कोची : ननवरील बलात्काराचा आरोपी फ्रँको मुलक्कलविरोधात निदर्शनांमध्ये सहभागी होणारी नन- लकी कालापुरा यांना फ्रान्सिस्कन क्लेरिस्ट काँग्रेगेशनने धर्मविरोधी आचरण केल्याच्या आरोपाखाली नोटिस बजावली आहे. सिस्टर लकी कालापुरा या कविता प्रकाशित करतात, त्यांनी कार विकत घेतली आहे, तसेच त्या फ्रँको मुलक्कलच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे पित्त खवळलेल्या मंथावैदी येथील सेंट मेरी प्रांतातल्या फ्रान्सिस्कन क्लेरिस्ट काँग्रेगेशनने त्यांना नोटिस बजावली. तुम्ही धार्मिक जीवन सिद्धांताच्या विरोधात जगत आहात आणि काँग्रेगेशनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, असे या नोटिसमध्ये म्हटले आहे.
याबाबत त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या सिस्टर अॅन जोसेफ यांच्याकडे बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही देण्यात आले. तुम्ही स्पष्टीकरण देण्यासाठी काँग्रेगेशन कार्यालयात उपस्थित राहू शकता का, अशी विचारणा करणारा दूरध्वनी त्यांना आज करण्यात आला. मात्र, भारत बंदमुळे वायनाड येथील वाहतूक विस्कळीत झाल्याने येणे शक्य नसल्याचे त्यांनी काँग्रेगेशनला कळवले.
नन लकी कालापुरा यांनी वरिष्ठांची परवानगी न घेता वाहन परवाना घेणे, कार विकत घेणे, कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी कर्ज काढणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेगेशनने केला आहे. कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी वरिष्ठांनी परवानगी नाकारली होती. मात्र, असे असतानाही त्यांनी ‘स्नेहमळयिल’ हा कविता संग्रह प्रकाशित केला होता.
वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात सहभागी होणे, गैरख्रिश्चन वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून कॅथलिक नेतृत्वाविरोधात आरोप करणे हे बंड पुकारल्याप्रमाणे असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. एका ननवरील बलात्काराचा आरोपी फ्रँको मुलक्कलच्या विरोधात झालेल्या निदर्शनामध्ये सहभागी होऊन नन लकी कालापुरा यांनी चर्च नेतृत्वाचा रोष ओढवून घेतला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/