’सेव्ह राणी बाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशन’च्या एका हुतोक्षी रुस्तोमफ्राम नावाच्या विश्वस्तांनी उद्यानाच्या नूतनीकरणास विरोध दर्शविला. त्या विश्वस्ताचे म्हणणे होते की, पालिका प्रशासनाने कोणत्या आराखड्यास मंजुरी दिली आहे, ते स्पष्ट झालेले नाही. एमएचसीसीने ज्या आराखड्यास प्रथम ना-मंजुरी दाखविली होती, तोच आराखडा आता मंजूर केलेला दिसतो आहे. आमचा नूतनीकरणास यापुढे विरोध राहणार नाही. आम्हाला फक्त आराखड्यासंबंधी खुलासा हवा होता. महापालिकेने हा जिजामाता उद्यानाचा विस्तारविकास ३ टप्प्यांत पार पाडायचे ठरविले आहे. टप्पा १ ची विकासकामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पाचा खर्च रु. ८० कोटी झाला. प्रकल्पाच्या नियोजनातून ८ हम्बोल्ट पेंग्विन आणले, प्रशासनाची इमारत बांधली व पेंग्विन पक्ष्यांची अंडी उबविण्याची केंद्रे स्थापली. टप्पा २ ची कामे सुरू आहेत. प्रकल्पाची स्थूल किंमत रु. १२० कोटी.
प्रकल्पाची नियोजित कामे - १७ नवीन प्राण्यांकरिता (आशियातील सिंह, वाघ, ढाण्या वाघ, जलपक्षी, सुस्ती अस्वले, लांडगे व कोल्हे इत्यादी. यात १८ भारतीय प्राणी, ५ परदेशी प्राणी, ९ सस्तन प्राण्यांच्या उपजाती, २६ पक्ष्यांच्या उपजाती व ६ सरपटणारे प्राणी) पिंजरे उभारणे व सुरक्षेकरिता भिंती उभारणे, बाग-बागायतीचे सौंदर्य वाढविणे, पेयजल पुरवठा व पिंजर्यामधील प्राण्यांकरिता पेयजलांचा दर्जा सुधारणे, सुरक्षा अधिकार्यांकरिता राखीव कक्ष बनविणे, चिंपांझी, र्हिशस आणि बोनेट मकाऊ करिता प्रायमेट आयलंड व फ्लेमिंगोंसाठी फ्लेमिंगो आयर्लंड उभारण्यात येणार आहेत. टप्पा ३ ची कामे केंद्र सरकारच्या मंजुरीकरिता पाठविली आहेत.
प्रकल्प कामे - उच्च न्यायालयात मुंबई महापालिकेच्या बाजूने व मफतलाल इंडस्ट्रीजच्या विरुद्ध न्याय दिला गेला व ७ एकर भूखंडाचा ताबा पालिकेकडे दिला गेला. हा भूखंड जिजामाता उद्यानाला लागूनच आहे. त्यामुळे विस्तारी विकासकामे सोयीने करता येतील. या ७ एकर भूखंडावर २० परदेशी प्राणी आणणार आहेत. आफ्रिकन प्राणी (र्हिनो, जिराफ, शहामृग, झेब्रा, चित्ता, पाणघोडा, लिमर व काळवीट); ऑस्ट्रेलियन प्राणी (कांगारू, वॉलबी, काळी बदके व इमू) व दक्षिण अमेरिकन प्राण्यांमधील (जॅग्वॉर) असे त्या देशातून प्राणी आणून त्यांचे ३ विभाग केले जाणार आहेत. शिवाय दक्षिण पूर्व आशियाई देशातून रानडुक्कर, हुलॉन गिब्बन माकडे; प्रायमेट बेटावरून चिंपांझी, बोनेट माकड, र्हिशस माकड, फ्लेमिंगो प्राणी आणणार आहेत.
या उद्यानातील एक मजेदार किस्सा - भायखळा उद्यानातील एका शिल्पा नावाच्या हिप्पोपोटॅमस मादीने (वजन सुमारे २ टन) २०१६ मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी एका बाळाला जन्म दिला, तेव्हा बाळाचे वजन २५ ते ३० कि.ग्रॅ. होते. जन्मलेले बाळ ही मादी आहे, हे कळल्यावर तिचे नाव रक्षा असे ठेवले गेले. जर बाळ नर म्हणून जन्मले असते तर त्याचे नाव बंधन ठेवायचे ठरले होते. रक्षाचे वजन एक वर्षाने १५० कि.ग्रॅ. झाले होते. या हिप्पोपोटॅमस प्राण्यांना हिरवे गवत व गव्हाचा कोंडा व भिजवलेले चणे यांच्यातून विशेष असे सत्त्व काढलेला खास खुराक दिला जातो. या हिप्पोपोटॅमसच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे लागते, कारण त्यांना पाण्यात वा चिखलात बसून खेळायला आवडते. म्हणून या हिप्पोपोटॅमसना एक दिवसाआड आंघोळ घालावी लागते.
जिजामाता उद्यानाचा इतिहास - उद्यानाचे नाव-जुने नाव व्हिक्टोरिया गार्डन वा राणी बाग आणि आता नवीन नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय. भूभाग-भायखळा येथील २१ हेक्टर (५० एकर) क्षेत्रफळ व हा भूभाग मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. हे ब्रिटिश काळातील मुंबईतील सर्वात जुने प्राणी उद्यान समजले जाते.
केव्हा बांधले? - १८६१मध्ये. निरीक्षणाकरिता हे उद्यान सकाळी साडेनऊ वाजता उघडते. पहिले बांधकाम वेस्टर्न इंडिया हॉर्टिकल्चर सोसायटी म्हणून १८६२ मध्ये तयार झाले. बागबागायतीने युक्त असा प्राणिसंग्रहालयाचा विकास केला गेला १८९० मध्ये. हे उद्यान हे २१,०४३७ चौ.मी. क्षेत्रात व्यापले आहे. प्राण्यांची व्याप्ती ३७,९०० चौ.मी. क्षेत्रात आहे. सध्याची प्राण्यांची संख्या ७ पेंग्विन पक्ष्यांसह ३५० झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या विस्तारविकास कामात पेंग्विन पक्षी दक्षिण कोरियामधून आणले गेले. भायखळा प्राणिसंग्रहालयाची जागा ५३ एकरमध्ये विस्तारली आहे. त्याच्या सुमारे १५ टक्के जमीन प्राणिसंग्रहालयाने व्यापली आहे. उर्वरित भाग बोटॅनिकल बागेने व्याप्त आहे. त्यावेळच्या सरकारने १९१३ व १९१८ मध्ये २१ हेक्टर भूभागापैकी ७० हजार चौ.मी. म्हणजे ७ हेक्टर भूभाग (२ भागांत) ससून स्पिनींग एन्ड विव्हिंग कंपनी लिमिटेड या कंपनीला ९९ वर्षांच्या कराराने भाड्याने दिला होता. हे भूभाग मफतलाल इंडस्ट्रीजनी ससूनकडून विकत घेतले. एक भाग सरकारने व्यावसायिक कामाकरिता व दुसरा भाग विस्तारविकासाकरिता २०१७ मध्ये घ्यावयाचे ठरविले. या देण्याघेण्याच्या व्यवहाराला उच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने न्याय दिला पण मफतलाल कंपनी कदाचित सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकेल म्हणून अजून पालिकेला त्या भूभागावर विस्तारविकासकामांना सुरुवात करता येणार नाही.
पेंग्विन पक्ष्याची वैशिष्ट्ये - मुंबई पालिकेकडून पेंग्विन पक्ष्याच्या ३ नर व ३ माद्या थायलंडमधून आणल्या जाणार आहेत. विक्रीची किंमत रु २. ४ कोटी व ५ वर्षे सांभाळण्याचा व देखभाल करण्याकरिता रु. १९ कोटी खर्च होणार आहेत. पालिकेचे २ अधिकारी व २ माळी सिंगापूर व थायलंडला १ आठवड्याच्या प्रशिक्षणाकरिता पाठविले जातील. पेंग्विन पक्षी हे मूळचे दक्षिण अमेरिकेतील वाळवंटी व किनारी अशा पेरु व चिली देशातील आहेत. त्यांचे नाव चिंचोळ्या गार पाण्याच्या धारेवरून पडले आहे. असे वातावरण अंटार्क्टिका येथील थंड समुद्रात आढळते. मुंबईच्या जिजामाता उद्यानात पेंग्विनना आणून त्यांची मोठी बडदास्त ठेवावी लागेल. त्यांच्या दर्शन खोलीत १२ सीसीटीव्ही व ४ ते २४ अंश सेल्सिअस तापमान ठेवावे लागेल. त्यांच्याकरिता कृत्रिम डबके तयार करावे लागेल. त्यात अर्धे पाणी व अर्ध्या जागेत दगडी तुकडे व रेती ठेवली जाईल. पाण्यामध्ये ६७ जातीच्या ४०० माशांची अंडी सोडली जातील. त्यांचा दर्शन पिंजरा काचेचा राहणार आहे. अनिश अंधेरिया व अंबिका हिरानंदानी जे जंगली जातीच्या प्राणी-पक्ष्यांचा अभ्यास करणारे आहेत, त्यांनी हे पक्षी जगतील वा टिकतील का, याविषयी संशय व्यक्त केला आहे, परंतु पालिकेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे की, हे प्राणी उष्ण कटिबंध देशामधून आणल्यामुळे तापमानात व राहणीत फार फरक राहणार नसल्याने ते नक्की जिवंत राहतील. मुंबईकरांसाठी मात्र पेंग्विन पक्ष्यांचे हे एक खास आकर्षण ठरणार आहे. पण ते पक्षी जगायला हवेत! हे जिजामाता उद्यान व प्राणिसंग्रहालय अनेक विद्यार्थ्यांना व जगातील वा देशातील अभ्यासकांना निरीक्षण करण्यास फार उपयोगी ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
Waqf Amendment Bill वरून कट्टरपंथीयांनी पोलिसांवर केली दगडफेक, रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न..