शिर्डी : 'स्पाईसजेट' या खासगी विमान कंपनीने साई भक्तांसाठी खास सेवा हवाई सेवा सुरु केली आहे. ६ जानेवारीपासून देशातल्या १० ठिकाणांहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरु झाली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या भक्तांना दिलासा मिळाला आहे. या खास सेवेमुळे वेळेची बचत होणार आहे. एकूण २० विमानांचे शिर्डीत आगमन आणि उड्डाण होणार आहे. यामध्ये हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर तसेच बंगळुरूमधून ही विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. चेन्नईमधून १० जानेवारीपासून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
प्रत्येक आठवड्यामध्ये मंगळवार आणि रविवार या दोन दिवशी हैद्राबादसाठी प्रत्येकी एका विमानाची अतिरिक्त फेरी सुरू करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात शिर्डी विमानतळावर रात्रीच्या वेळीदेखील विमानाच्या आगमनाची सुविधा करण्यात येणार आहे. अर्थातच, आगामी काळात देशातील महत्त्वाची शहरे विमानसेवेच्या माध्यमातून शिर्डीशी जोडली जाणार असल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील काही महिन्यांत शिर्डी विमानतळावर रात्री विमान उतरविण्याची सुविधा सुरु होईल. त्यानंतर विमानांची संख्या वाढवण्यात येऊ शकते. यापूर्वी प्रवासी मुंबई आणि पुण्याला येऊन पाच ते सात तासांचा पुन्हा प्रवास करुन शिर्डीला पोहचत असत.
शिर्डीत १ ऑक्टोबर २०१७ रोजी विमानतळाचे उदघाटन देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी 'एअर अलायन्स' या कंपनीने हैद्राबाद आणि मुंबई इथून सेवा सुरु केली होती. त्यानंतर हैद्राबादहून आणखी एक फ्लाईट सुरु करण्यात आली. त्या नंतर वर्षभराने दिल्ली - शिर्डी अशी विमानसेवा स्पाईसजेटने सुरु केली होती. आता यामध्ये चार विमानांची भर पडली आहे. 'स्पाईसजेट'ने भोपाळ, अहमदाबाद, जयपूर आणि बंगलोर अशी विमानसेवा सुरु केली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/