मायावतींना पाठिंबा देणारा बहुसंख्य समाज त्या बौद्ध झाल्या, तर त्यांच्या मागे येईल का? ती येण्याची जोपर्यंत त्यांना खात्री वाटत नाही, तोपर्यंत त्या म्हणणार, ‘योग्य वेळी मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन.’ बाबासाहेबांपुढे असा कोणताच प्रश्न नव्हता. राजकारणदेखील नव्हते. केवळ आणि केवळ आपल्या समाजाचे हित डोळ्यापुढे होते. मायावती आणि बाबासाहेब यांच्यातील हा फरक आहे.
नागपूरला धम्म परिवर्तन दिनी मायावती येतात, त्यांची जाहीर सभा होते, सभेत भाषण होते आणि भाषणात न चुकता त्या म्हणतात, “योग्य वेळी मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहे.” डॉ. बाबासाहेबांचे नाव जोडून त्या म्हणतात की, “बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे आपण योग्यवेळी बौद्ध धर्म स्वीकारणार आहोत.” डॉ. बाबासाहेबांनी १९३५ साली येवला येथे घोषणा केली की, “मी हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही. धर्मांतर करणार आहे.” कोणत्या धर्मात जाणार, हे त्यावेळी त्यांनी सांगितले नाही. प्रत्यक्ष धर्मांतर मात्र १४ ऑक्टोबर, १९५६ ला केले. २१ वर्ष ते थांबले. मायावती किती वर्षं थांबणार आहेत? हे मात्र त्यांनी सांगितलेले नाही.
मायावती केवळ एवढेच बोलून थांबल्या नाहीत. नागपूर ही संघाची जन्मभूमी आहे. विजयादशमीला सरसंघचालकांचे जाहीर भाषण होते. संघाचा उल्लेख केला नाही, तर राजकीय भाषण कसे होणार? म्हणून मायावती म्हणाल्या, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हिंदुराष्ट्राची संकल्पना देश व संविधान विरोधी आहे. देशाचे संविधान हिंदू धर्म डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले नाही. हा देश विविध जातिधर्माचा आहे. सर्व धर्मीयांना एकत्र गुंफत डॉ. बाबासाहेबांनी संविधान तयार केले. त्यामुळे संघाची हिंदूराष्ट्र संकल्पना ही देशविरोधी आहे.”
नागपूरला येऊन मायावती यांनी संघाविषयी जे उद्गार काढले, त्यात नवीन काही नाही. त्याची दखल घ्यावी, याच्या योग्यतेचेदेखील ते नाही. संघाच्या ‘हिंदूराष्ट्र’ संकल्पनेविषयी हे तुणतुणे संघ स्थापन झालेल्या दिवसापासून वाजत आहे. म्हणजे, मोहिते वाड्याच्या संघास्थानावर पहिली शाखा सुरू झाली आणि स्वयंसेवकांची संख्यादेखील २०-२५च्या वर नसेल तेव्हापासून हे तुणतुणं वाजत आहे. आता संघ स्वयंसेवकांची देशातील संख्या कैक कोटीत मोजावी लागते. तरीही हे तुणतुणं वाजतच आहे. वाजतं आहे, तर वाजू द्या, त्यांना त्यात आनंद आहे. त्यापासून त्यांना आपण कशाला वंचित करावे? पुन्हा त्या म्हणतील, “आनंद घेण्याचा मला घटनात्मक अधिकार आहे, माझ्या या घटनात्मक अधिकारावर तुम्ही अतिक्रमण करीत आहात.”
मायावतींच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा राज्यघटना लिहून पूर्ण झाली, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, “जेव्हा हिंदूंना वेद हवे होते तेव्हा त्यांनी ते काम महर्षी व्यास यांना दिले. व्यास सवर्ण हिंदू नव्हते. जेव्हा हिंदूंना महाकाव्य हवे होते, तेव्हा त्यांनी हे काम महर्षी वाल्मिकींना दिले. तेदेखील सवर्ण हिंदू नव्हते आणि जेव्हा हिंदूंना घटना पाहिजे होती तेव्हा ते काम मला दिले.” (संदर्भ - ओ. पी. मथायी, नेहरू युगाच्या आठवणी.) मायावती या हुशार, बुद्धिमान आहेत. बाबासाहेबांच्या या वाक्यावर भाष्य करून मी त्यांच्या बुद्धीचा अपमान करू इच्छित नाही. बाबासाहेबांच्या या म्हणण्याचे अर्थ काय आहेत, हे ज्याचे त्याने समजून घ्यायचे आहेत.
भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी घटना समितीची निर्मिती करण्यात आली. पाकिस्तान झाल्यानंतर घटना समितीत २८९ सदस्य राहिले. त्यातील ९० टक्क्यांहून अधिक सदस्य जन्माने हिंदू होते. बहुसंख्य सदस्य हिंदू धर्मशास्त्र, हिंदू कायदा, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू आचारपद्धती, हिंदू समाजव्यवस्था यातील तज्ज्ञ होते. त्या सर्वांनी राज्यघटनेच्या एकेका कलमावर दीडशेहून अधिक दिवस सखोल चर्चा केली. हे सर्व हिंदू असल्यामुळे आपल्याला कुठल्याही एका उपासनापद्धतीवर आधारित संविधान बनविता येणार नाही, ते बनविले तर टिकणार नाही, हे त्यांना समजत होते. राज्यघटनेचे कार्य समाजाचे ऐहिक नियंत्रण करण्याचे असते. राज्यसंस्था कशी असावी, व्यक्तीचे जीवन आणि मालमत्ता याचे रक्षण कसे व्हावे, व्यक्तीला स्वत:चे सुख शोधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कशापद्धतीने देता येईल, हे ज्या कलमांद्वारे ठरविले जाते त्या कलमांना ‘राज्यघटना’ असे म्हणतात. हे सर्व ऐहिक काम असल्यामुळे आणि माणसाने माणसांशी व्यवहार करण्याचे काम असल्यामुळे तेथे देवाची आवश्यकता नसते. धर्मग्रंथांच्या प्रामाण्याची आवश्यकता नसते. हे सर्व घटनासमितीतील बहुसंख्य हिंदू सभासदांनी मान्य केले. बाबासाहेबांनी सर्वांना मार्गदर्शन केले. त्यामुळे आपली आजची राज्यघटना तयार झाली. तिचे योग्य भाषेत वर्णन करायचे, तर हिंदूंनी सर्व उपासना पंथांसाठी, सर्व जाती-जमातींसाठी न्याय देणारी राज्यघटना तयार केली.
ज्यांच्या मनात धार्मिक राज्य निर्माण करण्याची कल्पनादेखील नव्हती, त्यांच्या माथ्यावर त्या प्रकारचा आरोप लादणं हे राजकारण्याच्या दृष्टीने ठीक असतं, पण ते काही खरं नसतं. राजकारणी माणसं जे काही बोलतात, ते खरं असतं, असं मानण्याची चूक आपण करता नये. मायावती योग्यवेळी बौद्ध धर्म स्वीकारणार आहेत. त्यांच्या या घोषणेचे स्वागत करुया. ‘मी हिंदू आहे’ याचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला असं दिसतं की, मी ७०-८० टक्के बौद्धच असतो. एवढा जबरदस्त प्रभाव भगवान गौतम बुद्धांच्या जीवन आणि शिकवणुकीचा आहे. मी ७०-८० टक्के बौद्ध कसा आहे? भगवान बुद्धाने सांगितले की, “तुम्ही नामरूपात्मक जे जे काही पाहाता ते शाश्वत नाही.
ते नष्ट होणारे आहे. त्याच्या मागे लागू नका.” वेदांती याला ‘माया’ म्हणतात. म्हणजे, जे दिसतं ते खरं नाही. ते नित्य बदलत असतं. काँटम विज्ञान सांगतं की, मूलकणाला आपण जेव्हा पाहातो, तेव्हा तो स्थूल रूपात असतो आणि जेव्हा आपण त्याला पाहत नाही, तेव्हा तो तरंग असतो. आपणही मूलकणापासूनच बनलेलो आहोत. म्हणून मी मला पाहत असताना स्थूल रूपात दिसतो, न पाहता कसा असेल? भगवान गौतम बुद्धांच्या बुद्धीची झेप एवढी विशाल आहे. कर्म सिद्धांताच्या रूपानेदेखील मी बुद्धच असतो. ‘जसे करावे, तसे भरावे’ या सोप्या भाषेत कर्मसिद्धांत सांगता येतो. हे माझे जीवन हे अंतिम जीवन नाही. याच्यापूर्वी मी नव्हतो, असेदेखील नाही, नंतर असणार नाही, असेदेखील नाही. जीवनाचा हा प्रवाह नदीच्या प्रवाहासारखा शाश्वत आहे. वाहते पाणी आपण पाहत असतो, पण आपल्या लक्षात येत नाही की, जे पाणी आपण पाहिलेले असते ते केव्हाच पुढे गेलेले असते, त्याची जागा मागून येणार्या पाण्याने घेतलेली असते. वेदांती याला ‘पुनर्जन्माचा सिद्धांत’ म्हणतो. अशा अनेक अंगाने हिंदू हा बौद्धच असतो.
भगवान बुद्धाने मूर्तिपूजा सांगितली नाही. ईश्वराला मानले नाही. आत्म्याला मानले नाही, पण व्यवहारात आपण काय बघतो? भगवान गौतम बुद्ध गेल्यानंतर भारतात प्रथम मूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली. त्यांच्या भव्य मूर्ती तयार करण्यात आल्या आणि त्यांची पूजा होऊ लागली. आज देशात सर्वाधिक पुतळे बाबासाहेबांचे आहेत. वर्षांतून दोनदा तरी त्यांची पूजा होतेच होते. आपण भारतातले लोक सगुण साकार प्रतिमेशिवाय जगू शकत नाही. तत्त्वज्ञानाच्या वाटेवर तुम्ही वाटेल तेवढे वाद घाला, व्यवहार मूर्तिपूजेचाच राहणार. मायावतींनीदेखील काशिराम आणि स्वत:च्या मूर्ती बनविल्या आहेत. म्हणून त्या बौद्ध होणार आहेत. यात तसा फार मोठा धार्मिक अर्थ उरत नाही.
राजकीय अर्थ मात्र भरपूर आहे. बाबासाहेबांचा बौद्ध धर्म स्वीकार कोणत्याही राजकीय कारणासाठी नव्हता. तो आत्मसन्मानासाठी होता. स्वातंत्र्य आणि समतेची अनुभूती समाजाला प्राप्त करून देण्यासाठी होतो. राज्यघटनेने आता सर्वांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दिलेला आहे. त्यासाठी आणखी वेगळ्या मार्गाने जाण्याची आता काही गरज राहिलेली नाही, पण राजकारण करत असताना राजकीय फायद्याची गणितं मांडावी लागतात. मायावतींना पाठिंबा देणारा बहुसंख्य समाज त्या बौद्ध झाल्या, तर त्यांच्या मागे येईल का? ती येण्याची जोपर्यंत त्यांना खात्री वाटत नाही, तोपर्यंत त्या म्हणणार, ‘योग्य वेळी मी बौद्ध धर्माचा स्वीकार करेन.’ बाबासाहेबांपुढे असा कोणताच प्रश्न नव्हता. राजकारणदेखील नव्हते. सत्तेची लालसादेखील नव्हती. केवळ आणि केवळ आपल्या समाजाचे हित डोळ्यापुढे होते. मायावती आणि बाबासाहेब यांच्यातील हा फरक आहे.