रात्रीच्या फ्लाईट्स निघून गेल्या होत्या. पहाटेचे ४-५ वाजले होते. ब्रेकदरम्यान सगळे कर्मचारी जरा विसावले होते. काहीजण गप्पा मारायला लागले, तर काहीजण विरंगुळा म्हणून पत्ते खेळत होते. त्यातला एक तरुण मात्र उठला. बाजूच्या टेबलवर गेला. काही कोऱ्या कागदांवर त्याने डिझाईन्स काढल्या. डिझाईन काढता काढता डोळा कधी लागला, त्याला कळलेच नाही. त्याचवेळी त्यांच्या विभागाचा प्रमुख तिथे आला. सगळे कर्मचारी उठून उभे राहिले. तो तरुण मात्र झोपला होता. त्याला चाहूल लागू न देता तो अधिकारी त्याने काढलेले डिझाईन्स पाहत होता. “उठल्यावर याला माझ्याकडे पाठवून द्या,” अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना सांगितले. तरुण थोड्या वेळाने उठला. अधिकाऱ्याचा निरोप कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला दिला. आता आपलं काही खरं नाही. बहुतेक नोकरी गेली आपली, असं वाटून भीतभीतच तो अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गेला. “सॉरी सर, परत नाही झोपणार.” तरुणाने माफी मागितली. “बसा, तुम्ही चांगले डिझायनर आहात. स्वतःची कंपनी का नाही सुरू करत? एक काम करा, तुमच्या पत्नीच्या नावाने कंपनी सुरू करा. मी तुम्हाला एक हजार व्हिझिटिंग कार्डसचं काम देतो. तुम्ही बनवून द्या.” एका मराठी नोकरदार तरुणाला रॉनी भरुचा या अधिकाऱ्याने उद्योजक बनविले. या उद्योजकाचे नाव आहे राज वसईकर आणि त्यांच्या कंपनीचं नाव ‘ओम डिझायनर आणि प्रिंटर्स.’
नंदुरबारमधून ६० च्या दशकात माधवराव वसईकर पत्नी मालती आणि आपल्या परिवारासह मुंबईत आले. माधवराव कस्टम्समध्ये कामाला लागले. मालती आणि माधवराव या दाम्पत्याच्या पोटी राजचा जन्म झाला. राजने पुढे वाणिज्य शाखेची पदवी घेतली आणि खंबाटा एव्हिएशनमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला लागला. पुढे कॉम्प्युटरचा कोर्स पूर्ण केला. वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून आयात-निर्यात विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली. राजला बहुतांश वेळा रात्रपाळीमध्ये काम करावं लागे. त्याचा प्रामाणिकपणा आणि कामातली विश्वासार्हता यामुळे अधिकाऱ्यांचा, सोबतच्या सहकाऱ्यांचा त्याच्यावर विश्वास होता. यामुळेच रॉनी भरुचा सारख्या अधिकाऱ्याने राजला एक उद्योजक म्हणून उभं राहण्याची संधी दिली. एवढंच नव्हे तर विमानोड्डाण क्षेत्रातील त्यांच्या ओळखीच्या अधिकाऱ्यांचे संदर्भसुद्धा दिले. असंच पहिलं काम त्यांना मिळालं ते फेडेक्स कंपनीचं. फिलीप रत्नम या अधिकाऱ्याने प्रिंटिंगचे काम तर दिले, पण कामासाठी लागणारे पैसे आगाऊ स्वरूपात दिले. त्यांनी आगाऊ स्वरूपात दिलेला २५ हजार रुपयांचा धनादेश पाहिल्यानंतर हर्षवायू झाल्याप्रमाणे ते अक्षरशः नाचले होते. दिलेल्या वेळेत त्यांनी काम पूर्ण केले आणि मग काय कामाची लाईनच लागली जणू. रात्री विमानतळावर काम आणि दिवसा व्यवसाय, असा राज वसईकरांचा जीवनक्रम ठरला होता जणू. यावेळी त्यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली ती म्हणजे त्यांची पत्नी राधिका. त्या मुलाला सांभाळून मुद्रित झालेली कामे कधी कधी क्लायंटकडे पोहोचवायला जात. कंपनीचं संपूर्ण अकाऊंटचं काम त्या पाहत. चार्टर्ड फायनान्शियल अकाऊंटसारखं सोन्यासारख्या करिअरवर त्यांनी तुळशीपत्र ठेवलं.
२०१३ साली राज वसईकर यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ उद्योगात उतरले. मुद्रणकलेचं तांत्रिक ज्ञान मिळवावं यासाठी ते मीरा ऑफसेट कंपनीत पार्टटाईम कामाला लागले. तिथून ते खऱ्या अर्थाने मुद्रणकलेचा व्यवसाय शिकले. गेली अठरा वर्षे ते या व्यवसायात आहेत. विमानोड्डाण क्षेत्रातील जवळपास सर्वच कंपन्या त्यांच्या आजही ग्राहक आहेत. दोन वर्षांपूर्वी ते ‘कॉर्पोरेट गिफ्टिंग’ या क्षेत्रात उतरले. यासाठी त्यांनी बाबांच्या मित्राच्या गिफ्टिंग दुकानात एक वर्ष पार्टटाईम काम केलं. गिफ्टिंगचं पूर्ण ज्ञान घेऊनच या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं. लेदर, एथनिक, इलेक्ट्रॉनिक्स, म्युरल्स, पेंटिंग्ज अशा वर्गवारीतील सगळ्या भेटवस्तू त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. विमानोड्डाण क्षेत्रातील कंपन्या, माध्यम क्षेत्रातील काही कंपन्या, औषधी कंपन्या आदी त्यांचे मान्यवर ग्राहक आहेत. निव्वळ दोन वर्षांत त्यांनी २१ कंपन्यांसोबत सहकार्य करार केला आहे. काही कोटी रुपयांची उलाढाल कंपनी आज करत आहे. कंपनीच्या यशाचं श्रेय हे ओमच्या टीमचे आहे, असे राज वसईकर मानतात. विशेष म्हणजे, त्यांची कंपनी महिला आघाडी सांभाळते. शीतल चव्हाण डिझाईन ते डिस्पॅच अशी सर्व कामे पाहतात. सोनल बेंद्रे मार्केटिंगमध्ये माहीर आहेत, तर स्नेहा शिंदे या पॅकेजिंगमध्ये निष्णात आहेत.
“या क्षेत्रात मराठी टक्का अत्यंत कमी आहे. मराठी मुलांनी या क्षेत्रात उद्योजक म्हणून नक्की यावे. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू,” असे कळकळीने राज वसईकर आवाहन करतात. किंबहुना, त्यांना त्यांच्या कंपनीची फ्रेंचायझी द्यायची आहे. राज हे उत्तम टेबल टेनिसपटू आहेत. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. जागतिक स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. आपण आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करत नाही. जर क्षमतेचा पूर्ण वापर केला तर ‘किनारा तुला पामराला’ असंच कोलंबसाच्या थाटातलं वाक्य आपल्या तोंडून आपसूक येईल. राज वसईकरांनी ते सिद्ध केलं.