श्रीविष्णू प्रतिमा आणि चिह्नसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2018   
Total Views |

 


 
 
 
 
भारतीय शिल्प-मूर्ती-चित्रकला या सर्व व्यक्त कलांमधील चिह्नसंस्कृतीची जोपासना करणाऱ्या निर्मात्या शिल्पकाराच्या-मूर्तीकाराच्या-चित्रकाराच्या निर्मितीमागील नेमक्या धोरणाचा परिचय, प्राध्यापिका डॉ. विद्या दहेजीया यांनी फार रोचक शैलीत करून दिला आहे. ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित डॉ. विद्या दहेजीया, या अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात, ‘भारतीय आणि दक्षिण आशियायी कला’ या विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका आहेत.
 
 

आनंद कुमारस्वामी आणि डॉ. विद्या दहेजीया या दोन्ही सन्मान्य वरिष्ठ अभ्यासकांच्या मते, काही सहस्रवर्षे उत्कर्षाला पोहोचलेला भारतीय संस्कृतीतील आदर्शवाद आणि चिह्नसंस्कृतीचा व्यापक अभ्यास, या सर्व शिल्पकार-मूर्तीकार-चित्रकारांच्या विचारधारणेत पूर्ण भिनलेला होता. त्यांच्या निर्मितीमध्ये त्यांनी निसर्गाची नक्कल केली नाही अथवा कुठल्याही भ्रामक संकल्पना व्यक्त केल्या नाहीत. शिल्प-मूर्ती-चित्रे देवतांची असोत अथवा मर्त्य मानवांची असोत, या कलाकारांनी त्यांच्या समोर मॉडेल बसवून कामाची निर्मिती केली नाही. या प्रयत्नवादी, उद्यमी कलाकारांनी स्वतःची आदर्शवादी शैली निर्माण केली आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, आपल्या खंडप्राय देशात या सर्व शैली आणि हे चिह्नसंकेत, काही सहस्र वर्षे एकसंध राहिल्या.

 

आपल्या भारताच्या खंडप्राय आणि विशाल भूभागावर विस्तारलेल्या या एकसंधतेची नोंद डेव्हिड स्मिथ या पुरातत्वशास्त्रज्ञाने घेतली आहे. मध्यप्रदेशातील खजुराहो मंदिर, गुजरातेतील पाटण येथील ‘राणीकी वाव’पासून ओडिशातील लिंगराज मंदिर, दक्षिण कर्नाटकातील होयसाळ मंदिर अशा सर्वदूर, एकाच शैलीतील व्यक्त कला निर्माण झाल्या अशी नोंद डेविड स्मिथ याने केली आहे. या एकसंधतेच्या विचाराबरोबरच लिखित संहितांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे. सहाव्या शतकातील ‘विष्णूधर्मोत्तरपुराण’ या प्राचीन संस्कृत संहितेत ‘चित्र सूत्र’ या नावाचे सूत्र म्हणजे शिल्पकार-मूर्तीकार-चित्रकार यांच्या प्राथमिक अभ्यासासाठी आवश्यक क्रमिक पुस्तक लिहिले गेले. नंतरच्या काळात अशी अनेक ‘शिल्पसूत्र’ लिहिली गेली. शिल्प आणि मूर्ती प्रथम निर्माण झाल्या की, अशी क्रमिक पुस्तके प्रथम लिहिली गेली याचा शोध घेणे मात्र आजच्या प्रगत विज्ञानालाही शक्य होणार नाही.

 

वैश्विक विचारांच्या आणि संकल्पनांना मूर्त रूप देताना जसा चिह्नांचा वापर झाला, तसाच त्या शिल्प-मूर्ती-चित्रामध्ये ‘अलंकार’ आणि ‘अलंकरण’ हे फार महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, इंग्लंडमधून आलेल्या स्वघोषित Indologist म्हणजेच भारतविद्याचार्यांनी, भारतीय व्यक्त कलेतील अलंकार, आभूषणे म्हणजेच दागिन्यांच्या संदर्भात टीकात्मक लेख लिहिताना दागिन्यांचा असा प्रभाव अनावश्यक आहे असा प्रचार सुरु केला. १९३९ या वर्षी लिहिलेल्या निबंधात लेखात कुमारस्वामिनी ‘अलंकार’ आणि ‘आभरणम’ या दोन शब्दांचा, मूळ संस्कृत संहितेतील श्लोकांसह सखोल अर्थ विषद केला आणि या बरोबरच मूळ लॅटीन भाषेतील ‘अलंकार’ या शब्दाचे अर्थ सांगून या टीकाकारांच्या प्रचाराचे पूर्ण खंडन केले.

 

सामान्य उपासकाच्या-दर्शकाच्या समजुती पलीकडे असलेले उत्कर्षाकडे जाणारे विचार आणि सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान व्यक्त करण्यासाठी चिह्नांचा वापर फार प्राचीन काळापासून भारतीय व्यक्त कलेत केला गेला आहे. या चिह्नांनाच उपासक आणि देवता यांच्यातील संवादाची नि:शब्द भाषा म्हटले गेले. मोजता येतील अशा संख्यात्मक विचारांसाठी परिमाणाची आणि आकड्यांची भाषा वापरली गेली. बोलून वर्णन करता येईल आणि ऐकता येईल अशा विचारांसाठी शब्दांची निवड आणि अर्थवाही वाक्यांची रचना केली गेली आणि असे श्राव्य विचार मुखोद्गत केले गेले. वाचता यावे म्हणून असे शब्द लिपीच्या माध्यमातून निर्माण झाले, त्यांची अर्थवाही तर्कसंगत वाक्ये बनली आणि हस्तलिखित आणि छापील पुस्तकांची निर्मिती झाली. मात्र, आकड्यांत आणि शब्दांत मांडता येणार नाही अशा अगणित, अपार, वैश्विक, पारलौकिक अशा अमूर्त संकल्पना उपासक, दर्शकांपर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने चिह्नांचा वापर केला गेला. वैश्विक संकल्पना (concept or thought) आणि लौकिक जगातील वास्तव रचना (form) किंवा व्यक्त रूप (expression) या दोन्हीतील साधर्म्य आणि समानता स्पष्ट करण्याचे काम, चिह्न आणि चिह्नसंकेत करत असतात. चिह्ने आणि त्यांचे संकेत, सुप्त मनाची भाषा आहे. प्रथम बघताना-अनुभवताना अशी चिन्हे आणि त्यांचे संकेत अनेकदा कदचित तर्कसंगत वाटणार नाहीत.

 
 

 

 

 चित्र क्र. १ सुदर्शन चक्र
 
 
विष्णूतत्त्व म्हणजे विश्वाची-ब्रह्मांडाची व्यवस्था. ब्रह्मतत्त्व म्हणजे विश्वाची निर्मिती. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हटले गेले, हा ब्रह्मच श्रीविष्णूच्या नाभीतून निर्माण झाला. मात्र, ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवता विश्वनिर्मितीच्या आणि शिवतत्त्व म्हणजेच पुरुषतत्त्वाची प्रतीके आहेत. अनुक्रमाने ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या सहचारिणी, देवी सरस्वती-देवी लक्ष्मी-देवी पार्वती या तीन देवता शक्तीतत्त्व म्हणजेच ‘स्त्री’तत्त्वाची प्रतीके आहेत. या सर्व देवतांची शिल्प-मूर्ती-चित्र प्राचीन काळापासून नेहमीच चिह्नसंकेतांनी समृद्ध झालेली आहेत. सामान्यतः आपण श्रीविष्णूंची चतुर्भुज प्रतिमा पाहतो. (चित्र क्र. 1) ही फार कमी प्रचलित असलेली अष्टभुज प्रतिमा आहे. देवतेच्या उजव्या चार हातात चक्र, खड्ग, बाण अशी आयुधे असून एक हात अभयमुद्रा धारण करतो. डाव्या चार हातात शंख, धनुष्य, ढाल अशी आयुधे असून पुढचा हात वरदमुद्रा धारण केलेला आहे. श्री विष्णूंचे सुदर्शन चक्र एक विलक्षण आयुध आहे. या आनंद स्वरूप गोल चक्राची चित्र-प्रतिमा पाहिल्यावर आपल्या लक्षात येते त्यावरील शिवशक्तीचे प्रतीक ‘भूमितीय तांत्रिक मंडलाची’ आकृती म्हणजेच सहा ऋतूंचे प्रतीक असलेली षट्कोनी चांदणी. या चक्राच्या मध्यावर आहे ‘ह्रीमं’हा अचल-स्थिर आणि निरंतर बीज नाद. ही षट्कोनी चांदणी म्हणजे युगानुयुगे अव्याहत सिद्ध होणाऱ्या युगूलधर्माचे म्हणजेच सजीवांच्या निरामय कामजीवनाचे आणि सृष्टीच्या वृद्धीचे प्रतीक-चिह्न. सुदर्शन चक्र हे देवतेच्या अपार-अगणित-असीम अशा मनाच्या क्षमतेचे अद्भुत प्रतीक आहे. उपासक आणि दर्शकाला त्याच्या मनाचा आणि मनाच्या अशाच अगणित शक्तीचे स्मरण करून देणारे हे देवतेचे प्रतीक.
 
 

 
 
 

 चित्र क्र. २ अष्टभुज श्री विष्णू

 
 
या सृष्टीचा आणि स्थितीतत्त्वाचा सर्वश्रेष्ठ स्वामी श्रीविष्णूंच्या यांच्या आठ हातांमध्ये आठ अलौकिक गुणवत्ता आणि वैशिष्ट्ये चिह्नांकित झालेली आहेत. सर्वश्रेष्ठ ज्ञान-सर्वज्ञात्व, सर्वश्रेष्ठ देवता-सर्वेश्वरत्व, सर्व सजीवांच्या मनाचा-भावनांचा स्वामी-सर्वअंतर्यामित्व, प्रत्येक घटनेचा स्वामी-सर्वकारणत्व, प्रत्येक घटनेचा नियंत्रक-सर्वनियंत्रीत्व, सर्वश्रेष्ठ कर्ता-सर्वकर्तृत्व, सर्वशक्तिमान-सर्वशक्तिमानत्व, स्वतःचा सार्वभौम स्वामी-स्वतंत्रत्व. (चित्र क्र. 2) अशी ही अष्टगुण संपन्न देवता. याच अष्टभुजा शरीरमुद्रेत मानवाच्या वैयक्तिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी आवश्यक अशा आरोग्य, ज्ञान, वैभव, संघटना, सहकार्य, कीर्ती, धैर्य, सत्य या आठ मूल्यांचे संकेत श्रीविष्णूंच्या संयुक्त प्रतिमेतून, उपासक आणि दर्शकाला परावर्तीत होतात. 
 
 

 
 चित्र क्र. ३ श्रीविष्णूंच्या छातीवरील श्रीवत्स चिह्नमुद्रा
 
 
आकाशाकडे टोक असलेला हा समभूज त्रिकोण म्हणजे श्रीविष्णूंच्या छातीवरील श्रीवत्स या संबोधनाने परिचित चिह्नमुद्रा. हा त्रिकोण शिवतत्त्व म्हणजेच पुरुष तत्त्वाचे प्रतीक आहे. यातील तीन पाने म्हणजे राजस-तमस-सत्व या तीन गुणांची प्रतीके आहेत. राजस गुण म्हणजेच विश्वाची वृद्धी आणि क्रियाशील-उद्यमी व्यक्ती. तामसी गुण म्हणजे विश्वाचा संकोच आणि निष्क्रिय-गौण व्यक्ती. सत्व गुण म्हणजे वृद्धी-संकोचाचे संतुलन सांभाळणारी व्यक्ती. (चित्र क्र. 3) ‘श्री’ हे विष्णुपत्नी, श्रीलक्ष्मीचे संबोधन आहे. वैश्विक त्रिगुणांचे प्रतीक असलेला हा पुरुषतत्त्वाचा त्रिकोण म्हणजेच श्रीविष्णू, स्वतःला ‘श्रीवत्स’ म्हणजेच श्रीलक्ष्मीदेवीचा प्रिय पती असे संबोधित करतात. शिव-पार्वती सारखेच हे युगूलधर्माचे आणि निरामय कामजीवनाचे प्रतीक आहे.
 
 

 
 

 

 

चित्र क्र. ४ श्री विष्णूचे वाहन गरुड

 
गरुड पक्षी श्रीविष्णूंचे वाहन आहे. त्याला ‘गुरूत्मान’ असे अन्य संबोधन आहे. गरुड पक्षी तीन वेदांच्या शब्दांचे प्रतीक आहे. हे शब्द विलक्षण प्रकाशाच्या वेगाने विश्वात संचार करतात. विश्वाच्या स्थितीतत्त्वाचा स्वामी श्रीविष्णू याच वेदसंहितेवर स्वार होऊन विश्वाच्या कारभाराचे नियंत्रण करतो. हा वत्सल देव भक्ताच्या हाकेला तितक्याच वेगाने प्रतिसाद देतो. अशी ही चिह्न आणि त्याच्या संकेतांची प्रभावी योजनाप्राचीन संहितांमध्ये केलेल्या वर्णनानुसार, निर्माण झालेली ही विलक्षण प्रभावी मूर्तिविधाने, देवता आणि उपासक-दर्शक यांच्यातील चिरंतन नि:शब्द संवादाची अजरामर पाठ्यपुस्तके आहेत.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@