. भारत मलेशियाऐवजी इंडोनेशिया आणि युक्रेनकडून खाद्यतेलाची खरेदी वाढवणार आहे. एखाद्या देशाच्या न पटणार्‍या राजकीय भूमिकेवर भारताने प्रथमच व्यापाराच्या माध्यमातून आपली नाराजी दाखवून दिली आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्येसुद्धा व्यापारयुद्ध सुरू आहे. जिथे व्यापाराचा शस्त्रासारखा वापर होत आहे. पाम तेल हे मलेशियाचे कृषी निर्यातीचे सर्वात मोठे उत्पादन आहे. भारताने जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान मलेशियाकडून ३.९ दशलक्ष टन म्हणजे २ अब्ज डॉलर पाम तेलाची खरेदी केली.



गेली काही वर्षे भारत
, मलेशिया आणि दक्षिण पूर्व आशियामधील देशांशी मैत्री वाढवण्याचा भारत जोरदार प्रयत्न करत आहे. मागील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मलेशियाशी विशेष आर्थिक करार केला होता. २०१८ मध्ये नझिफ रझाक यांना आपल्या २६ जानेवारीच्या परेडला मुख्य पाहुणे म्हणून बोलावले होते. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा मलेशियामध्ये नवीन पंतप्रधान महातिर मोहमद निवडून आल्यानंतर त्यांच्याशी लगेच भेट घेऊन पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. भारत आणि मलेशियामध्ये झालेल्या कराराप्रमाणे एकमेकांमध्ये आर्थिक सहकार्य वाढवायचे ठरवले होते. परंतु, त्याचा फायदा मलेशियाला झालेला आहे. म्हणजेच भारताने मलेशियाकडून १०.८१ अब्ज एवढ्या वस्तू आयात केल्या. परंतु, भारताने निर्यात केलेल्या वस्तूंपेक्षा ४ अब्ज डॉलर्सने कमी होत्या.



मलेशिया विरुद्ध पर्यटन युद्ध



संयुक्त राष्ट्र परिषदेत मलेशियाचे राष्ट्रप्रमुख महातिर यांनी एक मोठे लांबलचक भाषण करत पाकिस्तानची बाजू उचलून धरली आणि भारतावर आरोप केले की
, भारताने आक्रमण करून काश्मीर जिंकून घेतले आहे. अर्थात मलेशियाच्या राष्ट्रप्रमुखांनी जागतिक पातळीवर भारतविरोधी भूमिका घेतल्याने त्यांनाही धडा शिकवणे आवश्यक होते. नेमके हेच घडले. भारतातून अनेक भारतीय पर्यटक पर्यटनासाठी मलेशिया, सिंगापूर आणि दक्षिण पूर्वेकडील विविध देशात जातात. गेल्या वर्षी तीन कोटींहून अधिक पर्यटक भारतातून परदेशात पर्यटनास गेले होते, जर मलेशियाला धडा शिकवायचा असेल तर भारतीयांनी कुठल्याही इतर देशांत पर्यटनाला जाण्यावेळी मलेशियन एअरलाईन्सने जाऊ नये किंवा मलेशियाच्या क्वालांलपूरच्या विमानतळावरून उड्डाण करू नये. जोपर्यंत मलेशियाचे भारतविरोधाचे धोरण बदलत नाही, तोपर्यंत भारतीय पर्यटकांनी मलेशियाला भेट देऊ नये. परंतु, आपण मलेशियाला सर्वात मोठा धक्का दिला तो व्यापारबंदीच्या माध्यमातून. मलेशियाने काश्मीरप्रश्नी भारतविरोधी भूमिका घेतली, त्यानंतर भारतीय व्यापार्‍यांनी नोव्हेंबरपासून मलेशियाकडून पाम तेल आयात बंद करायची ठरवली आहे. अर्थातच, त्यामुळे



मलेशियाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे
.



भारत एक प्रचंड मोठी आर्थिक व्यापारी बाजारपेठ आहे
. भारताला लागणार्‍या आयात आणि निर्यातीची गरज मोठी आहे. त्यामुळे भारताने मलेशियाकडून पाम तेल आयात करणे बंद केले, तर मलेशियाला मोठा धक्का बसणार आहे. गेल्या आठ महिन्यांमध्येच मलेशियाकडून भारताने ८.९ दशलक्ष टन एवढ्या तेलाची आयात केली होती. मात्र, मलेशियाचे पंतप्रधान महातिर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत भाषण करताना पाकिस्तानची बाजू घेत काश्मीरविषयी जे वक्तव्य केले, त्यानंतर त्यांच्याविरोधात भारतात समाजमाध्यमातून ‘ञ्च्बॉयकॉट मलेशिया’ हा ट्रेंड सुरू झाला आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर हा हॅशटॅग व्हायरल झाला आहे, भारतीयांनी एकमेकांना टॅग करून आवाहन करत आहेत की, मलेशिया जोपर्यंत त्यांचे मत बदलत नाही, तोपर्यंत मलेशियात पर्यटनाला किंवा कोणत्याही कारणास्तव भेट देऊ नये. या लोकचळवळीचा परिणाम असा झाला की, मलेशियाचे पंतप्रधान महातिर यांनी माध्यमांना माहिती दिली की, भारताने आमच्याकडून तेलाची आयात करणे कमी केले आहे. गरज पडल्यास भारताशी याविषयी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा लागेल. भारताला खुश करण्यासाठी मलेशियाला असेही म्हटले आहे की, भारताकडून मलेशियात येणार्‍या वस्तूंची आयात वाढावी यासाठी, भारताकडून साखर आणि म्हशीचे मांस विकत घ्यायला मलेशिया तयार आहे, जेणेकरून मलेशिया-भारत यांच्या व्यापारात समतोल निर्माण होईल. याचाच अर्थ असा की, मलेशियन सरकारला काश्मीरविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे निर्माण झालेल्या वादाची कल्पना आलेली आहे. अशाच प्रकारच्या व्यापारशस्त्राचा वापर अमेरिकेने इराणविरुद्ध पद्धतशीरपणे केलेला आहे. हाच वापर उत्तर कोरियाच्या विरुद्ध जगाने चांगल्या पद्धतीने केला आहे.



तुर्कस्तानला होणारी भेट रद्द


मलेशिया
, तुर्कस्तान आणि चीनने केलेल्या मदतीमुळे ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने दहशतवाद्यांना मदत करणारा देश म्हणून पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले नाही. आताच पाकिस्तानला २०२० पर्यंत ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने सांगितलेल्या मुद्द्यांवर कारवाई करण्याकरिता वेळ देण्यात आलेला आहे. अर्थातच, हे भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कस्तानला होणारी भेट आता रद्द करण्यात आली आहे. कारण, भारताला तुर्कस्तानला इशारा द्यायचा आहे की, जर तुम्ही आमच्या राष्ट्रीय हिताविरुद्ध जाऊन पाकिस्तानला मदत कराल तर आम्हीसुद्धा त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो. तुम्हाला आर्थिक, सामरिक आणि राजकीयदृष्ट्या धक्का पोहोचवू शकतो.



भारताची तुर्कस्तानाविरुद्ध कारवाई


भारतीय पर्यटक तुर्कस्तानात पर्यटनासाठी जात असतात
. मात्र, तुर्कस्तानने काश्मीरसंबंधी घेतलेली भूमिका पाहता भारताने तुर्कस्तानमधील भारतीय पर्यटन रोखले पाहिजे. याशिवाय सध्या तुर्कस्तानमधली परिस्थिती फारशी स्थैर्याची नाही. अमेरिकी फौजांना माघारी परतण्याची उसंतही न देता, तुर्की फौजांनी सीरियातील कुर्दिश तळांवर हल्ले सुरूही केले. तुर्कस्तानच्या बरोबर असादविरोधी सीरियन बंडखोरही आहेत. या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी आता सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही लक्ष घातले आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा सीरियाचा उत्तर भाग युद्धजन्य आणि उद्ध्वस्त होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे येत्या काळात तुर्कस्तानला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळेच आपण मुत्सद्देगिरीची ताकद वापरून तुर्कस्तानच्या विरुद्ध असलेल्या कुर्दिश जनतेला मदतीचा हात देण्याची गरज आहे. तुर्कस्तानची शेजारच्या राष्ट्रांची मैत्री करून आपण तुर्कस्तानला एक इशारा देतो आहे की, जर तुम्ही आमच्या विरोधात पाकिस्तानला मदतीचा हात देणार असाल तर, भारतही तुमच्या शत्रूला मदतीचा हात देऊन जशास तसे उत्तर देऊ शकतो.



अजून काय करावे
?


भारताने आपल्या प्रचंड अर्थव्यवस्थेचा वापर अशा राष्ट्रांवर करावा
, जे काश्मीरप्रश्नाविषयी, भारतविरोधी भूमिका घेतात. त्यांच्याविरुद्ध व्यापार अस्त्र आपण नक्कीच वापरले पाहिजे. गरज पडली तर व्यापारयुद्धाची तीव्रता वाढवावी लागेल आणि मलेशियाकडून होणारी पाम तेलाची आयात पूर्णपणे थांबवावी लागेल. त्यामुळे मलेशियाला काश्मीरविषयी भूमिका बदलून भारताच्या बाजूने बोलावे लागेल, अशाच प्रकारच्या व्यापार अस्त्राचा वापर करून जी राष्ट्रे भारताच्या हिताविरुद्ध वागताहेत, त्यांना वठणीवर आणू शकतो. थोडक्यात व्यापार अस्त्राचा वापर भारताने पहिल्यांदाच केलेला आहे. भारत सरकारने उचललेल्या या पावलाचे नक्कीच कौतुक केले पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@