90's Nostalgia च्या तिसऱ्या भागात आपण सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. 90's च्या आठवणींबद्दल आपण कितीही बोललो तरी ते कमीच पडणार आहे. आठवणीच इतक्या आहेत तर काय करणार ? 90's म्हटलं की अनेक गोष्टी डोळ्या पुढे येतात. आणि त्यातीलच या काही जाहिराती देखील आहेत. आज अनेक जाहिराती आपण बघतो, मात्र "स्किप" अॅडच्या जमान्यात जुन्या जाहिरातींची मजा कशी येणार? हो ना त्यासाठी मी घेऊन आले आहे, "जाहिराती आणि आठवणी".
मला जिलबी फारशी आवडत नाही, अगदी सुरवातीपासूनच. मात्र जेव्हा धाराची अॅड बघितली, जिलबी खावीशीच वाटली. तुम्हाला आठवते का ती अतिशय गोड आणि निरागस जाहिरात "रामू काका सब गुस्सा करते हैं, मैं घर छोड के जा रहा हूँ" म्हणणारा तो चिमुकला आणि "घर पर तो माँ ने जलेबी बनाई है" असे सांगितल्यानंतर "जलेबी..!!!!" म्हणताना त्याच्या डोळ्यातली चमक आज पण 90's किड्सच्या डोळ्यांपुढे आहे. त्यावेळी तेल म्हटलं की धारा, आणि धारा म्हटलं की "जलेबी" हे समीकरण फिक्सच होतं.
आजही जेव्हा आपण निर्मा साबणाबद्दल बोलतो, तेव्हा एकसुरात सगळे "वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर निर्मा" असं सुरु करु शकतात. कारण ते आपल्या इतकं तोंडात बसलेलं आहे, पाठ झालेलं आहे. कि निर्माच्या जाहीरातीचा विषय निघाला की एकसुरात हे पूर्ण गाणं म्हणणं अनिवार्यच आहे जणू..
"हेमा रेखा जया और सुषमा,
सबकी पसंद निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, निर्मा"
अशीच फेवीक्वीकची पण एक गंमतीदार अॅड होती, ती म्हणजे एक माणूस मासोळी पकडण्याचा खूप प्रयत्न करत असतो, मात्र त्याला काही यश येत नाही, आणि इतक्यात दुसरा येतो आणि ५ मिनिटात त्याच्या गळाला खूप मासे लागतात. आठवली का ही जाहीरात ? नसेल आठवली तर ही घ्या बघा तुम्हीच.
सचिन आणि शाहरुख खानची पेप्सीची "दिल मांगे मोर" ही अॅड आठवते का? कोक आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नाही, मात्र त्यावेळी टॉप वर असलेल्या "शाहरुख, आमिर, ऐश्वर्या, रानी मुखर्जी, सचिन तेंडुलकर" यांच्या या जाहिरातींमुळे आपणही यांच्या सारखं कोक प्यावं आणि कूल दिसावं असं प्रत्येकच 90's किड ला वाटले असणार. अशीच आमिर आणि ऐश्वर्याची "कोका कोला हो जाय" जाहीरात.
अमूल दूधची जाहीरात पण अशीच लक्षात राहते "जरा सी हँसी दुलार जरा सा.. अमूल द टेस्ट ऑफ इंडिया.. जरा सी अनबन प्यार जरा सा... अमूल द टेस्ट ऑफ इंडिया.." आठवलं ना?
अशीच "नीमा रोज निमा रोज रोज रोज नीमा रोज.. गुलाबों की खुशबू रोज रोज, रेशम सी त्वचा रोज रोज.." ही नीमा रोज साबणाची जाहीरात. अगदी तालासुरात आजही आपण ही जाहिरात गाऊन दाखवू शकतो. हो ना..
''कर्रम कुर्रम कुर्रम कर्रम" करणारे ससे आठवतायेत? हो मी लिज्जत पापडच्या जाहीरातीबद्दलच बोलतिये. आजही ससे बघितले की मला लिज्जत पापड आठवतात. आमच्या जबलपूरच्या घराजवळच लिज्जत पापडचा कारखाना आहे, आणि त्यासारखे पापड दुसरे नाही हे ही खरे. "साद स्वाद में लिज्जत लिज्जत पापड.."
"भारत की बुलंद तस्वीर... हमारा बजाज हमारा बजाज.." त्यावेळी अधिकांश घरांमधून बजाज स्कूटर बघायला मिळायची. माझ्या बाबांकडेही होती. त्याला आम्ही माझ्या बसण्यासाठी एक छोटी सीट लावून घेतली होती. आता एकतर अॅक्टिव्हा, एव्हिएटर सारख्या गाड्या, किंवा बाईक्स असतात नाहीतर सरळ कार.. स्कूटर्स कमीच झाल्या आहेत, मात्र या बजाज सारख्या जाहिरांमधून त्यांची आठवण ताजी होते हे मात्र खरं.
पानपराग : "बारातियों का स्वागत पान पराग से होना चाहिये" शम्मी कपूरने म्हटलेला हा संवाद आजही अनेकांच्या लक्षात आहे. आम्ही गंमतीत म्हणतोही की आम्हा मैत्रीणींचं लग्न ठरताना आई वडिलांनी मुद्दाम हा संवाद म्हटला पाहिजे म्हणून.
गेल्या काही दिवसांपासून सोनाली बेंद्रे कर्करोगाने ग्रसित असल्यामुळे चर्चेत आहे, मात्र मला जी सोनाली बेंद्रे आठवते ती "सौंदर्य साबुन निर्मा" या जाहिरातीतील. "तुम हुस्न परी तुम जानेजहाँ तुम सबसे हसीं तुम सबसे जवाँ सौंदर्य साबुन निर्मा.." या जाहीरातीतल नंतर मॉडेल्स बदलल्या, स्थळ बदललं, बरंच काही बदललं मात्र ही जाहीरात लागली की अजूनही आपल्या डोळ्यांसमोर येते ती म्हणजे सोनाली बेंद्रे.
"ओहोहो स्कूल टाईम अॅक्शन का स्कूल टाईम" क्लासवर्क होमवर्क पनिशमेंट लेक्चर्स.. गुड.. गुडमॉर्निंग टीचर" आठवडलं ना? लहानपणी प्रत्येक कार्यक्रमानंतर लागणाऱ्या जाहिरातींच्या ब्रेकमध्ये ही जाहिरात नक्कीच लागायची. तेव्हा सर्व शाळेत जाणाऱ्या मुलांकडे "अॅक्शन शूज"च असायचे. आपली शाळेतली धावपळ या जाहिरातीत दाखवण्यात आली आहे, असं वाटायंचं. आता मोची, बाटा, वेस्टसाईड, नाईके चे जोडे घालताना अॅक्शन स्कूलशूजची आठवण नक्कीच येते.
अनेक जाहिराती, आणि त्यांच्यासोबत जोडलेल्या अनेक आठवणी.. मेरी मॅगी, किंवा रस्नाची जाहिरात.. बोर्नव्हीटा किंवा माल्टोव्हाची जाहिरात, लिटील हार्ट्सची जाहिरात... "सैर तो एक बहाना है, पापा को कुल्फी जो खाना है.." ही अमूल आईस्क्रीमची जाहिरात असू देत, प्रिती झिंटाची 'पर्क'ची जाहिरात असू देत, फेवीकॉलची जाहिरात, किंवा कॅडबरी डेरिमिल्कची जाहिरात असू देत. या जाहिरातींनी आपल्याला "आयषा टाकिया" आणि " शाहिद कपूर" सारखे कलाकार दिले आहेत.
या जाहिराती आपल्या घरी तेव्हा रोज लागायच्या. यामध्ये संदेश असायचा, यामध्ये लय ताल, आणि सुंदर शब्द असायचे. कारण या जाहिरातींचा उद्येश्य केवळ एखादी वस्तु विकणे नाही तर लोकांना त्यासोबत जोडणे हा ही असायचा. किती जाहिराती आल्या आणि गेल्या, कितीतरी उद्या येतील आणि जातील मात्र 90's किड्सच्या मनात असेलल्या या जाहिरातींच्या आठवणी नेहमी तशाच राहतील.
- निहारिका पोळ