कल्याणाख्यान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019   
Total Views |



सदानंद फणसे यांनी आपल्या मनातले कल्याण
‘कल्याण नागरिक’ आणि ‘सा. वार्ता-सूत्र’ या माध्यमातून कागदावर उतरवले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांच्या अगदी जवळच्या असलेल्या आठवणी तर आपल्याला वाचायला मिळतातच, पण कल्याण शहराशी निगडित आणि नंतर तिथून पुढे थोड्या फार आठवणी मुंबईतल्याही आहेतच.



विसाव्या शतकात ज्या गोष्टी अस्तित्वात नव्हत्या
, त्या शेकडो प्रकारच्या गोष्टी आज आपल्याला अवतीभोवती दिसतात. तसेच विसाव्या शतकात ज्या गोष्टी अस्तित्वात होत्या, त्या एकतर इतिहासजमा झाल्याचे किंवा पूर्णपणे बदलून गेल्याचेही दिसते. हे जसे एखादी प्रथा, परंपरा, आचार-विचार पद्धती, खानपान, कपडे-पोषाख, चैनीच्या वस्तू, मनोरंजनाची साधने, दळणवळणाचे पर्याय तसेच एखाद्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या ठिकाणालाही लागू होते. म्हणजे ६०-७० वर्षांपूर्वीचे एखादे ठिकाण तेव्हा जसे होते तसेच आता नसेल आणि ते ठिकाण मुंबईसारख्या शहराच्या जवळ असेल तर विचारायलाच नको. मुळात त्या काळातली मुंबईही आज जशीच्या तशी राहिलेली नाही. त्यामुळे तिच्या आजूबाजूची उपनगरेही बदलली किंवा त्यांनी कात टाकली, असेही आपण म्हणू शकतो. बदल हा जसा चांगला असतो तसाच तो वाईटही असू शकतो. म्हणजे मुंबई व आसपासच्या नगरांमधील रस्ते, इमारती, मोठमोठे टॉवर यामुळे काहीतरी चकचकीत पाहत असल्याचे भासते, तर दाटीवाटीने उभ्या असलेल्या, आडव्या-तिडव्या कशाही वाढलेल्या झोपड्यांमुळे बकालपणाच समोर येतो. उल्लेखनीय म्हणजे, हा बदल ६०-७० वर्षांपूर्वीची ही सर्वच ठिकाणे पाहणार्‍याला अधिकच जाणवतो. कधीकधी त्यांच्या बोलण्यातून, लिखाणातून, उदाहरणांतून इंग्रजीत म्हटल्याप्रमाणे ‘नॉस्टॅल्जिया’चा ‘फिल’ही येतो. अशा प्रकारचे लिखाण अनेकांनी केलेही असेल, नसेलही केले, पण सदानंद फणसे यांच्या ‘नंदाख्याना’तून मात्र, आपल्याला अशा जुन्यातून नव्याकडे वाटचाल करणार्‍या काळाचा प्रवास सहज अनुभवता येतो.


कल्याण
. आजचे कल्याण शहर मुंबई, ठाण्याच्या जवळ असल्यासारखे वाटते. इतकेच नव्हे, तर पार कल्याणच्या कितीतरी पुढे असलेल्या कसारा, खोपोलीहूनही लाखो लोक रोजचा प्रवास करत मुंबईला येतात. कामानिमित्त, नोकरीनिमित्त, रोजगारानिमित्त किंवा अन्य काही कारणांनीही. पण त्या काळातले जुने कल्याण छोट्या गावासारखेच होते. म्हणजे १९४६-४७ सालापासूनची माहिती लेखकाने आपल्या आठवणींच्या माध्यमातून लिहिलेली आहे. त्यात मग त्या काळातील निरनिराळ्या आळ्या असलेले कल्याण, वाडा संस्कृतीतले कल्याण, चाळीतले कल्याण, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे-महाविद्यालय नसलेले कल्याण, चौकाचौकांचे कल्याण अशी माहिती येते. रॉकेलचे दिवे, कंदील, चिमण्यांच्या प्रकाशात उजळणारे कल्याण, ८.५० च्या लोकलने नोकरदार मंडळी कामावर गेली की सामसूम वाटणारे कल्याण, दोन-तीन किराणा दुकाने, कपड्यांचे एखाद-दुसरे दुकान, भांड्या-कुंड्यांचे एखादे दुकान असलेले कल्याण, एक ना दोन अनेक रुपे कल्याणची. पण काळाचा प्रवाह जसजसा पुढे गेला तसतसे कल्याणचा चेहरामोहराही बदलला. लेखकानेही पहिल्यांदा मूळ कल्याण शहरापासून लांब घर-गृहसंस्थेत बांधल्याने तेही कल्याणमधून बाहेर पडले. पण कल्याणच्या आठवणी त्यांच्या मनात आजही जशाच्या तशाच आहेत.



सदानंद फणसे यांनी आपल्या मनातले कल्याण
कल्याण नागरिक’ आणि ‘सा. वार्ता-सूत्र’ या माध्यमातून कागदावर उतरवले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांच्या अगदी जवळच्या असलेल्या आठवणी तर आपल्याला वाचायला मिळतातच, पण कल्याण शहराशी निगडित आणि नंतर तिथून पुढे थोड्या फार आठवणी मुंबईतल्याही आहेतच. त्यातूनच आपल्याला जुने कल्याण आणि मुंबईही भेटत राहते. क्रमशः लिहिलेल्या या लेखांचे आता ‘नंदाख्यान’ याच नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ‘नंदाख्याना’त जसे कल्याण शहराचे वर्णन आणि माहिती आहे. त्याचप्रमाणे आणखीही काही लेख आहेत, ज्याला ललितलेख म्हणता येईल. मग त्यात बटाटावड्यापासून ते दाढीला श्रद्धांजली, पेन संन्यास, भोजन कला, खुर्ची वगैरे विषयांपासून ते भिकार्‍यांच्या किंवा भिक्षेकर्‍यांच्या संपामुळे नेमके काय घडते, त्याचेही खुसखुशीत शैलीने लेखन केले आहे. एकूणच ‘नंदाख्यान’ वाचताना कल्याणची माहिती तर मिळतेच, पण वेगळ्या ढंगातले ललित लेखही वाचायला मिळतात. समकालीन इतिहासाचा दस्तावेज असेही त्याला म्हटले तरीही चालेल, त्यामुळे हे पुस्तक संग्राह्यही होते. पुस्तकाचे मुखपृष्ठही उत्तम असून, आतील रेखाचित्रे, छायाचित्रे, फॉन्ट साईज व कागदाचा दर्जाही उत्तम आहे. मात्र, मुद्रितशोधनात उणिवा असल्याचे वाचताना जाणवत राहते. ते अधिक योग्य प्रकारे व्हायला हवे होते. तरीही ‘नंदाख्यान’ वाचनीय असल्याने त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे.


पुस्तकाचे नाव - नंदाख्यान

लेखक - सदानंद फणसे

पृष्ठे - १२८

प्रकाशक - आशय एंटरप्रायझेस (कल्याण)

@@AUTHORINFO_V1@@