मुंबई : आपण हॅकर नाही, आपण गोपीनाथ मुंडे यांची कन्या आहोत. त्यांच्या मृत्यूचे आपल्याला राजकारण करायचे नाही, असे म्हणत मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मौन सोडले. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सय्यद शुजा याने केलेल्या दाव्यांबाबत मौन सोडले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ दिवंगत नेते व माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग बाबत माहिती असल्याने त्यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकेतील हॅकर सय्यद शुजा याने केला होता. त्यानंतर मुंडे यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु बुधवारी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधून आपले मौन सोडले.
यावेळी पंकजा म्हणाल्या की, "मी त्यांची मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूचे मला राजकारण करायचे नाही. मुंडे यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती आणि ती मागणीही पूर्ण झाली. आता याबाबत अन्य काही चौकशी करायची असल्यास देशातील ज्येष्ठ नेते त्याचा निर्णय घेतील असेही त्यांनी नमूद केले. तसेच निवडणूक आयोगानेही ईव्हीएम मशीन हॅक होत नसल्याने अनेकदा नमूद केले आहे."
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/