संत एकनाथांच्या साहित्यातील चिह्न आणि चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2019   
Total Views |

 


 
 
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील चिह्नसंकेतांचा परिचय करून घेतल्यानंतर संत एकनाथांच्या लिखित साहित्यातील चिह्न आणि चिह्नसंकेतांचा अभ्यास आता करायचा आहे. त्याआधी आपण त्यांच्या वैविध्याने नटलेल्या साहित्याचा थोडक्यात परिचय करून घेणे आवश्यक आहे.
 

श्री एकनाथी भागवतहा वारकरी संप्रदायाच्या तीन प्रमुख ग्रंथांपैकी महत्त्वाचा ग्रंथ. श्रीमदभागवताच्या अकराव्या अध्यायावर संत एकनाथांनी केलेली टीका म्हणजे ‘श्री एकनाथी भागवत.’ स्वतःच्या या ग्रंथाचे वर्णन करताना त्यांचे गुरु जनार्दनस्वामींना वंदन करून ते म्हणतात, “हे भागवत नव्हे तर अज्ञानी लोकांसाठी घातलेली एक पाणपोई आहे. संसार व्यवस्था आणि त्यातील दैनंदिन समस्यांना तोंड देताना, ऐलतीरावरून पैलतीराकडे तरुन नेणारी ही भगवंताने माणसाच्या हाती दिलेली एक नौका आहे.” या नावेत बसून भजन आणि भक्तिभावाने एकाच खेपेत पैलतीराला घेऊन जाणाऱ्या संत एकनाथांच्या या तत्वज्ञानाची असंख्य पारायणे संत तुकारामांनी केली होती.

 

तत्कालीन समाजाचे प्रबोधन करताना संत एकनाथांनी अनेक रचनांतून त्यांचे विचार समाजासमोर मांडले. या सर्वच रचनांचे ते आद्य निर्माते होते. कारण, असे प्रबोधक गंभीर विषय मांडताना त्याचे असे रचनाबंध आणि रूपके त्यापूर्वी प्रचलित नव्हते. सहज, सुगम, निर्मळ तरीही द्वयार्थी भावपूर्ण अशा या सुंदर अर्थपूर्ण आणि तर्कनिष्ठ काव्याला गेयता होती. अशा रचना करणाऱ्या एकनाथांच्या अंधश्रद्धा दूर करताना केलेल्या प्रबोधनासाठी रचलेल्या अनेक भारूडांचा प्रत्यक्ष शब्दार्थ एक आहे, तर त्यातून समाजापर्यंत पोहोचणारा गुढार्थ अगदी वेगळा आहे. कुटुंब जीवन, समाजकारण, याचा रूपक संदर्भ देताना गोंधळ, फुगडी, होळी असे सण-समारंभ त्यांच्या भारुडात आले. विनंतीपत्र, अभयपत्र, ताकीदपत्र असे राजकारणातील संदर्भ आले. निसर्गातील रूपके वापरताना त्यांनी एडका, पिंगळा, विंचू, वटवाघूळ अशा निसर्गातील पक्षी-प्राणी-कीटकांच्या वैशिष्ट्यानुसार रूपके वापरून पात्रांची योजना केली. भुत्या, बहिरा, मुका, पांगळा, आंधळा, संन्यासी, वासुदेव, जोगी, फकीर, जोशी, गारुडी, दरवेशी अशा पात्रांची योजना करून त्या त्या माध्यमातून त्यांनी भारुडे लिहिली.

 

संत एकनाथांच्या भारूडातील रचनांचे वैविध्य विलक्षण आहे. याच भारूडातील अर्थालंकार आणि शब्दालंकार या मराठी भाषेच्या व्याकरणातील वैभवशाली अलंकरणाचा वापर मातृभाषेला समृद्ध करतो. या लिखित साहित्यातील चिह्ने आणि चिह्नसंकेतांचा अभ्यास करताना यातील चिह्नमय अर्थालंकार आणि शब्दालंकार वाचक आणि श्रोत्याला मोहित करतात. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक अशा प्राथमिक अर्थालंकाराबरोबरच अपन्हुती - अन्योक्ती - पर्यायोक्ती - विरोधाभास - व्यतिरेक - अतिशयोक्ती - अनन्वय - भ्रान्तिमान - ससंदेह - दृष्टांत - अर्थानंतरन्यास - स्वभावोक्ती - अनुप्रास - चेतनागुणोक्ती - श्लेष अशा अनेक अर्थालंकारांचा स्पर्श या भारुडांना झाल्याने लिखित साहित्यातील चिह्नसंकेतांचा अद्भुतरम्य अनुभव घेता येतो. महत्त्वाचे म्हणजे, याच अमूर्त संकल्पना आणि जीवनमूल्य वृद्धी याचा परिचय अशा रूढार्थाने साक्षर नसलेल्या बहुजन समाजाला करून देताना, संत एकनाथांनी समाजाला श्रद्धा आणि भक्ती साक्षर केले.

 

भवानी आई रोडगा वाहीन तुलाहे अंबाबाईला उद्देशून संत एकनाथांचे भारुड आपल्या प्रत्येकाच्या तोंडी असते. त्यातला द्वयार्थी चिह्नसंकेत फार महत्त्वाचा आहे. कुटुंबातील नात्यांची रूपके गेयता असलेल्या रचनेत बांधून एका कुटुंबवत्सल स्त्रीच्या माध्यमातून, हा रोडगा आपल्या मनात कित्येक शतके घर करून राहिला आहे. संत एकनाथांच्या साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, ता. सक्री, जिल्हा धुळे येथील प्रा. एल. जी. सोनवणे यांनी श्री एकनाथांच्या द्वयार्थी भारूडातील सूक्ष्मार्थ, मथितार्थ आणि चिह्नसंकेतांचा परिचय, विस्ताराने त्यांच्या ‘श्री एकनाथांची निवडक भारुडे’ या पुस्तकात करून दिला आहे.

 

‘अंबा’ या शीर्षकाचा, भवानी मातेचा रोडगा किती विलक्षण चिह्नसंकेत देतो ते पाहणे रंजक आहे.

 

सत्वर पाव गं मला । 

भवानी आई रोडगा वाहीन तुला ॥१॥

सासरा माझा गावी गेला ।

तिकडेच खपवी त्याला ॥२॥

सासू माझी जाच करिती ।

लवकर निर्दाळी तिला ॥३॥

जाऊ माझी फडफड बोलती ।

बोडकी कर गं तिला ॥४॥

नणंदेचें पोर किरकिर करिते ।

खरूज होऊं दे त्याला ॥५॥

दादला मारून आहुती देईन ।

मोकळी कर गे मला ॥६॥

एका जनार्दनीं सगळेंचि जाऊं दे ।

एकटिच राहूं दे मला ॥७॥

 

स्त्रियांच्या मत्सर, द्वेष, अहंकार या अंगभूत भावनांचा चपखल वापर श्री एकनाथांनी या भारुडात केला आहे. अनेक अर्थालंकार या एकाच रोडग्याच्या रचनेत वाचक आणि श्रोत्याला दर्शन देतात. यातला अन्योक्ती अलंकार असा आहे...ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच ‘अन्योक्ती’ असे म्हणतात. ‘पर्यायोक्ती’ म्हणजे एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे, तर विरोधाभास अलंकार म्हणजे एखाद्या गोष्टीचे अवास्तव वर्णन करणे. या भारुडात हे सर्व अलंकार सुखाने नांदतात. यात अतिशयोक्ती अलंकार तर मोठ्या मानाने मिरवताना दिसतो. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावधर्माचे, स्वाभाविक स्थितीचे, कुटुंब व्यवस्थेचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करताना या रोडग्यातील स्वभावोक्ती अलंकाराचे दर्शन अनोखे आहेहे सर्व अलंकार एकत्र नांदण्याचे महत्त्वाचे कारण यातील रूपके आणि त्याचे चिह्नसंकेत. रोडगा वाहताना आडवळणाने ही स्त्री, अंबेला साकडं घालते. दुसऱ्या ओळीतील ‘सासरा’ हे रूपक म्हणजे या स्त्रीचा ‘अहंकार’ आहे. जाच करणारा सासरा काही कारणाने दूर गेलाय. श्री एकनाथ या स्त्रीच्या तोंडून समाजातील प्रत्येक कुटुंबवत्सल स्त्रीला सल्ला देतात की, “मी जाणीवपूर्वक दूर केलेला माझा अहंकार नष्ट होऊ दे.” तिसऱ्या ओळीत हीच्या मनातील कल्पनांच्या आंदोलनांना श्री एकनाथांनी ‘सासू’चे रूपक योजले आहे. दैनंदिन जीवनातील समस्या समोर उभ्या असताना मनातील कल्पनांच्या भराऱ्या जणू सासूसारख्या जाचक वाटत आहेत. या स्त्रीच्या रोडग्याच्या माध्यमातून श्री एकनाथ, या मनातल्या मांड्यांचे निर्दालन करण्याचा सल्ला देतात.

 

एकत्र कुटुंबातील दोन जावांना त्रास देणारी ही रोजची समस्या आहे, याची श्री एकनाथांना निश्चित जाणीव आहे, जी त्यांनी समर्पक रूपकाने चौथ्या ओळीत मांडली आहे. माझ्या दिराने त्याच्या बायकोला नवे दागिने केले, या एका घटनेमुळे या स्त्रीच्या अपेक्षा-इच्छा-वासना प्रबळ होतात आणि ती नवरा आणि जावेचा दुस्वास करू लागते. या अपेक्षा-इच्छा-वासनांना ‘बोडकं कर’ म्हणजे विद्रूप करून त्या नष्ट होतील अशी भावना श्री एकनाथ व्यक्त करतात. आपल्या मुलासह माहेरी आलेली नणंद आणि आपली गृहलक्ष्मी यांच्यात त्या मुलाचे लाड करण्यावरून मतभेद होतात. पाचव्या ओळीतील नणंदेचे मूळ हे तिच्यातील अंगभूत द्वेषभावनेचे रूपक आहे. हे लक्षात आल्यावर त्या द्वेषाला ‘खरुज होऊ दे’ म्हणजे त्यावर योग्य उपचार होऊन ती नष्ट व्हावी अशी प्रार्थना रोडग्यातून केली जाते. श्री एकनाथांनी द्वेषभावनेवर सुचविलेला हा उत्तम उपाय आहेमाझी प्रार्थना ऐक आणि मला यश मिळू दे, तर मी माझ्या दादल्याला मारून त्याची आहुती द्यायला तयार आहे,” अशी अतिशयोक्ती आणि स्वभावोक्ती अलंकाराने परिपूर्ण रचना सहाव्या ओळीत केली आहे. इथे ‘दादला’ म्हणजे या स्त्रीच्या अविवेकासाठी योजलेले रूपक आहे. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या या स्त्रीच्या आणि समाजमनातील या अभावावर नेमकी टिप्पणी श्री एकनाथ या रोडग्याच्या माध्यमातून करतात. एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करून योग्य-अयोग्य निवडण्याच्या क्षमतेचा अभाव ही समस्या कशी दूर करावी, त्याचा धडा ‘दादला’ या रूपकातून श्री एकनाथांनी घालून दिला आहे. श्री एकनाथ नेहमीच आपल्या रचनांचे श्रेय जनार्दन स्वामी या आपल्या गुरूला देतात. शेवटच्या सातव्या ओळीत गुरुवंदनेनंतर, या मनोभावनातून सर्व समाज मुक्त होवो अशी अपेक्षा श्री एकनाथ अखेर व्यक्त करतात. लिखित साहित्यातील चिह्नसंकेतांना आणि प्राचीन मराठी चिह्नसंस्कृतीला समृद्ध करणारी श्री एकनाथांची भारुडे, पाचशे वर्षांनंतर तितकीच लोकप्रिय आहेत. मात्र, त्यातील सूक्ष्म संकेतांचा बहुधा समाजमनाला विसर पडला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@