मॅन्चेस्टरमध्ये गांधीपुतळा; विरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2019   
Total Views |



मँचेस्टर कॅथेड्रलबाहेर स्थापित केल्या जाणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला विद्यापीठातीलच काही विद्यार्थ्यांनी विरोध केला व 'गांधी मस्ट फॉल' या नावाने एक चळवळही सुरू केली. त्यांनी मॅँचेस्टर नगर परिषदेकडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याबद्दल पुनर्विचार करण्याची मागणी केली.


इतिहासकाळातील थोर, महनीय व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या विचारसरणीच्या संबंधाने निर्माण झालेल्या समज-गैरसमजांचे नाते वर्षानुवर्षांपासूनचेच. हे जसे आपल्या भारतात झाले वा अजूनही होते तसेच जगातल्या इतर देशांतही होताना दिसते. आताचा वाद महात्मा गांधी यांच्याबद्दलचा असून तो सुरू आहे ब्रिटनमध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाजातील एका मोठ्या संख्येला बरोबर घेऊन गांधीजींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघर्ष पुकारला. सशस्त्र क्रांतिकारकांचा लढा एका बाजूला तर सत्य-अहिंसा, सूतकताई, खादीच्या माध्यमातून सुरू असलेला लढा दुसऱ्या बाजूला. महात्मा गांधींच्या प्रेरणेतून अनेकांनी त्यात सहभाग घेतला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपलेही योगदान दिले. गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या विचारांमुळे त्यांचे समकालीन नेते-कार्यकर्ते जसे प्रभावित झाले तसेच स्वातंत्र्योत्तर काळातही गांधीजींनी कित्येकांना परिस्थितीशी झगडण्याचे बळ दिले. त्यात जागतिक पातळीवरील नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग (ज्युनि.), आँग सान स्यू की यासारख्यांचा समावेश होतो. तसेच जगातल्या कितीतरी देशांत, विद्यापीठांत गांधीजींच्या प्रतिमेचीही स्थापना करण्यात आली. त्यामागे अर्थातच गांधीविचारांवर आपापल्या देशातल्या जनतेने, विद्यार्थ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी, अशी अपेक्षाही असू शकते. नुकताच असाच एक महात्मा गांधींचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठाने ठेवला. मॅँचेस्टर विद्यापीठात स्थापित केल्या जाणाऱ्या पुतळ्याची निर्मिती शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. हा पुतळा ९ फूट उंचीचा असून काशापासून (कांस्य) तयार केला आहे. तसेच त्याला स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंजुरीही दिली, म्हणजे आता केवळ पुतळा तिथे आणून बसविण्याचेच काम बाकी राहिले.

 

परंतु, मँचेस्टर कॅथेड्रलबाहेर स्थापित केल्या जाणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला विद्यापीठातीलच काही विद्यार्थ्यांनी विरोध केला व 'गांधी मस्ट फॉल' या नावाने एक चळवळही सुरू केली. त्यांनी मॅँचेस्टर नगर परिषदेकडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याबद्दल पुनर्विचार करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवरही आपला गांधीविरोध व्यक्त केला असून तशी पोस्ट प्रसारित केली आहे. विद्यार्थ्यांच्या मते महात्मा गांधी भारतात परतण्याच्या आधी आफ्रिकेमध्ये राहत असत. तेव्हा तिथेही ब्रिटिश सत्तेचा अंमल सुरू होता. त्या काळात गांधीजींनी आफ्रिकी नागरिकांसंदर्भात वर्णभेदी, वंशवादी टिप्पण्या केल्या, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. गांधी आफ्रिकी जनतेला असभ्य, अर्धवट मूळनिवासी, जंगली, घाणेरडे आणि पशुतुल्य म्हणत असत, असा दावाही मॅँचेस्टर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे महात्मा गांधींचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात बसवू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. येत्या महिन्यात २५ नोव्हेंबरला विद्यापीठात हा पुतळा बसविण्यात येणार आहे, पण त्याआधी आमच्या मागणीचा विचार करावा, अशी विनंतीही विद्यार्थी गटाच्या सारा खान हिने केली आहे.

 

नगर परिषदेच्या प्रवक्त्याने मात्र गांधीजींचा पुतळा बसविण्यामागचा उद्देश शांतता, प्रेम आणि बंधुभावाविषयीच्या त्यांच्या संदेशांचा प्रसार करण्याचा आहे, असे म्हटले. ते म्हणाले की, "धरमपूर येथील श्रीमद राजचंद्र मिशनने गांधीजींची मूर्ती उपहाराच्या स्वरूपात दिली आहे. तथापि, आम्हाला माहिती आहे की, गांधींजींच्या आयुष्यातील प्रसंगांवर इथे वादविवाद सुरू आहेत. परंतु, गांधीजींनी जो संदेश सातत्याने दिला, त्याच दृष्टीने शहरातील नागरिकही त्यांच्याकडे पाहतील, असे आम्हाला वाटते." तर स्वतःला भावी गृहसचिवाच्या रूपात पाहणाऱ्या सारा खान हिने त्याला विरोध केला आहे. इथे आपल्याला दिसते की, ज्या ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींना त्रास दिला, त्यांचचे वारस पैकीच बहुसंख्य लोक गांधीजींचा पुतळा ब्रिटनमध्ये उभारू इच्छितात, तर काही मूठभर लोक त्याला विरोध करताना दिसतात. तरीही अशा परिस्थितीत महापुरुषांच्या पूर्वायुष्यातील घटना, प्रसंगांपेक्षा त्यांच्या उत्तरायुष्यातील विचारांना प्रमाण मानले पाहिजे. महात्मा गांधींनी भारतात आपल्यावरील हिंदू जीवनदर्शनाच्या प्रभावामुळे सर्वांनाच समान मानले. त्यांनी कधी जातीवरून, रंगावरून भेदभाव केल्याचेही दिसले नाही. आता हेच मॅँचेस्टर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही लक्षात घ्यावे आणि विरोध सोडावा.

@@AUTHORINFO_V1@@