'सबका साथ, सबका विकास' इथे प्रत्यक्षात आणायचंय! : प्रशांत ठाकूर

    17-Oct-2019
Total Views |



पनवेल म्हणजे मुंबईचे प्रवेशद्वार. मुंबईला कोकणपट्टा आणि घाटावरच्या मावळ प्रांताशी जोडणारे व्यापारी शहर. रायगड जिल्ह्यातील गोरगरिबांचे सर्वात जवळचे शहर. नवीन युगात रेल्वेचे मोठे जंक्शन बनू पाहणारे, नवी मुंबई विमानतळामुळे वेगाने विकसित होऊ पाहत असलेले हे सांस्कृतिक शहर. तसे राजकीयदृष्ट्या हा रामशेठ ठाकूर यांचा बालेकिल्ला. विविध संस्था, सहकारी संस्था, सहकारी भांडार यांचे जाळे त्यांनी विणलेले. त्यांचे राजकीय वारसदार प्रशांत ठाकूर हे २०१४ च्या थोडे आधी भाजपमध्ये सामील झाले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या पाच वर्षांत प्रशांत ठाकूर यांनी आमदार म्हणून विधानसभेत चांगला ठसा उमटवला आहेच. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणूनही चांगले काम उभे केले आहे. वेगाने वाढणाऱ्या पनवेलबाबत आणि सत्ताधारी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून रायगडबाबत त्यांचा काय दृष्टिकोन आहे, ते जाणून घेण्यासाठी 'मुंबई तरुण भारत'ने त्यांची पनवेल येथे भेट घेतली.

 

"पनवेल हा शहर आणि ग्रामीण भाग तसेच आदिवासी भाग यांची सरमिसळ असलेला मतदार संघ आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने इथे वेगाने विकासकामे होत आहेत. वस्ती वाढत आहे. या विकासाबाबत काय उद्दिष्टे आणि समस्या समोर आहेत?," असे विचारता प्रशांत ठाकूर म्हणाले की, "पनवेल महापालिका आणि ग्रामीण भाग, आदिवासी भाग एकत्र असणे हे मोठे आव्हान आहे. विमानतळाच्या कामामुळे मला शासनाची विकासकामांबाबतची काय दृष्टी आहे, ते जवळून पाहण्याची संधी मिळाली. विमानतळ परिसर विकसित करण्यासाठी शासनाने नैना-नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्शिअल नोटिफाईड एरिया-या प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या भागात सर्वंकष विकास व्हावा, स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून शिस्तबद्ध आखणी केली आहे. पनवेल सातत्याने अग्रेसर होते. ते तसेच अग्रेसर राहिले पाहिजे, ही माझी दृष्टी आहे. फक्त शहर नव्हे तर ग्रामीण भाग आणि आदिवासी पाड्यांना सर्व सुविधा पुरविण्यावर माझा भर असेल. नरेंद्र मोदींनी जी घोषणा दिली आहे, 'सबका साथ, सबका विकास' ते इथे प्रत्यक्षात आणायचे आहे.

 

"पनवेलमध्ये गेली पाच वर्षे नक्की काय बदल घडवला?," यावर प्रशांत ठाकूर म्हणाले की, "सर्व आरक्षणांचा मी पाठपुरावा करून त्या त्या गोष्टीसाठी जाग मिळवून दिली. नागरी सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आणि यापुढेही देत राहणार आहे. हॉकर्स झोन तयार करणे, कम्युनिटी सेंटर्स तयार करणे, बस टर्मिनसचा विषय मार्गी लावणे, ही महत्त्वाची कामे केली आहेत. जिल्हा न्यायालय आणि तालुका क्रीडा संकुलाची निर्मिती ही महत्त्वाची कामे केली आहेत." पनवेल हा सर्वात जास्त मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे, असे सांगून प्रशांत ठाकूर म्हणाले की, "या वाढत्या लोकसंख्येला सगळ्या नागरी सोयीसुविधा पुरवणे, पाण्याचा प्रश्न सोडवणे, हे आगामी काळात आव्हान असणार आहे. नियोजित नागरी सुविधा पूर्ण होऊन हातात मिळताना लोकसंख्या आणखी वाढलेली असते, ते नियोजनाचे आव्हान पेलावे लागेल. पण, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी शिकवले आहे की, प्रत्येक आव्हानाला संधी मानून पुढे गेले पाहिजे." "तुमच्यासमोर राजकीय आव्हाने काय आहेत?," असे विचारता प्रशांत ठाकूर म्हणाले की, "अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे काम लोकांच्या पसंतीला उतरत चालले आहे. पूर्वी या भागात भाजप हा एका विशिष्ट वर्गाचा पक्ष असा शिक्का होता. त्यामुळे सर्वसामान्य ग्रामीण माणूस भाजपपासून दूर राहत होता. आता स्थिती उलट आहे. मोदींनी आपल्या कामातून सर्व समाजाचा विश्वास जिंकला आहे. अलीकडच्या काळात त्यामुळे भाजपसमोर राजकीय आव्हान शिल्लक नाही. सर्वसामान्याला देशाची काळजी असते, भाजप देशाची उत्तम काळजी घेत आहे, हे त्याला दिसते आहे. आगामी काळात हा लोकांचा प्रचंड विश्वास सांभाळणे, कायम राखणे, हेच मोठे आव्हान आमच्यासारख्यांसमोर आहे."

 

"रायगडात परंपरागत शेकापचा पाया आत्ता ढिला झाला आहे. शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे तटकरे यांच्या दबदब्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात बरीच वर्षे भाजप मागे होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या व्हिजनमुळे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपचा चांगला विस्तार आता होत आहे. या जिल्ह्यात आणि पनवेल मतदारसंघात लघुउद्योग पर्यटन या क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून धोरणे आखली जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते पोहोचावेत हेही लक्ष्य आहे. प्रत्येक गावात पेयजल योजना नेणे, हेदेखील महत्त्वाचे काम आहे." "सिडकोच्या कामातूनही या भागात विकासाचे नवीन आयाम मिळत आहेत. नियोजित विमानतळ परिसरात तरुणांना स्थानिक रोजगार मिळावा म्हणून 'तारा' ही संस्था सिडकोने सुरू केली आहे. युवकांचे कौशल्य विकास, विमानतळाशी संबंधित १४ विविध अभ्यासक्रम ९५ गावांत या संस्थेने सुरू केले आहेत. इनक्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून युवकांना लहानमोठे उद्योग सुरू करण्यासाठी मदत करणे, हेदेखील काम आगामी काळात असणार आहे." प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, "आगामी काळात एसटी स्थानकांची निर्मिती, प्रशासकीय भवन यांची निर्मिती ही कामे आखलेली आहेत. संपूर्ण पनवेल परिसरात उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा निर्माण करणे आणि सांभाळणे, हे काम महत्त्वाचे असणार आहे." एकूणच भाजपचा हा अभ्यासू आमदार विकासाची नवी दृष्टी घेऊन ग्रामीण पनवेलचे आधुनिक पनवेल निर्माण करण्यास निघाला आहे. प्रशांत ठाकूर यांच्यासमोर खरेच कोणाचे राजकीय आव्हान सध्या तरी दिसत नाही.

- राजेश प्रभु-साळगांवकर