शुद्ध, चांगल्या प्रतीचे स्तन्य कसे ओळखावे, पाण्यात घातल्यास त्याची परीक्षा कशी करावी, याबद्दल आपण वाचले.आज 'स्तन्यदुष्टी'बद्दल जाणून घेऊयात आणि त्यावरील उपायही बघूयात.
स्तन्य हे बाळाच्या वाढीसाठी, विकासासाठी किती गरजेचे आहे, हे मागील लेखांमधून आपण बघितले. स्तनपान करणाऱ्या मातेचे आहार-विहार-आचरण कसे असावे, याबद्दलही थोडी माहिती घेतली. मातेने जसा आहार घेतला असेल, त्याचे पचन होऊन त्यातील काही अंश स्तन्यस्वरूपात तयार होतात आणि बाळाला आहार मिळतो. चांगल्या वाढीसाठी चांगला आहार असायला हवा, हे सगळ्यांना माहीत आहे. तसेच बाळाच्या सदृढ आणि आरोग्यदायी जीवनाचा पाया हा स्तनपानावर अवलंबून आहे. शुद्ध, चांगल्या प्रतीचे स्तन्य कसे ओळखावे, पाण्यात घातल्यास त्याची परीक्षा कशी करावी, याबद्दल आपण वाचले.आज 'स्तन्यदुष्टी'बद्दल जाणून घेऊयात आणि त्यावरील उपायही बघूयात. शुद्ध स्तन्य हे स्वच्छ, पातळ व कोमटसर असते. ते शंखाप्रमाणे पांढऱ्या रंगाचे असते. त्यात थोडा स्निग्धांश असतो. (म्हणून पावडरचे दूध किंवा गाईचे दूध सुरू केल्यावर बालकांना थोडे कडक शौचास होऊ लागते. कारण, त्यात या स्निग्धतेचा अभाव असतो. हा स्तन्यातील स्निग्धांश बाळाच्या प्रकृतीस न बाधणारा आणि लगेच पचणारा असा असतो. स्निग्धांशामुळे समाधानही होते. स्तन्यपान झाल्यावर बाळ तृप्त होते आणि झोपी जाते. शुद्ध स्तन्य हे थोडे गोडसर असते. गोड ही चव स्वभावत: प्रत्येकाला आवाडणारी (सात्म्य) असते. त्याचा त्रास होत नाही. पण नैसर्गिक गोडवा आणि कृत्रिम आणि रासायनिक गोडवा यातील फरक जाणून घ्या. फळांमधील गोडवा आपल्या जीभेलाच कळतो. आयुर्वेदशास्त्रानुसारगहू, तांदूळ ही पचनाच्या(चवीच्या) दृष्टीने गोड आहेत आणि म्हणून तृप्तिकर आणि समाधान करणारे आहेत. साखर व अन्य रासायनिक पद्धतीने तयार मिश्रणे यांचा वापर बालकांमध्ये टाळावा. कृत्रिम/रासायनिक साखरेने व अन्य गोड पदार्थांनी जंत, विविध त्वचाविकार, कंड (खाज) इ. तक्रारी सुरू होतात.
काही वेळेस स्तन्याची 'क्वॉलिटी' चांगली असते, पण 'क्वॉन्टिटी' कमी पडते. असे होण्यास अनेक कारणे आहेत. यातील बहुतांशी कारणे ही आहाराची नसून विहार आणि आचरणातील असतात. जसे वारंवार चिडणे- रागावणे, दु:खी होणे, हिरमुसणे, रडणे, शोक करणे, अतिचिंता करणे इ. मानसिक कारणांचाही स्तन्यनिर्मितीवर परिणाम होतो. हल्ली अजून एक कारण प्रकर्षाने समोर येत आहे. वात्सल्याचा अभाव वा कमतरता. काळाप्रमाणे लग्नाची वयोमर्यादा वाढली आहे. आपल्या करिअर, फ्रीडम आणि आर्थिक सक्षमतेवर येणारी बंधने बहुतांशी महिलांना नको असतात, तसेच घरात कोणी वडीलधारी व्यक्ती नसल्यास मदतीला कोणी नसल्यास मातेला विश्रांतीही मिळत नाही. तिचे खाण्यापिण्याचे तंत्रही पाळले जात नाही आणि त्याचबरोबर 'काय करावे व काय करू नये' हेदेखील सांगायला कोणी नसते. सध्याची परिस्थिती अशी आहे की, बाळ कसे धरावे, नॅप्पी कशी बदलावी, दूध कसे पाजावे इ. गोष्टींचेही रुग्णालयामध्ये प्रशिक्षण दिले जाते. ज्या साध्या-सोप्या गोष्टी आहेत, त्याबद्दलही सुजाण पालकांमध्ये भीती/बाऊ निर्माण केला जातो. प्रत्येक छोट्या गोष्टीचा ताण घेणे आणि गरजेपेक्षा अतिरिक्त विचार करणे (विशेषत: बाळाच्या बाबतीत जसे आताच दूध प्यायले, परत का रडत असेल? काल रात्री झोपले होते. आज का नाही झोपत? त्याला या आवाजाचा, प्रकाशाचा, हवामानाचा त्रास होतोय का? डॉक्टरना फोन लावूया.. इ.इ.) अशा मानसिक घालमेलीत स्तन्यनिर्मितीचे प्रमाण आपसूक कमी होते. तसेच काही वेळेस नोकरीवर लगेच रुजू व्हायचे असते, मग स्तन्यपान कसे जमेल, या विचाराने आधीच स्तन्यपान करणे टाळले जाते व अन्य पर्यायांचा वापर सुरू केला जातो. पण एक गोष्ट स्तन्यपान करणाऱ्या मातांनी लक्षात घ्यावी की, Touch Therapy is very soothing. स्तन्यपान करतेवेळी बाळाला मातेच्या होणाऱ्या स्पर्शात एक प्रकारची सुरक्षितता जाणवते. माया, प्रेम, जिव्हाळा या स्पर्शातून जाणवतो. तसेच, बाळाला नाजूक स्पर्श मातेच्या अंगाशी झाला की, वात्सल्यही उत्पन्न होते, वाढते. हा परस्पर संबंध भक्कम करण्याची वेळ ही पहिले सहा महिने आहे, हे ध्यानात ठेवा. जसे बाळाचे आरोग्य महत्त्वाचे आहे, तसेच मातेचेही आरोग्य जपणे गरजेचे आहे. कारण, तिच्या स्वास्थ्यावर बाळाचे स्वास्थ्य तर अवलंबून आहेच, पण घरचेही स्वास्थ्य निर्धारित असते. तेव्हा जेवण, विश्रांती, अंगाला मालिश, झोप इ. गोष्टी प्रसुतेच्या वेळी व नंतरही नीट होणे गरजेचे आहे. स्तन्यपान सुरू असतेवेळी बहुतांशी वेळेस मासिकस्राव सुरू होत नाही आणि स्तन्याची मात्रा, प्रमाण कमी झाल्यास मासिकस्राव सुरू होण्याची शक्यता वाढते.
बाळाचे पोट भरणे आणि समाधान होणे यासाठी मातेच्या आहारात दुधाचा समावेश आवर्जून करावा. तूप आणि दुधाने मातेचे भरणपोषण नीट होते. प्रसवकालीन आणि गर्भावस्थेत झालेली झीज, बदल हे पूर्ववत आणण्याचे सामर्थ्य दूध आणि तुपात आहे. म्हणून वेगवेगळ्या खिरी, तुपातील शिरा, अहिळवाचा लाडू, लाप्शी किंवा खीर, शिंगाड्याचा लाडू, लाप्शी इ. चा वापर नित्य आहारात असावा. गर्भावस्थेतील शारीरिक झीज भरून काढण्यासाठी प्रसुतीनंतर, ऋतूंचा आणि शारीरिक बदलांचा विचार करून डिंकाचा लाडू सुरू करावा. साखरेऐवजी जेथे जेथे नैसर्गिक गूळ वापरणे शक्य आहे, तेथे वापरावा. प्रसुतीनंतर खूप काळ उपाशी राहू नये. पोट अधिक काळ रिकामे ठेवू नये. तांदूळ, रवा, खसखस, लोणी, बाजरी इत्यादींचा आहारात समावेश असावा. स्तन्यदुष्टी ही मुख्यत्वेकरून तीन प्रकारची असते. काही वेळेस स्तन्याचा रंग हा पांढरा नसून हलका काळसर होतो. चवीला गोड न राहता, ते तुरट-कडवट होते. या स्तन्याला फेस येतो. असे स्तन्य जर बाळ प्यायले, तर बाळाला वारंवार गॅसचा, पोटात मुरडा येण्याचा त्रास होतो. पोट फुगणे व दुखणे हेही त्रास होतात. स्तन्यपान केल्यावरही समाधान होत नाही. ही स्तन्यदुष्टी वातज प्रकारची आहे. याने बाळाची वाढही नीट होत नाही. अपचन होऊ शकते. मलप्रवृत्तीच्या वेळेस कुंथावे लागते व मलावरोधही होऊ शकतो. (रोज शौचास न होणे.)
पित्तज स्तन्यदुष्टीमध्ये शंखासमान असलेला स्तन्याचा रंग पिवळसर होतो. गोड स्तन्य (शुद्ध स्तन्य गोड़ असते.) आंबट-कडू चवीचे होते. स्पर्शाला ते गरम असते. हे स्तन्य प्यायल्यावर बाळाच्या अंगाची उष्णता वाढते, त्याला घाम अधिक येऊ लागतो. तोंड येणे, गळू होणे, अंग गरम जाणवणे अशी लक्षणे बाळामध्ये उत्पन्न होतात. शौचास आंबूस वास, गरम आणि पातळ होते. शौचाची जागाही लाल होते. कफज स्तन्यदुष्टीमध्ये स्तन्य अधिक दाट होते. ते पचायला जड होते. त्याची चव थोडी खारट लागते. असे स्तन्य तंतुमय भासते आणि चिकट असते. कुबट वासाचे हे स्तन्य असते. पाण्याच्या भांड्यात या स्तन्याचे थेंब घातल्यास ते पाण्याच्या तळाशी जातात. असे स्तन्य प्यायल्याने बाळ जास्त काळ झोपून राहते, तोंडाला अधिक लाळ सुटते. अन्य कारण नसताना अचानक सर्दी होते, अंगावर सूज जाणवते आणि कंड सुटतो. अशा प्रकारच्या स्तन्यदुष्टीवरील उपाय पुढील भागात बघूयात...