मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे याला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आपल्या विरोधात गुन्हा दाखल करू नये यासाठी तेलतुंबडे याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च नायलायाने तेलतुंबडे याची याचिका फेटाळून लावली. तेलतुंबडे याने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानेदेखील तेलतुंबडेंची याचिका फेटाळून लावल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, येथेही तेलतुंबडेला दिलासा मिळू शकला नाही.
आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले असल्याचे सांगत तेलतुंबडेने सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली. यामध्ये पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी त्याने केली होती. दरम्यान, तेलतुंबडेच्या याचिकेवर सुनावणी करताना 'तपासाची व्याप्ती प्रचंड वाढली असल्यामुळे कार्यवाही रद्द करता येऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने तेलतुंबडेला कारवाईपासून दिलेले संरक्षण ४ आठवड्यांपर्यंत कायम ठेवले आहे.
काय आहे प्रकरण
१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी पुणे पोलिसांनी वेगाने तपास करत दोषींच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणात अनेक नावे समोर आली होती. यामध्ये प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडेंचा समावेश होता. या सर्वांचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. यापैकी प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस, गौतम नवलखा यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी आपल्यावर खोटे आरोप लावल्याचे सांगत तेलतुंबडेने न्यायालायत धाव घेतली होती. तर तेलतुंबडेंविरोधात अनेक पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. मात्र, न्यायालायने तेलतुंबडेंची याचिका फेटाळली असली तरी त्याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांना ४ आठवड्यांची वाट पहावी लागणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/