ठाणे : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला बंद ठाण्यात होणार नसल्याचे सांगितले असले तरी ठाण्याचा वेग मात्र गुरुवारी कमी झालेला दिसला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहराच्या मुख्य रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळच्या सुमारास शहरातील विविध सहा ठिकाणी २१ हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सीमेवर वीरमरण पत्करलेले शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनासुद्धा श्रद्धांजली वाहण्यात आली, परंतु तोंडाला काळ्या पट्ट्या लावून सकल मराठा समाजाने शासनाचा निषेधही केला. सकल मराठा समाजाने ज्या सहा ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय शहरातील मुख्य हायवे, मुख्य रस्ते, घोडबंदर भागातील रस्ते या ठिकाणीसुद्धा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता तर काही ठिकाणी ड्रोन कॅमेर्याची नजरसुद्धा ठेवण्यात आली होती. मात्र कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही. मात्र गजबजलेल्या रस्त्यांवर गुरुवारी शुकशुकाट होता.
कल्याण-डोंबिवलीत आणि अंबरनाथमध्ये ठिय्या आंदोलन करत मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडल्या. कल्याण तहसील कार्यालय परिसरात तसेच डोंबिवलीतील इंदिरा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात या समाजातील काही ज्येष्ठांनी आपले मनोगतही येथे मांडले. डोंबिवलीतील धरणे आंदोलनास मराठा समाजातील काही मान्यवर नेत्यांनीही आवर्जून हजेरी लावली होती. अंबरनाथमध्ये तहसीलदारांना निवेदन करण्यात आले. तसेच, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली. शहापूरातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापारी मंडळ, रिक्षा संघटनांनी, हॉटेल, छोट्या व्यापारी संघटना, तसेच जीप चालक-मालक संघटनांनी बंद पाळून मराठा समाजाच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद दिला.