भारताची 'शिक्षणकामिनी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019   
Total Views |



चालू शिक्षणपद्धतीनुसार शिक्षण घेऊन पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. तर त्यांचे नाव कामिनी रॉय आणि आज आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...


आज भारतासह जगभरातील महिला विविध विद्याशाखा, तंत्रशाखांचे शिक्षण घेऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे चित्र दिसते. विसाव्या शतकात आणि त्यानंतर अस्तित्वात आलेल्या अनेकानेक नवनवीन विषयांतही महिलांनी प्रावीण्य मिळवले आहे. परंतु, महिलांचा पुरुषांच्या बरोबरीने समानतेने शिकण्याची, काम करण्याची घटना एकाएकी घडलेली नाही. त्यासाठी कित्येकदा महिलांनी बंधने झुगारत संघर्ष केला, आंदोलने केली आणि शिक्षणाचा, नोकरी करण्याचा, इतकेच नव्हे, तर लोकशाहीतील मतदानाचा अधिकार मिळवला. भारतातही मध्ययुगीन काळातील परकीयांच्या आक्रमणामुळे बऱ्याच कुप्रथांचा जन्म झाला. त्यात महिलांच्या शिकण्यावरील बंदीचाही समावेश करावा लागेल. तत्पूर्वी इथल्या हिंदू समाजात वेद-वेदांत, उपनिषदे, तत्त्वज्ञान, व्याकरण वगैरे तत्कालीन उपलब्ध ज्ञान स्वकर्तृत्वाने अर्जित करणाऱ्या महिला होत्याच, नाही असे नाही. पुढे मात्र त्यात खंड पडला व ब्रिटिशकाळात महर्षी दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या समाजधुरिणांनी पुन्हा एकदा महिलांच्या शिक्षणाला चालना दिली. आता तर आपण भारतीय महिलांना अवकाशाला गवसणी घालतानाही पाहतो. पण, चालू शिक्षणपद्धतीनुसार शिक्षण घेऊन पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. तर त्यांचे नाव कामिनी रॉय आणि आज आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

 

कामिनी रॉय यांचा जन्म दि. १२ ऑक्टोबर, १८६४ रोजी तत्कालीन ब्रिटिशशासित बंगाल प्रांतातील बेकरगंज (आजच्या बांगलादेशातील बासीरहाट) जिल्ह्याच्या बसंदा गावी झाला. कामिनी रॉय यांचा जन्म एका संपन्न बंगाली कुटुंबात झाला होता. त्यामुळे त्यांच्या घरी सुबत्ताही होतीच. तसेच शिक्षणाचे वातावरणही होते. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच कामिनी रॉय यांना गणित विषय सर्वाधिक आवडत असे, पण नंतरच्या काळात मात्र त्यांना देववाणी किंवा गीर्वाणभारती-संस्कृतची गोडी लागली. नंतर कामिनी रॉय यांनी संस्कृत मुख्य विषय घेऊनच कोलकाता विद्यापीठाच्या बेथ्यून महाविद्यालयातून १८८६ साली पदवी प्राप्त केली. अशा प्रकारे पदवी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत. पदवीनंतर कामिनी रॉय यांनी बेथ्यून महाविद्यालयातच अध्यापनाचे कार्य सुरू केले. तसेच त्या महिलांची दशा सुधारण्यासाठी प्रयत्न करू लागल्या-तत्संबंधी आंदोलनाशी जोडल्या गेल्या. कामिनी रॉय भारतातील पहिल्या पिढीच्या महिला समाज सुधारकांपैकी एक होत्या, ज्यांनी भारतात स्त्रीवादाचा झेंडा रोवला. त्यांच्या मते, “पुरुषांना भीती वाटते की, महिला समान अधिकार व ज्ञान मिळवून पुरुषांशी बरोबरी करतील, म्हणूनच पुरुष महिलांना (कोणतेही) अधिकार देऊ इच्छित नाहीत.” म्हणूनच कामिनी रॉय यांनी आपले संपूर्ण जीवन महिलांना सर्वप्रकारचे अधिकार मिळवून देण्यासाठी खर्च केले.

 

कामिनी रॉय यांचे भारतीय महिलांच्या उन्नतीतील सर्वात मोठे योगदान म्हणजे-महिला मताधिकार. ब्रिटिशशासित भारतात १९२० साली 'मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा' अंमलात आणणे सुरू होते. भारतीय जनतेला या माध्यमातून निरनिराळ्या राज्यात उत्तरदायी सरकार निवडण्यासाठीचा मताधिकारही मिळणार होता. तथापि, हा मताधिकार फारच सीमित व्यक्तींसाठी होता, जसे की, सुशिक्षित आणि श्रीमंत वर्गातील लोक. गरीब, अशिक्षित, निम्नवर्गातील लोक आणि महिलांची मोठी संख्या या मताधिकारापासून वंचित होती. कामिनी रॉय यांनी कुमुदिनी मित्रा आणि मृणालिनी सेन यांसारख्या महिलांना सोबत घेऊन 'बंगीय नारी समाजा'ची स्थापना केली आणि महिलांच्या मताधिकारासाठी बंगाल प्रांतात चळवळ उभारली. कामिनी रॉय व सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या चळवळीने बंगाली महिलांना मताधिकार प्रदान करण्यात प्रमुख भूमिका बजावली आणि १९२६ साली त्यांना हा महत्त्वाचा अधिकार मिळाला. म्हणजेच कामिनी रॉय केवळ भारतातील पहिली पदवीधारक महिला म्हणूनच राहिल्या नाही, तर त्यांनी अन्य महिलांच्या हक्क-अधिकारांसाठी काम केल्याचे दिसते. महिलांना अधिकार मिळवून देण्याबरोबरच कामिनी रॉय एक उच्चकोटीच्या साहित्यिक-कवयित्रीही होत्या. कामिनी रॉय यांच्या शेकडो कालजयी रचना आजही बंगालीजनांच्या मनात स्थान राखून आहेत.

 

दुसरीकडे कामिनी रॉय यांनी महिला शिक्षण क्षेत्रात व महिला श्रमक्षेत्रातही महत्त्वाचे काम केली. त्या काळी मुलींच्या विवाहाचे वय केवळ १४ वर्षे इतके होते आणि लवकर होणाऱ्या विवाहामुळे मुली उच्च शिक्षण घेऊच शकत नव्हत्या. कामिनी रॉय यांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी घरोघरी जाऊन जनजागृती-प्रबोधनपर आंदोलन चालवले. त्यांनी लोकांना आवाहन केले की, मुलींच्या विवाहाआधी त्यांनी कमीत कमी एकदा विद्यापीठीय प्रवेश परीक्षा तरी देऊ द्या. परिणामी, कामिनी रॉय यांच्या प्रयत्नाने मुलींना शिकवण्याची भावना वाढली. दरम्यान, कोलकाता विद्यापीठाने कामिनी रॉय यांच्या शिक्षण व समाजसुधारणा वगैरेंतील योगदानासाठी त्यांना 'जगतरत्नी' सुवर्णपदक देऊन सन्मानितही केले. १९३० साली आयोजित करण्यात आलेल्या बंगाली साहित्य संमेलनाच्याही त्या अध्यक्षा होत्या. १९३१-३३ मध्ये त्यांच्याकडे बंगाली साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आली. पुढे याच पदावर असताना २७ सप्टेंबर, १९३३ रोजी त्यांचा मृत्यू झाला. भारतीय इतिहासात आणि भारतीय महिलांच्या अधिकारप्राप्त आंदोलनांमध्ये कामिनी रॉय यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल, असेच आहे. गुगलनेदेखील कामिनी रॉय यांच्या जयंतीदिनी विशेष डुडल तयार करत त्यांना अभिवादन केले होते. महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या कामिनी रॉय यांना आदरांजली...!

 
@@AUTHORINFO_V1@@