डाव्यांच्या शांततेचा निषेध

    30-Sep-2018   
Total Views | 38



कुठेही विकास नसावा, कुठेही प्रगती नसावी

अधोगतीच्या मार्गावर, आयुष्य असंच मागासलेलं असावं

त्या मागासपणाच्या अज्ञानात, कुणाचेच आयुष्य उजळू नये!

मात्र, या साऱ्या अंधारलेल्या विश्वात

आंदोलनाच्या नावावर लाल झेंडा मात्र चमकू दे

सारं कसं शांत असावं!

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, टीम ही अशी अविकासात्मक शांततेची प्रार्थना करत असतील का? त्यांच्या या अशा शांततेचा निषेध! कारण कायम मागण्या, संप, आंदोलनं, कुणा ना कुणामध्ये तेढ किंवा काहीच नसेल तर नक्कीच मग एखाद्या विकास प्रकल्पाला विरोध असतो. जिथे चांगले चालले असेल तिथे हे आपलं नाक खूपसून अपशकुन करायला येतातच येतात. मुंबईच्या गिरणी कामगारांची दुरवस्था कोणी केली हे उघड सत्य आहे. दूर कशाला जा, अनुभव ताजाच आहे. ‘नाशिक बिझनेस हब’ म्हणून वेगाने घोडदौड करत असताना लाल बावट्याच्या कामगार संघटनांनी इथल्या औद्योगिक व्यवसायाला बंद आणि संपाच्या आगीत होरपळवले. समाजाचे आणि पर्यायाने देशाचे अतोनात आर्थिक नुकसानच यामुळे होते. आताही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय २ ऑक्टोबरपासून आंदोलन करणार आहेत. हजारो वनवासी या आंदोलनात सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. मागेही यांनी शेतकरी मोर्चा काढला. तेव्हा राज्यात जिथे यांच्या ग्रामपंचायती आहेत तिथल्याच वृद्ध, अगदी डोळ्यात फूल पडलेल्या वनवासी बांधवांना रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने मोर्चाला आणले गेले होते. मोर्चाला आलात तरच अतिक्रमण केलेल्या वनजमिनी मिळतील, असे त्यांना आश्वासन दिले गेले होते. भोळ्या बांधवाच्या अज्ञानाचा चांगलाच लाभ या मोर्चाला झाला होता. पुन्हा २ ऑक्टोबरला डावे वनवासी बांधवांना आंदोलनाचे प्यादे बनवणार आहेत. वनवासी बांधवांना कायम विकासापासून, दूर ठेऊ पाहणाऱ्या डाव्यांचा निषेध! त्यांच्या विकासविरोध प्रवृत्तीचा निषेध आणि त्यांच्या अविकासात्मक शांततेचा तर तीव्र निषेध!!!
 

नशेच्या दलालांना...

 

दुर्दैवाने पुरुषवर्गात दारू, सिगारेट, हुक्का पार्लर ‘स्टेटस सिम्बॉल’ झालेत. इतकेच काय, ‘पिला दे पिला दे दिवानी मै हूँ जिसकी’, ते ‘अक्कड बक्कड बंबई बो, सौ का दम जो मारा दौसो गम हो उडन छू,’ म्हणत या नशेचे स्टेटस सिम्बॉल जपताना स्त्रीवर्गाचे प्रमाणही वाढत आहे. स्त्री-पुरुष समन्वयात्मक समानतेची पुरस्कर्ता असल्यामुळे समानतेला विरोध नाही. विरोध आहे तो महिला आणि पुरुष या दोघांनाही समान पातळीवर जाळ्यात गुंतविणाऱ्या नशेखोरीला. नशा करायला पैसे लागतात. पैसे टल्ली होऊन तरंगणाऱ्या मानसिकतेतून मिळत नाहीत. मग पैसे मिळविण्यासाठी या नशेखोरांना बेकायदेशीर कृत्ये करावी लागत असतीलच. नव्हे, या निष्पाप युवक-युवतींना नशेची लत लागल्यावर त्याचा अमानुष गैरफायदा नशेचे दलाल घेतच असतील. या पार्श्वभूमीवर घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेला लागून असलेल्या कुख्यात वैतागवाडी परिसरासमोर शाहिद शेख, कय्युम शेख, अनिस शेख, मोहम्मदअली शेख यांना पोलिसांनी पकडले. यांच्याजवळ पाच किलो वजनाचा सुमारे १ लाख किमतीचा गांजा सापडला. घाटकोपर परिसरातील शाळा, महाविद्यालयांतील मुलांना गांजा विकणे, त्यांना नशेबाज बनवणे, हे त्यांचे काळे धंदे तर दुसरीकडे पश्चिम उपनगरातील लोखंडवाला, वर्सोवा, ओशिवरा अशा उच्चभ्रू वस्तीमध्ये सबीर खान याच्याकडून १ किलो एमडी पोलिसांनी जप्त केला. हनिफला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून मुंबईतील २० तस्करांना नशेचे साहित्य पुरवले जाते, अशी माहितीही पोलिसांना मिळाली. मुंबईचा राजा कोण? हा प्रश्न कितीतरी मनचल्या भाईंनी आणि तमाम राजकारण्यांनी मनात अनेकवेळा गोंजारला असेल. पण या प्रश्नाचे उत्तर आहे, मुंबई आहे नशेच्या दलालांची. ते मुंबईला नशेखोरांची बनवू पाहत आहेत. हे म्हणताना दुःख, संताप येतो पण होय, हेच वास्तव आहे आपल्या लाडक्या मायानगरीचे. याबाबत सरकारने अनेक कठोर कायदे केले. प्रशासन डोळ्यात तेल घालून जागता पहारा ठेवत आहे. दर दिवसागणिक नशेचे दलाल पकडले जात आहेत. नशेचे दलाल नशेचा नव्हे नरकाचा व्यापार करतात आणि अश्राप युवक, युवतींच्या आयुष्याचा नरक करतात. आयुष्याचा नरक बनल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच नशेला ‘नाही’ म्हणणे शिकले पाहिजे. कारण जीवन खूप सुंदर आहे. मात्र, नशेच्या दलालांना त्यांचा नरक मुबारक…
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121