मराठवाड्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आठ. ते जिल्हे म्हणजे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. राज्य विधानसभेच्या एकूण ४६ जागा इथे होत्या आणि तिथे मतदारांनी मतदानही बऱ्यापैकी केले. ४६ जागांसाठी ६७६ उमेदवारांसाठी ६५.७० टक्के मतदान झाले व त्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले.
राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, तेव्हापासूनच मराठवाड्यातील उमेदवारांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री मराठवाड्यातले आणि त्यातल्या विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र अमित आणि धीरज निवडणूक लढवत होते, तर अशोक चव्हाणही रिंगणात उतरलेले होते. भाजप-शिवसेनेचे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील-निलंगेकर, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, अतुल सावे, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत असे सुमारे ७ मंत्री विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात होते. तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षांतर केलेले आयाराम-गयाराम असे सर्वच नशीब आजमावू पाहत होते. निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासूनच भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मराठवाड्यातील मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचारसभा, रॅली आणि घरोघरी जाऊन भेटीगाठींना प्रारंभ केला. प्रचाराच्या रणधुमाळीत चांद्यापासून बांद्यापर्यंतचे मुद्दे उठवले गेले, वाद-प्रतिवाद आणि सर्वसामान्यांत गप्पा-टप्पाही रंगल्या. कोणी म्हणे, चालू सरकारातील सातही मंत्री विजयी होतील, तर कोणी म्हणे देशमुख-चव्हाणांची पुण्याई कामी येईल. दुसरीकडे परळीत मुंडे भावा-बहिणीतील लढाईत कोण जिंकेल, बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यात कोण बाजी मारेल, निलंग्यात भाजपच्या संभाजी पाटील-निलंगेकर आणि काँग्रेसच्या अशोक पाटील-निलंगेकरांत कोणाला यश मिळेल, सिल्लोडमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तार आणि तुळजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राणा जगजितसिंह पाटील विजयी पताका फडकावणार का? जनता त्यांना स्वीकारणार का? असेही प्रश्न विचारले जात होते. मराठवाड्यातील प्रमुख जिल्हा म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादेत भाजप-शिवसेनेचा भगवा की, एमआयएम आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी याकडेही लक्ष लागले होते.
मराठवाड्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या आठ. ते जिल्हे म्हणजे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. राज्य विधानसभेच्या एकूण ४६ जागा इथे होत्या आणि तिथे मतदारांनी मतदानही बऱ्यापैकी केले. ४६ जागांसाठी ६७६ उमेदवारांसाठी ६५.७० टक्के मतदान झाले व त्यांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले. गुरुवारी इव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात झाली आणि उमेदवारांना आपापले जनतेच्या मनातले स्थानही समजू लागले. दोन माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सरकारमधील सात मंत्री असूनही मराठवाड्याच्या काही समस्या, प्रश्न, अडीअडचणी कित्येक वर्षांपासून तशाच होत्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत त्यातल्या अनेक प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम भाजप-शिवसेना युती सरकारने केले. म्हणजे पाण्याचा, दुष्काळाचा, शेतीचा, कामगारांचा अशा सर्वच समस्या सोडवण्याचे प्रयत्न राज्य सरकारने केले. तरीही भाजप-शिवसेनेला मराठवाड्यात निर्विवाद वर्चस्व मिळवता आले नाही. म्हणजे आकडेवारीवरच नजर टाकली तर मराठवाड्यातील ४६ जागांपैकी १६ जागांवर भाजपला विजय मिळाला, तर शिवसेनेला १३ जागांवर आणि काँग्रेसला ८ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळाल्या. २ जागा अन्य पक्ष-अपक्षांना मिळाल्या. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र मराठवाड्यातली परिस्थिती निराळी होती. पाच वर्षांपूर्वी भाजपला मराठवाड्यातील ४६ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला १६, काँग्रेसला ८, राष्ट्रवादी काँग्रेसला ११ आणि इतरांना दोन जागांवर यश मिळाले होते. यंदा मात्र हे समीकरण बदलले आणि भाजपला मागच्या पंचवार्षिकपेक्षा ५ जागा अधिकच्या मिळाल्या. शिवसेनेच्या मात्र १६ वरून १३ जागा झाल्या, काँग्रेसने एकही जागा न गमावता पूर्वीच्या जागा राखल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा ११ वरून ८ वर आल्या. म्हणजे मराठवाड्यातल्या मतदारांनी भाजपला स्वीकारल्याचे इथे दिसते. तसेच हा स्वीकार प्रश्नांच्या सोडवणुकीतूनच आल्याचे म्हणावे लागेल.
यंदाच्या निवडणुकीत औरंगाबाद आणि नांदेडमध्ये 'एमआयएम फॅक्टर' चालणार का, अशीही उत्सुकता होती. परंतु, निकालानंतर मात्र या दोन्ही जिल्ह्यांत एमआयएमचा प्रभाव पडला नाही, असेच दिसले. खरी लढत झाली ती युती व आघाडीमध्येच. बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर व काँग्रेसचे संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यांच्या संघर्षात काकांना पराजित करत पुतण्या विजयी झाला तर परळीमध्ये पंकजा मुंडे यांना पछाडून धनंजय मुंडे यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. भाजपचे दिवंगत वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे प्रथमपासूनचे बीडमधील कार्य आणि त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी गेली पाच वर्षे मंत्री म्हणून केलेले काम पाहता, त्यांना यशाची खात्री होती. परळीतील मतदारांनी मात्र पंकजांवर विश्वास न दाखवता धनंजय मुंडे यांना कौल दिला. हा निकाल पंकजा मुंडे आणि भाजप कार्यकर्त्यांसाठीही धक्कादायकच होता. निलंग्यामध्ये विद्यमान मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनीही काँग्रेसच्या अशोक पाटील-निलंगेकर यांना पराभूत केले, तर ऐन निवडणुकीच्या आधी काँग्रेस सोडावी की सोडू नये, या द्विधावस्थेत असलेल्या अब्दुल सत्तार यांनी पक्षांतर केले आणि शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांनी सिल्लोडमधून उमेदवारी केली आणि काँग्रेसच्या कैसर आझाद यांना त्यांनी धोबीपछाड दिला. म्हणजे शिवसैनिकांनी आणि सिल्लोडकरांनीही अब्दुल सत्तार यांना 'आपले' म्हटले. नांदेडमधील भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही विजयी आघाडी घेतली तसेच लातूरमध्ये शहर मतदारसंघात अमित देशमुख आणि ग्रामीण मतदारसंघात धीरज देशमुख विजयी झाले. म्हणजेच देशमुखांनी आपापली गढी राखली. लातूरमधील औसा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार, तर काँग्रेसकडून बसवराज पाटील उभे होते. इथेही भाजपने विजय मिळवला व अभिमन्यू पवार निवडून आले. तुळजापूरमध्ये पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. उल्लेखनीय म्हणजे, मतदारांनीही राणा जगजितसिंह यांनाच आपला पाठिंबा असल्याचे दाखवून दिले व त्यांना यश मिळाले. विद्यमान मंत्री बबनराव लोणीकर, अतुल सावे यांनीही आपला गड राखला, तसेच ऐनवेळी भाजपमध्ये आलेल्या नमिता मुंदडादेखील विजयी झाल्या. भोकरदनमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला. अशाप्रकारे मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक १६ जागा मिळवून भाजप मोठा पक्ष ठरला, तर त्याखालोखाल शिवसेनेला १३ जागा मिळाल्या. म्हणजेच मराठवाड्यातील सर्वाधिक जागा महायुतीने जिंकल्या. शिवसेनेचेदेखील प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, संतोष बांगर, राहुल पाटील, मंत्री तानाजी सावंत आदी उमेदवार विजयी झाले. जालन्यामध्ये मात्र शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता आगामी काही दिवसांत सरकार स्थापन होईल, त्यावेळी मराठवाड्यातील कोणाची मंत्रिपदी वर्णी लागते, हे पाहावे लागेल.