'सुन्नी वक्फ बोर्डा'ने हिंदू-मुस्लीम बंधुभावाप्रीत्यर्थ अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील आपला दावा सोडण्याची तयारी केल्याचे वृत्त बुधवारपासूनच माध्यमांनी दाखवण्यास सुरुवात केली. प्रथम आपण 'सुन्नी वक्फ बोर्डा'च्या निर्णयाचे स्वागत करायला हवे, पण 'सुन्नी वक्फ बोर्डा'ने नेमके हे पाऊल आताच का उचलले? आणि 'वक्फ बोर्डा'ला हिंदू-मुस्लीम ऐक्य खरेच हवे असेल, तर करण्यासारख्या इतरही बाबी कोणत्या, तेही पाहूया. पहिल्यांदा 'सुन्नी वक्फ बोर्डा'च्या जमिनीवरील दावा सोडण्याच्या हालचालीबद्दल. वस्तुतः सर्वोच्च न्यायालयात सलग चाळीसेक दिवस चाललेल्या श्रीराममंदिर-बाबरी मशीद खटल्याच्या कामकाजावरून व तथ्य-पुराव्यांच्या आधारावरून सत्याचा विजय होत असल्याचा अंदाज लावता येतो. (ते सत्य कोणते हे लवकरच समोर येईल) परंतु, हा सत्याचा विजय आमच्या मेहेरबानीने झाला, असे दाखवून देण्याचा 'सुन्नी वक्फ बोर्डा'चा कावा असावा व त्यासाठीच आता मानभावीपणे बंधुभावाचे नाव घेत ते जमिनीवरील दावा मागे घेण्याचे म्हणताना दिसते. तथापि, जुलमी, धर्मांध आक्रमकांनी तलवारीच्या जोरावर बळकावलेली श्रीरामजन्मभूमी हिंदूंना परत मिळावी म्हणून देशातल्या कोट्यवधी रामभक्तांनी शेकडो वर्षे लढा दिला. कित्येकांनी सर्वस्वाचा त्याग केला, प्राणांचे बलिदान दिले तेही केवळ सत्याच्या पुनर्स्थापनेसाठी! म्हणूनच 'सुन्नी वक्फ बोर्डा'ने जमिनीवरील दावा सोडण्याची व त्या खैरातीच्या बळावर हिंदूंना श्रीरामजन्मभूमी परत मिळाली, असे दाखवून देण्याची आवश्यकता नाही. तसेच 'सुन्नी वक्फ बोर्डा'ला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा मुद्दा यापूर्वी का आठवला नाही? आता सुनावणी पूर्ण होऊन सरन्यायाधीशांनी केवळ निकाल देणे बाकी असताना का हा मुद्दा आठवला? सोबतच 'सुन्नी वक्फ बोर्डा'ला जर खरोखरच हिंदू-मुस्लीम बंधुभाव वाढावा, दोन्ही धर्मानुयायांमध्ये सौहार्दाची-सलोख्याची भावना निर्माण व्हावी, असे वाटत असेल तर एक करावे. सीताराम गोयल यांनी आपल्या 'हिंदू टेम्पल्स-व्हॉट हॅपन्ड टू देम' या ग्रंथांत इस्लामी आक्रमकांनी हिंदू मंदिरे तोडून-गाडून त्यांच्या दगडातून उभारलेल्या हजारो मशिदींची पुराव्यानिशी माहिती दिली आहे. त्यात समस्त हिंदूंचे आराध्य असलेल्या काशी विश्वनाथ आणि मथुरेतील केशवराज मंदिरांचाही समावेश आहे. आता 'सुन्नी वक्फ बोर्डा'ने कोणत्याही कायदेशीर कटकटीऐवजी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी ती सर्वच स्थळे हिंदूंना द्यावीत, त्यासाठी पुढाकार घ्यावा. जेणेकरून 'सुन्नी वक्फ बोर्डा'ची आताची भूमिका प्रामाणिक असल्याची खात्री पटेल.
रेल्वेसेवेचा विकास
नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर देशाच्या विकासाला, प्रगतीला प्राधान्य दिले. पायाभूत सोयी-सुविधांच्या जलद, दर्जेदार निर्मितीबरोबरच दळणवळणविषयक सेवांचाही त्यात समावेश होता. देशातील दळणवळणात, प्रवासी व माल वाहतुकीत मोलाची भूमिका बजावणारी सेवा म्हणजे भारतीय रेल्वे. मोदींनी सत्तेवर येताच रेल्वेसेवा देशाच्या कानाकोपर्यात पोहोचावी, सर्वसामान्यांना त्याचा अधिकाधिक लाभ घेता यावा म्हणून प्रयत्न केले, नव्या गाड्या सुरू केल्या, नवे मार्ग उभारले, स्थानकांचे आधुनिकीकरण केले, मेट्रोजाळ्याच्या माध्यमातून शहरांतील अंतर्गत ठिकाणे जोडली जातील यासाठी प्रकल्पांना गती दिली. परिणामी, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या आणि आता दुसर्या कार्यकाळात स्वातंत्र्यानंतर प्रथमच रेल्वेसेवेचा सर्वाधिक विकास झाला. आताही भारतीय रेल्वेने देशातील प्रमुख शहरांच्या आजुबाजूला असलेल्या छोट्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी व तेथील जनतेला रेल्वेसेवेचा फायदा मिळावा यासाठी मंगळवारी नऊ सेवा सर्व्हिस रेल्वेगाड्यांचा शुभारंभ केला. गुजरातच्या वडनगर ते मेहसाणा (डेमू-आठवड्याचे ६ दिवस) आणि असरवा ते हिंमतनगर (डेमू-आठवड्याचे ६ दिवस), तामिळनाडूच्या करूर ते सालेम (डेमू-आठवड्याचे ६ दिवस) आणि कोईम्बतूर ते पोल्लाची (पॅसेंजर ट्रेन-आठवड्याचे ६ दिवस) व कोईम्बतूर ते पलानी (पॅसेंजर ट्रेन-दररोज), कर्नाटकच्या यशवंतपूर ते तुमकुर (डेमू-आठवड्याचे ६ दिवस), आसामच्या मर्कोंगसेलेक ते दिब्रूगढ (पॅसेंजर ट्रेन-दररोज), ओडिशाच्या भुवनेश्वर ते नयागढ (एक्सप्रेस-दररोज), दिल्ली ते शामली-उत्तर प्रदेश (पॅसेंजर ट्रेन-दररोज) या रेल्वेगाड्यांचा नव्या सेवा सर्व्हिसमध्ये समावेश आहे. आता जी गावे, शहरे दूरवरच्या ठिकाणी किंवा दुर्गम ठिकाणी वसलेली आहेत व जिथे प्रीमियम ट्रेन्सना (जलद रेल्वेगाड्या) थांबा दिलेला नाही, त्या परिसरातल्या लोकांना या माध्यमातून परस्परांतील संपर्क, दळणवळणासाठी मोठा फायदा होईल. कमी खर्चात व उपलब्ध साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून सेवा देण्याच्या अभियानांतर्गत अतिरिक्त डब्यांच्या जोडणीने परिपूर्ण अशा या रेल्वेगाड्या देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासातही महत्त्वाची भूमिका निभावतील. तसेच या गाड्या 'हब (केंद्रस्थान) अॅण्ड स्पोक' (भोवतालची स्थळे) मॉडेलप्रमाणे चालवण्यात येणार असून प्रवाशांना हबपर्यंत पोहोचण्यासाठी व नंतर अन्य प्रमुख ठिकाणी जाण्यासाठी उपयुक्त सिद्ध होतील.